एक्युपंक्चरः चीन मधील उपचार पद्धत

कातडीवर ठराविक ठिकाणी सुया टोचून डोकं, हात, पाय यांच्या सारख्या अवयवांत झालेला बिघाड बरा करण्याच्या चिनी-जपानी पद्धतीला अँक्युपंक्चर म्हणतात. पुण्याचे डॉ. पी. व्ही. गोडबोले जपानला जाऊन ही विद्या पुण्याला घेऊन आले आहेत "आता पर्यंत पुस्तकात आणि मासिकात वाचत होतो, ती गोष्ट आपल्या पर्यंत येऊन पोहोचली का !" अशी लोकांची प्रतिक्रिया आहे.

पौर्वात्य विद्या

"अँक्युपंक्चरचं वैशिष्ट्य म्हणजे ती पूर्णपणे पौर्वात्य विद्या आहे. पौर्वात्य तत्वज्ञानाची छाप त्यावर बरीच आहे. आम्ही एलोपथीमधे रोगावर इलाज करतो, अँक्युपंक्चरमधे त्या माणसावर इलाज केला जातो. रोगापेक्षा अवयवाच्या बिघाडावर इलाज केला जातो." डॉक्टर म्हणाले.

ताओच्या तत्वज्ञानावर या इलाजाची कल्पना आधारलेली आहे. लहान मूल जन्मतं, तेव्हा त्याच्या शरीरामधे शक्ती तोललेली असते. म्हणजे शरीराच्या डाव्या व उजव्या भागात सारखी असते, प्रत्येक अवयवाला योग्य प्रमाणात मिळालेली असते. आजार होतो म्हणजे काय, तर या शक्तीमधे कमी-जास्तपणा येतो. शरीराच्या एका भागात ती जास्त होते तर दुसरीकडे कमी होते. "यावर उपाय म्हणजे अर्थातच ती पूर्वस्थितीला आणणे." डॉक्टरांनी सांगितलं. "रोगाचं मूळ शोधून काढण्याची त्यांची कल्पना निराळी असल्यानं तिचा उपायही साहजिकच निराळा वाटतो. "

सुयांचा उपयोग केला जातो हे माहिती आहे, पण तो कसा करतात ? मी विचारलं .

"थांबा, तुम्हाला त्या सुयाच दाखवतो". असं म्हणून डॉक्टर उठले. परत आले तेव्हा क्रोशाच्या सुईवर असलेल्या झाकणासारख्या नळीमधे असलेल्या सुया त्यांनी दाखवल्या. "चांदीच्या आहेत या. नळीमधे सुई घालून जिथे जिथे ती आपल्याला टोचायची असते, त्या जागी कातडीवर टेकवायची आणि बोटानं हलकेच ढकलून सुई कातडीत न्यायची." स्वतःच्या हातावर त्यांनी कातडीवर सुई रोवून दाखवली.

सुई म्हटल्यावर प्रथम आपल्याला वाटेल, ती गोष्ट म्हणजे सुई टोचल्यावरची वेदना. इंजेक्शन घेताना जिवाच्या आकांतानं ओरडणारे लोक काही कमी नाहीत. काही सोशीक लोक ओरडत नसतील, पण ती वेदना चेहऱ्यावर काही लपून राहत नाही आणि हा गृहस्थ हाताला सुई टोचून हसत बोलतोय ! "पण कशाला, तुम्हालाच दाखवतो सुई टोचून." ते म्हणाले. हात पुढे करताना क्षणभरच धाकधूक झालं. पण सुई तर "माझ्या हाताच्या कातडीत रुतलेली दिसली, तरी वेदना नव्हती. कातडीच्या वरच्या पापुद्य्रावर सुई राहिली होती.

"कातडीच्या पृष्ठभागावर टोचलेल्या सुईचा लांबवरच्या अवयवावर कसा परिणाम होतो ?" मी विचारलं.

शरीरात प्रत्येक अवयवाकडे एका ठराविक दिशेने शक्तीचा प्रवाह वाहत असतो. उदा. मोठ्या मोठ्या आतड्याच्या बाबतीत, पायाकडून डोक्याकडे. हा शक्तीचा प्रवाह ठराविक मार्गानं जातो. त्यांना मेरिडियन म्हणतात. या मेरिडियन वर ठराविक बिंदू, पूर्वीच्या एक्युपंक्चरिस्टनी शोधले आहेत. त्या बिंदूंवर सुया टोचल्या की शक्तीचा प्रवाह अडवला जातो. ज्या भागाकडे शक्ती जास्त झाली असेल, त्या भागाकडून जिकडे कमी असेल तिकडे ती वळवण्याचं काम या सुया करतात." मेरिडियन्सवर जवळ जवळ ९०० बिंदू शास्त्रज्ञांनी शोधलेले आहेत. दोन तीन मिलिमीटर व्यासाचा हा बिंदू असतो. या सुया टोचण्यातही अनेक प्रकार आहेत. कुणी हातापायावर बऱ्याच टोचतात. पण मला वाटतं जास्त संवेदनाक्षम बिंदूंवर सुया टोचून परिणाम होतो. सुया १०-२० मिनिटे ठेवतात. अर्थात प्रत्येक माणसावर व आजारावर ते अवलंबून आहे. सुईला जोडलेल्या विजेच्या बॅटरीचाही ठराविक अंतराने (पुढे मागे करण्यासाठी) परिणामकारकतेसाठी उपयोग करतात.

"कुठल्याही रोगांवर तुम्ही याचा उपयोग करणार ?" मी विचारलं.

"डोकेदुखी, पाठदुखी, मलावरोध, दमा, मधुमेह, फेफरे, सायटिका इ. रोगांवर याचा उपयोग होईल. या पद्धतीत वैशिष्ट्य म्हणजे जिथे अवयवात बिघाड होतो-जंतूंमुळे नव्हे-तिथे (फंक्शनल डिसॉर्डर असेल तर) एक्युपंक्चरचा उपयोग होतो. म्हणजे दमा (अस्थमा) झाला असेल तर याचा उपयोग होईल, पण अस्थमॅटिक ब्रॉंकायटिस झाला असेल तर याचा उपयोग होणार नाही. तिथे एलोपथीचा उपयोग करावा लागेल. कॅन्सर असेल तर तो नाहीसा होणार नाही. पण वेदना कमी करता येतील."

एक्युपंक्चरच्या साहाय्यानं निदान करण्याची पद्धतही एलोपथीहून वेगळी आहे. थोडीशी आयुर्वेदाला जवळची वाटणारी. आपल्याप्रमाणे त्यांचीही कल्पना आहे की शरीर हे लाकूड, अग्नी, धातु, पृथ्वी आणि पाणी या मूलतत्वांचं बनलेलं आहे. या शरीरात झालेला बिघाड नाडी परीक्षेवरून ओळखतात. मनगटावर जाणवणारे ठोके, पोटावर जाणवणारे ठोके यांचा रोग्याच्या तक्रारीशी मेळ घालून निदान करतात. माणसाच्या बोलण्याचे, आवाजाचेही त्यांनी आडाखे बसवलेले आहेत. त्याचीही मदत घेतली जाते.

"नाडी परीक्षा करताना हाताची तीन बोटं नाडीवर ठेवून ठोके मोजतात. अधर स्पर्श आणि दाबून केलेला स्पर्श वेगवेगळ्या अवयवांचं निदान करतो. प्रत्येक बोट हे शरीरातील वेगवेगळ्या अवयवाचं समजलं जातं. हाताची मधली तीन बोटं अधर स्पर्श पद्धतीत तीन आणि दाबून केलेल्या स्पर्शाच्या पद्धतीत तीन असे सहा अवयव दर्शवतात."

"याचं वैशिष्ट्य म्हणजे औषधांच्या उपयोगाचा अभाव, वेदना कमी करण्यासाठी आपण एस्प्रो-एनासिन घेतो, त्यामुळे एक्युपंक्चरचा परिणाम जातो. अर्थात प्रत्येक माणसावर एक्युपंक्चरचा परिणाम होईल असं नाही. एकाच माणसावर वेगवेगळ्या अवयवांच्या बाबतीत उपयोग होईल असंही नाही." "माझा हात दुखत असताना एक्युपंक्चरचा उपयोग झाला तर पाय दुखताना हेच उपाय करून उपयोग होईलच असं नाही होय ना?" डॉक्टर म्हणाले "हो, पण अमेरिकेत १३२६५ लोकांवर प्रयोग करून असं दिसलं की जवळजवळ ८६ टक्के लोकांवर त्याचा परिणाम झाला. त्यापैकी ६५ लोकांवर एकाच सेशन मधे झाला."

अलिकडच्या पिंगपॉंग राजकारणाचा परिणाम म्हणून चिनी आणि अमेरिकन लोकांमधे सांस्कृतिक अदलाबदल झाली. त्यात अमेरिकनांनी हा पौर्वात्य उपाय स्वतःच्या डोळ्यांनी पाहिला. अमेरिकन व्हाइट हाउसच्या डॉक्टरांनी मोठ्या शस्त्रक्रिया (मेजर ऑपरेशन्स) एक्युपंक्चरच्या साह्याने भूल न देता केलेली पाहिली. शस्त्रक्रिया चालू असताना डॉक्टरांशी रोगी बोलत होता आणि नंतर ऑपरेशन टेबलावरून आपल्या पायाने चालत गेला, असं वर्णन या व्हाइट हाउसच्या डॉक्टरनं केलं आहे.

"एनेस्थेशिया ऐवजी एक्युपंक्चरचा उपयोग तुम्ही पाहिलात का ?" मी प्रश्न केला.

"हो! मी जपानमधे ज्या डॉ. दानी आणि डॉ. योशिओ मनाका या डॉक्टरांकडे होतो, ते एक्युपंक्चरचा एनेस्थेशिया ऐवजी उपयोग करीत. पण त्यांचं म्हणणं ४० टक्के लोकांवरच याचा उपयोग होतो. म्हणजे एक्युपंक्चरवर अवलंबून राहता येत नाही. तो प्रयत्न फसला तर नेहमीचा एनेस्थेशिया द्यावा लागतो."

"मग एवढ्यासाठी एक्युपंक्चर वापरयचंच कशाला, ते "लोकल" देण्यासारखंच नाही का? " माझा प्रश्न.

"एक्युपंक्चरनं वेदना जाणवत नाहीत. लोकलने इतका परिणाम साधायचा तर, नर्व्ह इंजेक्शन नाहीतर पाठीच्या कण्याला इंजेक्शन द्यावं लागतं. त्यापेक्षा एक्युपंक्चर सोपं जातं. शिवाय एनेस्थेशियामुळे नंतर होणारे परिणाम एक्युपंक्चरनं होत नाहीत. नंतर बराच काळ घ्यावी लागणारी औषधं घ्यावी लागत नाहीत. चिनी लोकांत (जगातल्या कोणत्याही देशातल्या लोकांपेक्षा) सहनशीलता जास्त असते. त्यामुळे शंभर टक्के बधीरता नाही येऊ शकली तरी चालतं." डॉ. गोडबोले यांनी खुलासा केला.

डॉ. गोडबोले एम्.डी. एफ्.आर्.सी.एस्. आहेत. त्यामुळे ते नेहमी एलोपथीला एक्युपंक्चरची जोड देतात. "कालच मी एका बाईंना पाठ दुखण्यावर ट्रीटमेंट दिली. आता दोन दिवसांनी त्या येतील त्यावेळी किती परिणाम झाला ते कळेल. प्रथम लोक यासाठी तयार होणार नाहीत. पण त्यांनी ही जादू न मानता इतर उपायांसारखा उपाय मानला तर त्याचा उपयोग निश्चित होईल. कुठल्याही उपायाला काही मर्यादा असतेच. जपान मधे सकाळी नऊ पासून संध्याकाळी साडेपाच पर्यंत सलग तीन आठवडे याचा उपयोग होताना त्याचे निरीक्षण मी केले आहे. शेवटचा आठवडा त्या दोन जपानी डॉक्टरांसमोर मी स्वतः लोकांवर उपचार केले आहेत. "

कॅनडामधे असताना डॉक्टर गोडबोले यांना नवीन एक्युपंक्चर जर्नलमधील लेखांतून पूर्वेला जाऊन आलेल्या डॉक्टरांकडून माहिती मिळाली आणि ते एक्युपंक्चर कडे वळले. १९४६ सालापासून पॅरिसमधे कार्यालय असलेली "इंटरनॅशनल सोसायटी ऑफ एक्युपंक्चर" दरवर्षी परिषद घेते. लहान मुलांवर याचा उपयोग होत नाही, एक्युपंक्चरमागचं कारण, तत्व काय हे कुणाला कळलेलं नाही.

ख्रिस्तपूर्व ४७५ च्या सुमाराला अंगठा आणि त्याच्या जवळचं बोट यांच्यामधे टोकदार दगड, बाण लागला तर शरीराचे इतर अवयव बरे होतात असा शोध चिनी डॉक्टरांना लागला होता. इसवी सनाच्या तिसऱ्या शतकात एक्युपंक्चर शास्त्राची अधीक प्रगती झाली.

पूर्व प्रसिद्धी सकाळ १९७६


मुख्यपान Homepage

संपर्क

आमच्याशी संपर्क साधाः
Contact us here:
myemail

लेखकः मानसी मोकाशी