अगाथा ख्रिस्तीचा मानसपुत्र हरक्यूल पॉयरॉ

अघटिताचं आणि रहस्याचं माणसाला नेहमीच आकर्षण वाटत आलं आहे. खणाखणीच्या लढायांचं आयुष्य जरी आपण जगत नसलो तरी (आणि कदाचित म्हणूनच) माणसाला कुठे ना कुठे थ्रिल हवं असतं. या थ्रिलच्या शोधात असणाऱ्या वाचकांचं अॅगाथा ख्रिस्तिीनं भरपूर मनोरंजन केलं. तिनं उभ्या केलेल्या शेकडो पात्रांमधील मिस मार्पल, ट्रूपेन्स आणि टॉमी बेरेसफोर्ड, अॅरिएडने ऑलिव्हर ही लेखिका, हे महत्वाचे गुप्तचर आपल्याला पुन्हा पुन्हा भेटतात. पण त्यातला मुकुटमणि म्हणजे हरक्यूल पॉयरॉ (Hercule Poirot). आर्थर कॉनन डॉइलच्या शेरलॉक होम्स नंतर इंग्रजी वाङ्मयात अजरामर झालेला हा गुप्तचर म्हणजे या सर्वांचा मुकुटमणि.

agatha_christie

अगाथानं आपल्या बहिणीशी पैज लावली. " मी रहस्यकथा लिहिणार " हे शब्द तिनं खरे केले. " द मिस्टिरिअस अफेअर अॅट स्टाइल्स " हे पहिलं पुस्तक लिहिलं. त्यावेळी नुकत्याच आलेल्या बेल्जिअन निर्वासितांकडे तिचं लक्ष गेलं. तिच्या पुस्तकातला डिटेक्टिव्ह बेल्जिअन झाला. त्याच्या विचारांची मोठी झेप दाखवण्याकरिता ऍगाथानं त्याचं नाव हरक्यूल पॉयरॉ ठेवलं. पॉयरॉ नाव तिनं वर्तमानपत्रात कुठेतरी वाचलं असावं... आणि हरक्यूल पॉयरॉचा जन्म झाला.

पॉयरॉचा जन्म

poirot

हे पात्र अगाथानं रंगवलं, तेच प्रौढ वयाचं. पुढे तिला वाटे, सुरुवातीलाच हा गुप्तचर इतक्या वयाचा दाखवायला नको होता. पुस्तकातली पात्र तुमच्या आमच्या सारखी वाढली असती तर १९७५ मधे तो मृत्यूच्या वेळी १२० वर्षांचा असता. अगाथा ख्रिस्तीच्या कादंबऱ्यांत म्हटल्याप्रमाणे हरक्यूल पॉयरॉचा जन्म १९ व्या शतकातील बेल्जियममधला. ' स्पा ' मधे लहानाचा मोठा झाल्यावर तो ब्रुसेल्सला बेल्जियम पोलिसात गेला. १९०४ मधे तो निवृत्त झाला. त्यावेळी त्यानं डिटेक्टिव्ह म्हणून मोठंच नाव मिळवलं होतं.

डिटेक्टिव्ह म्हणजे शस्त्र चालवण्यात वाकबगार. गुन्हा झाल्या ठिकाणी गुन्हेगारांच्या हातापायांचे ठसे शोधणारा, संशयितांचा पाठलाग करणारा या कल्पनेला पॉयरॉ पार मोडूनच काढतो.

गुन्हेगारी शोध

अंडाकृती डोक्याचा, चणीनं लहानच, जेमतेम पाच फूट चार इंच उंचीचा, पण पल्लेदार मिशा असलेला, व्यवस्थित, सारखा आवरा-आवरीच्या आणि टापटिपीच्या मागे असलेला, शांतपणे तर्कशुद्ध विचार करणारा हा पॉयरॉ. गुन्ह्यांचा तपास करणं आणि गुन्हेगार शोधणं म्हणजे त्याच्या हातचा मळच. आरामखुर्चीत बसून शांतपणे सर्व गोष्टींचा विचार करायचा आणि तर्कशास्त्राच्या सहाय्यानं गुन्हेगार शोधून काढायचा असं पॉयरॉचं ठाम मत.

" प्रत्येक माणसाचं मानसशास्त्र जाणून घेणं आवश्यक असतं. तसंच मनोरंजकही असतं. मानसशास्त्रात रस असल्याशिवाय गुन्ह्यात आणि तो सोडवण्यात रसच घेता येणार नाही. खून करण्यापेक्षा त्याच्या मागचं कारण आपल्याला रहस्यशोधनाकडे आकृष्ट करतं मेंदूतल्या राखी पेशी (little grey cells), फक्त धुक्यातून वाट दाखवावी तसं सत्याकडे घेऊन जातात." असं पॉयरॉचं म्हणणं.

या विचारांत गुंतून तो रस्त्यातून जाताना स्वतःशीच बोलायला कमी करत नाही. त्यामुळे लोक मागे वळून पहातात याची हेस्टिंग्जला - त्याच्या मित्राला - लाज वाटते. पॉयरॉला त्याचं ढिम्म नसतं. "कार्ड्स ऑन द टेबल" मधे ! एॅनेचा स्वभाव ओळखण्यासाठी ( ती चोरटी आहे की नाही हे पहायचं असतं.) तो दुकानात जाऊन महागाईचे एक नाही दोन नाही, एकोणीस रेशमी जोड घेऊन येतो. दुकानातील विक्रेत्या मुली म्हणतात, "म्हाताऱ्याला चळ लागला असावा."

पॉयरॉचे प्रश्न

याच कादंबरीत पत्ते खेळत असताना खोलीतील शेकोटीजवळ बसलेल्या यजमानाचा खून झालेला असतो. पत्ते खेळणाऱ्यांशिवाय खोलीत इतर कोणी आलेलं नसतं. याचा अर्थ पत्ते खेळणाऱ्या चौघांपैकीच कोणीतरी खुनी असणार. पोलिसांना मदत करताना पॉयरॉ दर वेळी कुठले दोन प्रश्न विचारत असेल तर " तुम्ही खोलीतल्या कुठल्या वस्तू पाहिल्यात आणि पत्त्यांचा डाव तुम्ही कसा खेळलात ?" या दोन प्रश्नांचा पॉयरॉचा धोशा ऐकून सुपरिंटेंडंट बॅटल आणि इतरांना पॉयरॉचा स्क्रू जरा ढिला झाल्याची शंका येते. एॅगाथा अर्थातच यातून रहस्य शोधते. या प्रश्नांवरून पॉयरॉला चौघा संशयितांच्या निरीक्षण बुद्धीचा शोध घ्यायचा असतो. खुनी व्यक्तीचं खेळाकडे दुर्लक्ष होऊन खेळावर परिणाम झाल्याचं जाणवेल आणि खुनी शोधता येईल अशी त्याची भूमिका असते.

पॉयरॉ तसा पोलिसांचा मित्र. त्यांना रहस्य शोधण्यात मदत करतो. पण सुपरिंटेंडंट बॅटल, कर्नल रेस वगैरे उच्चाधिकारी सोडता त्याचं पोलिसांच्या अकलेबद्दल चांगलं मत नाही. हे दोघं पॉयरॉची किंमत ओळखून त्याची मदत मागतात. अर्थात सर्वच वेळी पॉयरॉच्या पद्धतीशी सहमत होतात असं नाही.

इन्स्पेक्टर गॅप

ब्रुसेल्स मधे एॅबरकोवि फोर्जरी केस मधे स्कॉललंड यार्डच्या इन्स्पेक्टर गॅपशी त्याची ओळख झाली. या इन्स्पेक्टर गॅपला आपण एॅगाथा ख्रिस्तीच्या बऱ्याच कादंबऱ्यांत भेटतो. तिनं लिहिलेल्या बऱ्यांच कादंबऱ्यांत आपल्याला भेटणारा पॉयरॉचा मित्र म्हणजे आर्थर हेस्टिंग्ज. शेरलॉक होम्सच्या वॉटसन प्रमाणे त्याचा मित्र आणि रहस्य शोधनातला सहकारी हेस्टिंग्ज लंडनमधे लॉर्ड्सच्या प्रकरणात प्रथम भेटतो. स्टाइल्स येथील प्रकरणानंतर पॉयरॉ व हेस्टिंग्ज १४ फारअवे स्ट्रीट इथं जागा घेऊन राहतात.

हेस्टिंग्ज लग्न करून अर्जेंटिनात स्थायिक झाल्यावरची पॉयरॉची मोठी केस म्हणजे "बिग फोर". हरक्यूल पॉयरॉचा जुळा भाऊ अचिल या प्रकरणात हरक्यूल पॉयरॉ म्हणून वावरताना मरतो. हरक्यूल पॉयरॉ किंग्ज एॅबॉट मधे निवृत्तीचं आयुष्य जगण्याकरिता जातो. तिथं एॅक्रॉइडच्या खुनाचा तपास करतो आणि निवृत्ती आपल्या पचनी पडत नाही हे जाणून लंडनला परत येतो. लंडनमधे व्हाइट हेवन इमारतीत फ्लॅट घेतो. ही जागा त्याला पसंत आहे कारण ही इमारत symmetrical आहे. इथे त्याचा जॉर्ज नावाचा व्यक्तिगत नोकर व फेलिसिटी लेमन ही सेक्रेटरी त्याला मदत करतात.

हरक्यूल पॉयरॉला स्वच्छतेचं वेड, तसंच उबदारपणाचं. त्याला सारखी भीती वाटत असते, आपल्याला थंडी बाधेल. मफलर, ओव्हरकोट आणि एखादा स्कार्फ तरी हवाच असं त्याला वाटतं. हे केव्हा, तर उत्तर धृवावर जायची तयारी म्हणून नाही, तर लंडनला बाहेर ऊन्ह पडलेलं असताना. एका कथेत अगाथा ख्रिस्तीनं वर्णन केलंय की, एका मोठ्या प्रकरणाचा शोध घेण्यासाठी ख्रिसमसच्या नावाखाली एका सरदारी वाड्यात बोलावणं केलं जातं. त्या प्रकरणात पॉयरॉला रस असतोही. पण थंडीच्या दिवसांत लंडनमधलं उबदार सेट्रल हीटिंग सोडून द्यायला स्वारी तयार नसते. शेवटी तिथे सर्व अत्याधुनिक सुखसोयी आहेत असं त्याला पटवतात, तेव्हाच तो जातो.

पॉयरॉची सवय

व्यवस्थित माणसाचं सारंच व्यवस्थित. हेस्टिंग्जनं त्याच्या पद्धतशीरपणाचं वर्णन केलंय. " सकाळी आलेली पत्रं उघडण्याची त्याची विशिष्ट पद्धत होती. प्रत्येक पत्र उचलून त्याचं विशिष्ट प्रकारे निरीक्षण करायचं, मग व्यवस्थितपणे पेपरकटरनं कापून उघडायचं. वाचायचं आणि चॉकोलेटच्या डब्यापलीकडे चार चळतींपैकी जिथे ते योग्य असेल तिथे ते ठेवायचं. न्याहारीला चॉकोलेट पिण्याची घाणेरडी सवय पॉयरॉला होती."

हे पत्र वाचणं म्हणजे पत्र लिहिणाऱ्याच्या अंतरंगात डोकावणंच असे. ८ इंच विटनेसमधे एमिली अरुंडेलचं पत्र येतं. त्याचं पॉयरॉ मनन करतो. कोंबडं नाचल्यासारखं तिचं अक्षर, काय खोडलंय काय अधोरेखित केलंय यासकट सगळ्याची नोंद घेऊन कुत्रा सावजाच्या वासावर जावा तसा पॉयरॉ जातो. एमिली अरुंडेलचा खुनी शोधून काढतो. ते पत्र लिहिल्यावर एमिली अरुंडेल मेलेली असते. म्हातारपणी जिन्यात पाय ठेचकाळून ती पडणं आणि मरणं अशक्य नसतं. मोलकरणीनं मालकिणीचं अखेरचं काम करायचं म्हणून हे पत्र पोस्टात टाकलेलं असतं. पण त्यातलं रहस्य जाणून ते उघड करायचं आपलं कर्तव्य आहे, असं समजून पॉयरॉ ते पार पाडतोही.

बुद्धिमत्तेचा अभिमान

पण "विद्या विनयेन शोभते" हे मात्र त्याला पूर्णपणे नामंजूर आहे. आपल्या बुद्धिमत्तेचा त्याला अभिमान आहे. " हरक्यूल पॉयरॉ कधी चूक करीत नाही " असा त्याचा विश्वास आहे. एकदा एका गुन्ह्याच्या वेळी चूक केली होती त्याला पंचवीस वर्षांहून अधिक काळ गेला असा तो हवाला देतो. "लॉर्ड एजवेअर डाइज" मधला पॉयरॉ आणि हेस्टिंग्ज मधला संवादच पहाः

"हेस्टिंग्ज, तुला नेहमी वाटतं की मी गर्विष्ठ मनुष्य आहे. पण तसं अजिबात नाही. खरं तर मी अगदी साधा सरळ माणूस आहे!"

"तू आणि साधा सरळ ?"

फक्त एवढंच आहे की त्याला स्वच्छतेचं वेड आहे. विश्वास बसणार नाही इतका नीटनेटका पोशाख तो घालतो. एवढंच नाही तर हेस्टिंग्जनं त्याचं वर्णन केलं आहे " धुळीचा एक कण अंगावर पडला तर त्याला बंदुकीची गोळीने होणाऱ्या जखमेपेक्षा जास्त वेदना होतात. त्याच्या मिशांचा त्याला अभिमान आहे कारण अख्ख्या इंग्लंडमधे अशा छान मिशा आणखी कोणाच्याही नाहीत."

त्यानं लग्न केलं नाही तरी त्यानं प्रेम केलं आहे. कॉंटेस व्हेरा रजाकोफच्या तो थोडीथोडकी नाही तर तीस वर्षे प्रेमात आहे.

पॉयरॉच्या निरीक्षणांवर त्याच्या संशोधनाचा इमला उभा असतो. त्यामुळे विचारांत बुडल्यावर तीक्ष्ण अशा पॉयरॉच्या डोळ्यांवर हिरवट छटा येते. परंतु निरीक्षण म्हणजे हाताचे, पावलांचे ठसे घेणं, भिंगातून ठसे तपासणे, सिगारेटची थोटकं गोळा करणं यावर त्याचा विश्वास नाही. तो त्याची रेवडी उडवतो.

अगाथाची दृष्टी

खून करणं ही कला आहे आणि शास्त्र आहे असं त्याचं मत. अर्थात तो त्याला उत्तेजन मात्र देत नाही. काही वेळेला आपल्या तर्कशास्त्रानं धोका ओळखून लोकांना त्यानं वाचवलंही आहे. अगाथा ख्रिस्ती स्वतः रहस्यकथा आणि खून याकडे याच दृष्टीनं पहात असावी.

गुन्ह्याच्या वेळी हजर असणं पॉयरॉला शक्य नसलं तरी गुन्हेगाराच्या मनांचा, त्यांच्या प्रवृत्तींचा व त्याला गुन्ह्याला प्रवृत्त करणाऱ्या कारणांचा खोलवर विचार करून पॉयरॉ अखेर गुन्हा घडतो त्या घटनेची आपल्या मनात पुनर्निर्मिती करतो. बऱ्याचदा संशयितांना एकत्र बोलावून गुन्हा असा घडत गेला असं सांगून "हा तो गुन्हेगार" म्हणून बोट दाखवायला त्याला आवडतं.

मॉनॉमी, मॉं दा - माझ्या मित्रा, माझ्या देवा या फ्रेंच उद्गारवाचक शब्दांचा वापर येता जाता करणारा हा डिटेक्टिव्ह इंग्लंडमधे चांगला रुळला आहे. त्याला चांगलंचुंगलं खाण्याचं आणि खिलवण्याचं वेड आहे. त्यामुळे उत्तमोत्तम हॉटेलात त्याचा वावर असतो.

अगाथाच्या शेवट शेवटच्या पुस्तकांपैकी आहे "कर्टन". वार्धक्यामुळे सांधेदुखीचा त्रास जाणवत असतानाही पॉयरॉ गुन्हेगार शोधायला येतो. यात हरक्यूल पॉयरॉनेच खून केलेला तिनं दाखवलाय. "कर्टन" मधेच हरक्यूल पॉयरॉचा मृत्यू होतो. तो हेस्टिंग्जला त्या केसची माहिती देण्यासाठी पत्र लिहून ठेवतो.

शेरलॉक होम्सनंतर जगभर लोकप्रियता मिळालेल्या डिटेक्टिव्हज् च्या आयुष्यावर "कर्टन" मधे पडदा पडला. तेव्हा "न्यूयॉर्क टाइम्स"नं पहिल्या पानावर त्याच्यावर अग्रलेख लिहून अगाथा ख्रिस्तीच्या या मानसपुत्राचा सन्मान केला होता.

केसरी, रविवार, दि. १२ जानेवारी १९८६


मुख्यपान Homepage

संपर्क

आमच्याशी संपर्क साधाः
मुख्यपान Homepage Contact us here:
myemail

लेखकः मानसी मोकाशी