शाळा सुरू झाली तरी सुट्टीतली सिमल्याची सहल अमितच्या मनात रेंगाळत होती आणि तो मार्चमधला "ख्रिसमस" ही.
अमितला खरं म्हणजे डिसेंबरमधेच सिमल्याला जायचं होतं. बर्फात खेळायचं, बर्फाचे गोळे नवीनच्या अंगावर मारायचे आणि पुण्याच्या उन्हाळ्यात आइस्फ्रूटचं बर्फही अंगाला लावल्यावर "ओय् ओय्" करून ओरडणाऱ्या नवीनला खूप सतावायचं अशी स्वप्नं तो पहात होता. पंधरा दिवस खूप मजा करायची, परत आल्यावर खूप खूप अभ्यास करायचा असं त्यानं ठरवलं होतं.
त्याच्या आई बाबांनीही अमितला नको म्हटलं नव्हतं. पण शाळा ! शास्त्राचा मागे पडलेला भाग पाटील सरांनी नाताळच्या सुट्टीत रोज एक-दोन तास घेऊन भरून काढायचं ठरवलं होतं. त्यामुळे अमितच्या सिमल्याला जायच्या स्वप्नावर पाणी पडलं होतं.
"अरे, त्यात काय आहे ! मार्च अखेर परीक्षा झाल्या की मग जा. नवीनचे आई वडील अजून वर्षभर तरी सिमल्याला राहणार आहेत." असं म्हणून बाबांनी त्याची समजूत घातली. पण मार्चनंतर बर्फ थोडंच पडणार आहे ? नवीननं ख्रिसमसचं निमंत्रण केलंय, ते तर वायाच जाणार ! म्हणून अमितला वाईट वाटत होतं.
अखेर परीक्षा संपल्यावर अमित सिमल्याला जायला निघाला होता. परीक्षा आटोपल्याबरोबर स्वारी मार्चच्या तिसऱ्या आठवड्यात सिमल्याच्या वाटेवर होती. अमितच्या काकांनी दिल्लीला त्याला उतरवून घेऊन सिमल्याच्या गाडीत बसवलं होतं. दोन दिवस त्यानं आपल्याबरोबर दिल्लीला राहावं असं त्यांना वाटत होतं. पण नवीनला कधी भेटतो आणि वर्षभरातल्या गमतीजमती सांगतो असं अमितला झालं होतं.
" अरे, त्या गटाणे सरांच्या तासाला नं, एकदा एक मांजरच उंदीर तोंडात धरून घेऊन आलं, आणि अरे पम्याला पायाला कुत्रं" चावलं." "मी पोहण्याचा चँपियन आहे यंदा !" अशी अमितची आणि नवीनची स्टेशनवर भेटल्यापासून बातम्यांची देवाणघेवाण सुरू होती.
"काय रे तुमच्या सिमल्याच्या वाटेवरची स्टेशनं ? पेशवे पार्कातल्या फुलराणीच्या स्टेशन एवढी वाटतात !" अमितनं नवीनला म्हटलं. "इटुकली पिटुकली स्टेशनं" म्हणून नवीनची लहान बहीण मिनी टाळ्या वाजवून नाचायला लागली तेव्हा घरी गेल्याबरोबर माझ्या खोलीत बसूया, म्हणजे या इटुकल्याची कटकट नको म्हणून नवीननं "च च्या भाषेत" सांगून आपला मोठेपणा गाजवला.
आता स्टेशनाबाहेर रिक्षा किंवा गेला बाजार टांगा तरी मिळेल म्हणून अमितनं इकडे तिकडे बघितलं. तेव्हा नवीनच्या वडिलांनी " इथे गाड्या सर्रास चालवायला परवानगी नाही, घरी चालत जाऊ या" म्हटलं तेव्हा अमित थोडा हिरमुलला होता. हवेत चांगलाच गारवा होता, पण तरी चढण चढून त्याच्या कपाळावर घाम जमा झाला होता.
घरी गेल्यावर नवीनच्या आईनं घरातल्या शेकोटीजवळच्या टेबलावर गरम गरम चहा करून आणला तेव्हा अमितला खूप बरं वाटलं.
अमित बराच उंच झालेला दिसतोय. पण लुकडोजी आहे. या थंडीत बारीक माणसांना एक स्वेटर जास्त घालावा लागतो बरं का ! असं म्हटलं, तेव्हा त्याला जाणवलं, बाहेरचं निसर्गरम्य दृष्य बघताना आपण बरोबरचा पूर्ण बाह्यांचा जाड स्वेटर चढवलाय आणि तरीही थंडी वाजत्ये. तीही सकाळी दहा साडेदहाला. ही शेकोटी पेटवली तरी चालेल असाही विचार त्याच्या मनात येऊन गेला.
वर्षभराच्या गप्पागोष्टी दिवसभर करून रात्री अंथरुणावर पडल्यावर अमित नशिबाला शाबासकी देत होता. "बरं झालं आत्ता आलो म्हणून ! थंडीचा कडाकाही सुटला. डिसेंबरमधे आपलंच बर्फ झालं असतं ! अर्थात नवीनच्या घराच्या भिंतीला भिंत लागून राहणाऱ्या बिनीच्या नाताळच्या वर्णनावरच भागवावं लागत होतं, पण जाऊ दे ! आपल्याला यायला मिळालं. हे ही नसे थोडके !" असा विचार करून अमितनं पायालागतची दुलई अंगावर ओढून घेतली.
पाहाता पाहाता चार दिवस भुर्रदिशी उडून गेले. आपल्या नाकाचा शेंडा बर्फासारखा गार झाल्याचं अमितला अाश्चर्य वाटेनासं झालं. स्वेटरचा डगला अंगावर असल्यावर आपल्या शर्टवरचं हौसेनं करून घेतलेलं डिझाइन दिसत नाही, याची खंत मात्र त्याच्या मनात होती.
शनिवार उजाडला. तोही काही वेगळी हवा घेऊन आला. सकाळीच बाहेर पडलेल्या अमित, नवीन आणि बिनीला अचानक आलेल्या पावसामुळे दुकानात आसरा घ्यावा लागला होता. " ही हिलस्टेशनांची हवा अशीच, कधी पाऊस येईल नेम नाही." असं एकानं म्हटल्यावर, दुकानदारानं " छे, आता कुठला बर्फ " असं म्हणून त्याचं विधान झटकूनही टाकलं.
पाऊस थांबल्यावर लक्कडबझार कडे चक्कर मारावी आणि घरी, मित्रांना छोट्या छोट्या लाकडी वस्तू घ्याव्यात म्हणून ती पुढे निघाली. वाटेत बिनीला त्याच्या आईवडीलांच्या मित्राला निरोप सांगायचा होता. निरोप सांगता सांगता बिनीच्या चाचाजींच्या आग्रहाला नाही म्हणता येत नाही म्हणून ताजी "जिलेबी" खाण्यासाठी त्यांना थांबावं लागलं.
तेवढ्यात पाऊस सुरू झाला होता. गारवा वाढत होता. चाचाजींनी दिलेल्या दोन छत्र्यांमधून तीन डोकी निघाली.
पावसातून दुकानात आणि खरेदीसाठी एका दुकानातून दुसरीकडे जाताना पावसाच्या थेंबाऐवजी पांढरं कापसासारखं काहीतरी पडताना त्यांना जाणवलं आणि बिनी ओरडला, "इट्स स्नोइंग ! बर्फ पडतोय्!"
बर्फ ! पांढरं पांढरं पिठासारखं बर्फ. प्राजक्ताचं झाड हलावं आणि त्याच्या फुलांच्या पाकळ्या वाऱ्याच्या झोतानं इकडे तिकडे पसराव्यात किंवा कापसाचं बोंड झाडावरच उघडावं आणि कापसाचे कण वाऱ्यावर उडावेत तसं दिसत होतं. फक्त फरक एवढाच, एका पाकळीत शेकडो बर्फाचे कण राहिले असते, एवढे ते लहान होते.
बघता बघता जमीन पांढरी झाली, आणि नवीननं परतायचं ठरवलं. त्यांची पावलं झपाझप पडत होती. पण त्याहून वेगानं त्या बर्फानं झाडांचा, जमिनीचा ताबा घ्यावा इतकी ती पांढरी झाली.
थंडी मी म्हणत होती. कोटाच्या खिशात एक हात खुपसून रुमालानं दुसऱ्या हाताला ऊब देऊन त्या हातानं कशी बशी छत्री सावरत हे त्रिकूट निघालं.
बर्फ पडायला लागल्यावर त्यांना जाणवलं, आपण घरापासून खूपच लांब आलो आहोत. बुटाच्या तळव्याला बर्फ चिकटून येतंय, आणि नवं पाऊल टाकताना पाऊल फसकन आत घुसतंय, बुटांचे मोजे ओले होऊन चावरी थंडी पायाला झोंबत्ये !
फक्त बिनीजवळ स्कार्फ होता. तो त्यानं गळ्या भोवती लपेटून घेतला होता. तिघांना दोन छत्र्या पुरत नव्हत्या. "नवीन, घरी जायचा हा शॉर्टकट मी घेतो. अमित पाहुणा आहे. त्याला या थंडीची सवय नाही. तुम्ही ही छत्री घेऊन जा " म्हणून बिनीनं उत्तराची वाट न बघता धूम ठोकली.
बर्फ पडायला लागून अर्धा तास होऊन गेला होता. रस्ता, गटार, व खड्डे बर्फानं अशा खुबीनं झाकले होते की पाय टाकताना तो आपण रस्त्यावरच टाकत आहोत की नाही याचा संभ्रम पडावा.
कणकण पडणाऱ्या बर्फाच्या खालच्या थराची गुळगुळीत लादी झाली होती. काय झालं हे कळायच्या आतच नवीननं पाहिलं, घाईघाईनं जाणाऱ्या बिनीचचा पाय घसरला होता. तो घसरत घसरत दहा हातावरच्या झुडुपात जाऊन अडकला होता.
अमित आणि नवीन बिनीजवळ जाऊन पोचले तेव्हा त्यांना दिसलं, त्या झुडुपानं बिनिच्या चेहऱ्यावर आणि हातावर ओरखडे काढले होते, आणि तो बेशुद्ध झाला होता.
नवीन आणि अमितनं बिनीला बसता केला. ओला झालेला स्कार्फ त्याच्या तोंडावर आला होता. तो बाजूला केला आणि अमितनं बिनीला खांद्यावर उचललं. नवीननं एक छत्री त्याच्यावर धरली.
नवीन तसा मध्यम बांध्याचा. पण बिनी खूपच छोटेखानी, आणि म्हणूनच या त्रिकूटातल्या सणसणीत वाटणाऱ्या अमीतनं त्याला खांद्यावर टाकलं. अर्थातच इतकं ओझं घेऊन चालणं सोपं नव्हतं.
पाचेक मिनिटं चालून गेल्यावर अमितला चांगलीच धाप लागली. हातही भरून आले. पण नशिबानं बिनी शुद्धीवर आला होता. नंतरचा मार्ग त्यानं दोन्ही मित्रांचा हात धरून काटला.
ते घरी कसे पोचले हे त्यांचं त्यांनाच माहीत. घरी पोचल्यावर फरशीवर बुटाच्या तळव्याला चिकटलेल्या बर्फाच्या लादीनं नवीनला साष्टांग नमस्कार घालायला लावलं होतं.
खोलीतली शेकोटी पेटवून आजारी बिनीजवळ त्याला गमती जमती सांगत अमित आणि नवीन ती रात्र तिथेच राहिले.
पहाट झाली. कसल्याशा आवाजानं अमित जागा झाला. त्याचं बाहेर लक्ष गेलं. व्हरांड्यात एक चांदणीच्या आकाराचा आकाशकंदील चमकत होता. दार उघडलं. अमित आणि नवीनच्या पायगती लाल डगला घातलेली आणि पांढरी कापसासारखी दाढी असलेली एक व्यक्ती उभी होती. तिनं काहीतरी त्यांच्या पलंगाच्या कडेला बांधलं आणि त्यांच्या डोक्यावर थोपटून म्हटलं, " बिनीला बर्फाच्या रस्त्यातून घरी सुखरूप आणल्याबद्दल ही भेट तुम्हाला." नीट जागं होऊन काही बोलायच्या आत ती व्यक्ती निघून गेली. दार लागलं. नवीनही चकीत होऊन हे पहात होता.
अमितच्या पलंगाला नव्या कोऱ्या मोज्यात एक सुंदर रंगपेटी आणि ब्रश होते. 'भावी चित्रकारास सँटाक्लॉज कडून' असं त्यात लिहिलं होतं. नवीनच्या पलंगाला बांधलेल्या मोज्यात बाजा ठेवला होता. तोही 'सँटाक्लॉज कडून' आला होता.
"अरे ! आपण स्वप्न पाहात आहोत का ?" असं म्हणून आपल्या भेटवस्तू घेऊन ते दोघं बाहेर आले. बिनीही पाठोपाठ आला. चहा पीत बसलेल्या बिनीच्या वडिलांकडे त्यांचं लक्ष गेलं. "डॅडी, आता मला छान बरं वाटतंय" त्यानं म्हटलं. "आणि आज ही एवढी मोठी ख्रिसमस केक ममी ?"
"अमितला ख्रिसमस पहायचा होता नं, म्हणून आज बर्फ पडल्यावर मी म्हटलं, ख्रिसमस साजरा करूया. बाहेर नाताळची चांदणी चमकत्ये, ख्रिसमस केक केली आहे. " बिनीची आई म्हणाली.
"...आणि आज सकाळी सँटाक्लॉजही येऊन गेला आम्हाला बक्षीस देऊन " अमितनं हसत सांगितलं. "पण अंकल, त्या सँटाक्लॉजची दाढी तुमच्या गालावर कशी ?"
बिनीच्या वडिलांनी आपल्या गालाला हात लावून कापसाचा चिकटलेला पुंजका काढला आणि ते खो खो करून हसले.