सीताबाई अण्णिगेरी

"मी अण्णांच्या आश्रमात आल्यावर आमच्या घराला वाळीत टाकलं. म्हणून आमच्या धाकट्या बहिणीचं लग्नही जमवायला त्रास झाला." सीताबाई अण्णिगेरी सांगत होत्या. त्यांचे माहेर धारवाडचे, सासर अण्णिगेरीचे. दोन्ही घराणी जुन्या वळणाची. मुलीने शिकावे आणि घराबाहेर पडावे हे कुणाला आवडणारे नव्हते.

भाकरी बडवण्यापेक्षा शीक

पण श्री पार्वतीबाई आठवल्यांच्या स्त्री शिक्षण प्रसाराच्या सभेला त्यांचा चुलत भाऊ गेला. तो नव्या मताचा होता. शिवाय सीताबाईंच्या भावाची मेहुणी मथुराबाई उजगावकर आश्रमात होत्या. म्हणून सीताबाईंना पुण्याला पाठवण्यात आले. डिसेंबर १९०५ साली त्या दाखल झाल्या तेव्हा त्या होत्या अवघ्या बारा वर्षांच्या विधवा.

" अशा जुन्या वातावरणात तुमच्या घरची परवानगी कशी मिळाली ?" मी विचारलं. "तशी परवानगी नव्हती, पण भाऊ म्हणाला, सासरी जाऊन सोवळी होणार त्यापेक्षा शीक. आईलाही पहिल्यांदा पटलं नव्हतंच. पण ती म्हणाली की दुसऱ्याच्या घरी भाकरी बडवण्याची वेळ तुझ्यावर येऊ देऊ नको." पुढे ती माझ्याकडे मुंबईला येऊन राहिली, तेव्हा म्हणाली होती "आता तुझं हे सुख बघून मी सुखानं मरेन. "

योगायोगाने लग्न व वैधव्य

सीताबाईंच्या आयुष्यात योगायोगाला बरेच स्थान असावे. या योगायोगानेच त्यांचे लग्न जमवले. मोठ्या बहिणीला बघायला आलेल्या माणसांनी खेळणाऱ्या सीताबाईलाही पसंत केले. सख्ख्या बहिणी सख्ख्या जावा झाल्या. पण हा योगायोग दुर्दैवात बदलून संसार या शब्दाचा अर्थ कळायच्या आतच पतीला या जगातून नेले. पण नंतर मात्र त्यांना आश्रमाचा रस्ता दिसला. एवढेच नव्हे तर त्यांनी दोनदा परदेश दौरा केला.

सातवीच्या परीक्षेत पाचव्या

घरून पैशाची मदत मिळण्यासारखी नव्हती. जेवणाचे महिन्याचे पाच रुपयेही पाठवणे भावाला अशक्य होते. संस्थेनेच हा खर्च केला. त्या १९१० साली मुलांच्या सातवीच्या परीक्षेला बसल्या. (त्यावेळी मुलींसाठी सहावीची परीक्षा असे, त्याही फारच थोड्या असत.) त्यात त्या मुंबई इलाख्यात पाचव्या आल्या. पुढे न्यू इंग्लिश स्कूल नानावाड्यात त्या जात. "वर्गात फार तर दोन तीन मुली असत." त्यांनी सांगितले.

कॅलिफोर्नियात दोन वर्षे शिक्षण

१९१९ मध्ये त्या लेडी विठ्ठानसद ठाकरसींच्या कंपॅनियन म्हणून गेल्या. नऊ महिन्यांच्या परदेश दौऱ्यात त्यांनी जपान, चीन अमेरिका, इंग्लंड या देशांना भेटी दिल्या. श्रीमती ठाकरसींना तिथल्या उद्योगधंद्यात आणि प्रेक्षणीय स्थळांत रस होता. पण सीताबाईंना त्याच वेळी तिथल्या शिक्षणसंस्था डोळ्याखालून घालता आल्या. १९३२ मधे अमेरिकेतल्या मिल्स कॉलेज कॅलिफोर्निया येथे दोन वर्षांची शिष्यवृत्ती मिळवून गृहजीवनशास्त्राच्या अभ्यासक्रमासाठी त्या पुन्हा परदेशी गेल्या. "मला अंडी, आम्लेट चाले, त्यामुळे तिथे कमी अडलं." त्या म्हणाल्या. " तिथल्या मोठ्या स्त्रियांमधे मी मिसळायची. अनुभवाच्या प्रगल्भतेच्या दृष्टीनं या शिक्षणाचा उपयोग झाला. पण तिथल्या आणि इथल्या आयुष्यात इतका फरक असल्याने तितकासा उपयोग झाला नाही. तरी वेगवेगळ्या चुली वगैरे माहितीचा मी येथे शिकवताना वापर केला."

पासष्टाव्या वर्षांपर्यंत काम

परदेशच्या पहिल्या प्रवासाहून परत आल्यावर त्या एस्. एन्. डी. टी. विद्यापीठाच्या जी. ए. (गृहीतगमा) झाल्या. त्यानंतर १९२५ साली संस्थेच्या मुंबईच्या वसतीगृहाच्या सुपरिंटेंडंट व शिक्षिका म्हणून रुजू झाल्या. ते काम त्यांनी १९५८ पर्यंत वयाच्या पासष्टाव्या वर्षांपर्यंत केले.

संस्थेसाठी विमा व्यवसाय

आता निवृत्तीनंतर त्यांचे पुणे, मुंबई जाणेयेणे चालू असते. मुंबईच्या मुक्कामात त्या लाइफ इन्शुअरन्स कॉर्पोरेशनच्या एजंट म्हणून काम करतात. "तुम्ही या व्यवसायाकडे कशा वळलात ?" माझा प्रश्न. "शर्मा नावाच्या डेव्हलपमेंट ऑफिसरनी मला सुचवलं, आता रिकाम्या वेळात विम्याचं काम का नाही करत, त्यांची गाडीही मिळून हिंडण्यासाठी मदत केली." त्यांचं उत्तर. सहा जीवनविमे किंवा ४० हजारांचा विमा काढण्याची कमित कमी अट तर त्या पुरी करतातच. पण या व्यवसायतून दरमहा अडीच हजार रुपये मिळवतात. शिवाय गेली तीन चार वर्षे युनिट ट्रस्टचे ही काम करतात. त्याचे हजार बाराशे रुपये येतात. हे सर्व कमिशन संस्थेला मदत म्हणून त्या देतात. शिवाय भाऊबीज फंडाच्या त्या अध्यक्षा आहेतच.

मुलींसाठी हिंगण्यास वर्कशॉप

त्यांनी हिंगण्याच्या परिसरातच एक वर्कशॉप चालू केले आहे. येथे शाळेतल्या मुली आणि बाजूच्या गरजू स्त्रिया काम करतात. बापूराव नाइकांच्या प्रेरणेने सुरू झालेल्या या ठिकाणी मिठाईच्या पेट्या, साड्यांच्या पेट्या, फाइल्स, सरकारी पाठ्यपुस्तकांचे बाइंडिंग, किर्लोस्करांसाठी कापडी पिशव्या तयार होतात. पंधरा वीस मुलींना काम मिळते. तासाला पंचवीस तीस पैसे म्हणजे दिवसाला दोन-तीन रुपये मिळतील या हिशेबाचे पैसे दिले जातात.

संस्था व पाहुणे यांच्यातील दुवा

सुट्यांमधे कोर्ट कमिटेड मुलींचे वसतिगृह सोडून बाकीची तीन वसतिगृहे भाड्याने दिली जातात. संस्थेच्या उत्पन्नाचा एक भाग म्हणून सीताबाई पुण्याला आवर्जून रहातात. आलेले लोक पुष्कळसे मुंबईचे असतात. त्यांची वास्तपुस्त करतात. " त्या म्हणजे संस्था आणि लोक यांच्यातला दुवा आहे." सुपरिंटेंडंट बाईंनी सांगितलं. "त्यांचा सल्ला आणि आधार लाख मोलाचा वाटतो."

" त्यांना निर्वाहा पुरते वेतन आणि मानधन आम्ही देतो." भास्करराव कर्वे यांनी सांगितले. त्यांना सन्मान्य आजन्म सेविका बनण्याचा बहुमान मिळालेला आहे. याचा अर्थ निवृत्तीनंतरही संस्थेसाठी जमेल तशी मदत करण्याचा अधिकार मिळवणाऱ्या चार जणांपैकी त्या एक आहेत. श्री. व सौ. भास्करराव कर्वे ही दोघेही याच श्रेणीत मोडतात.

कानडी विसरल्या मराठी बनल्या

सीताबाईंबरोबर आवारात हिंडताना त्यांनी "मूळ झोपडी", जिथून विद्यादानाला सुरुवात झाली ती दाखवली. आपली राहण्याची जागा दाखवली. ज्या विहिरीच्या पाण्यावर त्यांना अवलंबून रहावे लागे ती जागा दाखवली. (आता विहीर बुजवलेली आहे.) "तेव्हा असं नव्हतं... " असे त्या सांगत होत्या भूतकाळात जात होत्या. आल्यावेळी मराठी भाषा न येणाऱ्या सीताबाई अस्सल मराठी झाल्या होत्या. कानडी जवळजवळ विसरल्या आहेत. त्यांच्या समोर संस्थेचा विस्तार झाला. त्याचा अभिमान त्यांच्या शब्दाशब्दातून व्यक्त होतो. त्यांनी दीर्घायुरारोग्य लाभो हीच इच्छा !


मुख्यपान Homepage

संपर्क

आमच्याशी संपर्क साधाः
Contact us here:
myemail

लेखकः मानसी मोकाशी