"अनंत हस्ते कमलावराने, देता किती घेशिल दो कराने !" या ओळी आपण देवाने दिलेल्या सुखांच्या बाबतीत वापरतो, पण आपल्या देशातली रोगी, दरिद्री लोकांची परिस्थिती पाहिली तर त्या देवाने अनंत हस्ते दिलेल्या दुःखापुढे लोक पिचून जातात असेच दिसेल. या पीडितांना मदत देण्याचे काम "आरोग्य मंडळ" या पुण्याच्या संस्थेने अंगिकारले आहे.
पुण्यासारख्या मोठ्या शहरात दवाखान्यांची आणि डॉक्टरांची काही कमतरता नाही. पण लोकसंख्येच्या दृष्टीने विचार केला तर हे उपचार करणारे कमी पडतातच, शिवाय त्यांना मोबदला द्यायला जे हातातोंडाची गाठ कशीबशी घालतात त्यांचा खिसा कमी पडतो. म्हणून त्यांना मदत करायला डॉक्टर लोक "आरोग्य मंडळाच्या" दवाखान्यात भेटी देतात - मोबदला न घेता.
या संस्थेच्या स्थापनेची कल्पना मुळची डॉ. म्हसकरांची. आता डॉ. भट, घैसास, पराडकर मदत करतात. लहान मुलांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी "चिल्ड्रेन्स सेंटर" स्थापावे म्हणून "बॉंबे मदर्स अँड चिल्ड्रन्स एसोसिएशन" कडून त्यांनी मदत मिळवली आणि हे केंद्र सुरू झाले १९१४ साली. ते १९२७ पर्यंत चालले. नंतर १९३३ मधे लहान मुले आणि गरोदर स्त्रियांसाठी दूध केंद्र चालू केले. आता संस्था तीन ठिकाणी केंद्र चालवते. रविवार व कसबा पेठेत दवाखाने आणि दूध केंद्रे व गांजेवाडी येथे दूध केंद्र. सकाळी साडे आठ ते दहा ही दूध केंद्राची वेळ असते. दवाखाना संध्याकाळी ५ ते ७ असतो.
"दूध केंद्रामधे दूध देण्यासाठी आम्ही सहा वर्षांखालील मुलाची निवड करतो. " डॉ. वैद्य सांगत होते. "शिवाय जरूर असेल तेव्हा गरोदर स्त्रियांनाही दूध देतो. अर्थात इतर वेळी आजारी, वृद्ध व गरीब यांचा परिस्थिती प्रमाणे विचार केला जातोच."
कसब्यातल्या दूध केंद्रात पार्वतीबाई नवलकर आणि सौ. पुष्पा बिडवे दूध केंद्राचे काम करतात. अर्थात व्यवस्थापकांचे लक्ष असतेच. सौ. राणी काळभोर ही कसब्यात राहणारी स्त्री, मुलाला मुडदूस झाला म्हणून उपचारासाठी आणते. शिवाय सकाळी दूध पाजायलाही. तिच्या घरातले बावीस लोक दोन खोल्यात राहतात. नवरा वाकडेवाडीला रिक्षा चेकिंगचे काम करतो. मुलाच्या वजनात उपचारांनंतर चांगला फरक पडला आहे.
केंद्राच्या हेल्थ व्हिजिटर त्या पेठेत आठवड्यातून तीन दिवस गृहभेटी देतात. रविवारची सुटी सोडून जवळ जवळ दिवसभर त्यांचे काम चालते. दुपारी चार ते पाच ही त्यांची गृहभेटींची वेळ. बरोबर आयाला घेऊन त्या हिंडतात. मदत होते आणि सुरक्षिततेच्या दृष्टीनेही बरे पडते. घरची परिस्थिती, घरातील माणसांचा आकडा, उत्पन्न, कुटुंबनियोजन या बाबत त्या प्रश्न विचारतात. साधारण महिना दोनशे किंवा त्यापेक्षा कमी उत्पन्न असणारे लोक मदतीला पात्र ठरता.
" लोक माहिती द्यायला सहसा त्रास देत नाहीत कारण त्याचा फायदाच होतो." डॉ. वैद्य म्हणाले. पाहणीप्रमाणे कुटुंबनियोजनाच्या प्रसारामुळे नियोजन करणाऱ्यांचे प्रमाण वाढते आहे. साधने वापरण्यापेक्षा ऑपरेशन करणे लोक जास्त पत्करतात. " खरं तर पुरुषांचे ऑपरेशन सोयीचे. पण ९८ टक्के केसेसमधे स्त्रियांचे ऑपरेशन झालेले दिसते. पुरुषांना यासाठी उद्युक्त केले पाहिजे. आम्ही सल्ला तर पुरुषांनाही देतो. पण लोकांची समजूत अशी की हा दवाखाना फक्त स्त्रिया व मुले यांच्यासाठीच आहे. त्यामुळे पुरुष फारच कमी येतात."
"कॅथॉलिक रिलीफ केंद्राच्या मदतीने दूध केंद्रातील दूध एक औंस प्रत्येकी येथेच देण्यात येते. नाहीतर मुलांसाठी दिलेले दूध घरी नेऊन त्यांना लोक चहा पाजायचे." डॉ. वैद्य म्हणाले, "सध्या येथे ६५ मुले व एक गरोदर स्त्री दुधासाठी येतात. मुलांची वजने उंची, साधारण प्रकृति याची दर महिन्याला तपासणी होते. "
केंद्राच्या कार्याचा प्रसार व्हायचा तर आधी प्रचाराची जरूरी आहे म्हणून कार्तिकी एकादशीच्या वेळी वीस सभासद आळंदीला जाऊन प्रथमोपचार, लस टोचणी व आरोग्य विषयक चित्रपट दाखवणे ही कामे करतात. प्रथमोपचाराचे वर्ग फॅक्टऱ्यांतील कामगारवर्गांसाठी चालवले जातात. गहू, सोयाबीन तेल व अमेरिकन कपडे या आलेल्या देणग्यांचे वाटपही केले गेले. "अमेरिकेहून झगे आलेले ! काय करणार यांचे ?" शेवटी ते फाडून मुलांचे कपडे शिवायला आम्ही सांगितले." मला सांगण्यात आले.
रुग्णाच्या शुश्रृषेसाठी लागणारी उपकरणेही डिपॉझिट आणि दर दिवासाला दहा पैसे या दराने भाड्याने दिली जातात. औषध ४० पैसे मोठ्या माणसाला, २५ पैसे लहान मुलाला आणि इंजेक्शन देण्याचे ५० पैसे घेतले जातात. आम्हाला स्टाफ ठेवायचा असतो. आम्ही तर काहीही मोबदला न घेता काम करतो. पण स्टाफचे ते उदरनिर्वाहाचे साधन आहे. त्यासाठी दर आकारणे भाग पडते. " असे चालकांचे म्हणणे. दवाखान्यात काम करणाऱ्या डॉक्टरांना दर वेळी जाण्या येण्यासाठी एक रुपया दिला जातो.
कसब्यातल्या जागेचे, रविवारातल्या जागेचे भाडे द्यावे लागते. संस्थेच्या साठ वर्षे पूर्ण होण्याचे वेळी म्हणजे ७४ साली संस्थेची इमारत असावी अशी कल्पना आहे. काम चालू राहण्याचे दृष्टीने दाट लोकवस्तीच्या ठिकाणी ती असणे जरूर आहे. म्हणजे तर जास्त पैसा हवा. एक ओनरशिप फ्लॅट घेऊन तिथे केंद्र व ऑफिस चालवावे " अशी त्यांची इच्छा आहे. चॅरिटी शो, मिळणाऱ्या देणग्या, सरकारी व कॉर्पोरेशनची ग्रँट मदत करतात. पण या देणग्या अपुऱ्या आहेत. देणगीदारांची आज संस्थेला गरज आहे.
"पैशाबरोबरच, काम करणारेही हवे आहेत. आम्ही निम्म्यापेक्षा जास्त लोक साठ पेक्षा जास्त वयाचे. तरुणांवर जबाबदारी टाकायला आम्ही तयार आहोत पण पुढे येणारे तरूण कमी. कुणी आलेच तर फार दिवस टिकत नाहीत. " अशी या सेवाव्रत पाळणाऱ्या डॉक्टरांची तक्रार आहे. अर्थात आहे त्या परिस्थितीत काम करण्याचे त्यांचे धैर्य उल्लेखनीय असले तरी जास्त वेळ व कष्ट घेण्याची जरूरी आहे असे वाटते.