टेलिव्हिजनचा आद्य संशोधक जॉन बेअर्ड

१९१७ साली जॉन बेअर्ड

टेलिव्हिजन हा भारतात जरी नवागत असला तरी पाश्चात्त्य जगाच्या तो आता चांगलाच अंगवळणी पडला आहे. आपण सिनेमा, रेडिओ जितक्या सहजपणे पाहातो, ऐकतो, तितक्याच सहजपणानं टेलिव्हिजन पश्चिमेकडे वापरला जातो. टेलिव्हिजनची त्यांची नवी नवलाई संपली. कारण टेलिव्हिजनचा पहिला जाहीर कार्यक्रम झाला तो २७ जानेवारी १९२६ साली. म्हणजे जवळ जवळ पन्नास वर्षांपूर्वी.

बालपण

या आधुनिक माध्यमाच्या क्षेत्रात बऱ्याच लोकांनी संशोधन केलं असलं तरी त्याच्या यशस्वी शोधाचं श्रेय जॉन लोझी बेअर्डकडे जातं. वयाच्या बाराव्या वर्षी या बाळानं टेलिफोन त्यार करायचा प्रयत्न केला. हिरे तयार करणं, मुरांबे विकणं, तब्बेत सुधारायला वेस्ट इंडीजला गेल्यावर परत येताना आणलेली आंब्याची चटणी, पेरूची जेली, चिंचेचं सरबत लोकांच्या गळी उतरवणं, ऑस्ट्रेलियन मध गोळा करून झाल्यावर साबणाच्या क्षेत्रात नाक घालणं-- एवढे सगळे उद्योग केल्यावर तो हलती चित्रं पडद्यावर घ्यायच्या उद्योगाला लागला ...आणि यशस्वीही झाला.

जॉन बेअर्ड याचा जन्म १३ ऑगस्ट १८८८ मधला. रॉयल टेक्निकल कॉलेजमधे शिक्षण घेऊन त्यानं ग्लासगो विद्यापीठात अभ्यास केला होता. असिस्टंट मेन्स इंजिनिअर म्हणून काम करीत असताना आपला अनुभव सांगताना तो म्हणतो, "बिघडलेल्या केबल्समधला दोष शोधून काढण्यासाठी रात्र रात्र पावसा-थंडीत उभं राहावं लागे. पैसै मिळवण्याची तर जरूर होती. तब्बेत तर फ्लू आणि सर्दीपडशानं जास्तच खराब होत होती ". म्हणून त्यानं ही नोकरी सोडली आणि वर वर्णन केलेले अनेक उद्योग करत करत आपल्या खऱ्या उद्योगाकडे - टेलिव्हिजनच्या संशोधनाकडे वळला.

प्रयत्न

आज दिवाणखान्यात डौलानं उभे असलेले टेलिव्हिजनचे विविध प्रकार पाहून यांचा पूर्वज कसा होता याची कल्पना आपल्याला येणार नाही. बेअर्डनं या टेलिव्हिजनच्या प्रयोगांना सुरुवात केली ती चहाचं खोकं, हॅट ठेवायचं खोकं, शिवायच्या सुया, सायकलच्या दुकानातली लेन्स, मेण आणि डिंक या साधनांनी. फेअर लाइट ग्लेन नावाच्या ठिकाणी एकटाच येरझारा घालत असताना त्याला टेलिव्हिजनच्या कल्पनेनं पछाडलं, आणि हेस्टिंग्ज या ठिकाणी त्यानं आपल्या प्रयोगांना सुरुवात केली.

त्यानं सुरुवातीला वापरलेल्या प्राथमिक गोष्टींमधे विजेरी (electric battery), व्हाल्व, ट्रान्सफॉर्मर वगैरे गोष्टींची भर पडली. त्यांच्या साहाय्यानं एका छोट्या क्रुसाची प्रतिमा काही फुटांवर असलेल्या पडद्यावर घेण्यात तो यशस्वी झाला. एकदा काही वायर जोडण्याच्या कामात तो गुंतला होता. कसं कोण जाणे, त्याचं लक्ष क्षणभर का होईना दुसरीकडे गेलं. आणि दोन हजार व्होल्टच्या त्या विजेच्या धक्क्यानं तो धाडकन् कोसळला. नशीब बलवत्तर म्हणूनच तो वाचला. रस्त्यावरून जाणाऱ्यांनी आवाज आणि विजेचा उजेड पाहून त्याच्या घरात येऊन मदत केली. पण त्याला घरमालकानं घर सोडायची नोटीस दिली. त्याला दुसरीकडे जागाही पाहावी लागली. पण माणसाला प्रसिद्धी मिळाली की जग त्याच्या पायावर डोकं ठेवतं हेच खरं. बेअर्ड मोठा ठरल्यावर हेस्टिंग्जच्या लोकांनी जिथे त्यानं हा प्रयोग केला त्या जागी जंगी पाटी लावली. " १९२४ साली प्रयोग सुरु करून जॉन बेअर्डने टेलिव्हिजनचे पहिले प्रात्यक्षिक येथे केले."

पुढचे प्रयोग

बेअर्ड आणि त्याचा भावला-बिल

क्रुसाची प्रतिमा बेअर्डने पडद्यावर घेतली. पण त्याच्या प्रगतीतला हा पहिला टप्पा होता. टेलिव्हिजनने लोकांना आकर्षित करण्यासाठी माणसांची चित्र पडद्यावर दिसणं आवश्यक होतं. म्हणून जॉननं माणसासारखा दिसणारा "बिल" हा एक भावला तयार केला आणि पत्रकारांना बोलावून त्यांच्यासमोर बिलची प्रतिमा पडद्यावर घेण्याचं प्रात्यक्षिक केलं. याच्याही पुढे जाऊन त्याला जिवंत माणसांवर हा प्रयोग करायचा होता. त्याच्या प्रयोगशाळेच्या खालीच असलेल्या दुकानातल्या एका पंधरा वर्षांच्या मुलाला त्यानं बोलावून घेतलं. ट्रान्समिटरच्या समोर त्याला उभं केलं, आणि पलीकडच्या खोलीतल्या पडद्यावर काय दिसत आहे हे पाहिलं. पडदा कोराच ! काय झालं हेच जॉनच्या प्रथम लक्षात येईना. पण विल्यम टेन्टनकडे, त्या दुकानातल्या पोऱ्याकडे पाहिल्यावर त्याच्या लक्षात खरा प्रकार आला. जॉनच्या यंत्राकडे पाहून तो इतका घाबरला की जॉनची पाठ फिरताच तो मागे सरकत इतका दूर गेला की त्याची प्रतिमा पडद्यावर येणं शक्यच नव्हतं. जॉननं टेन्टनची भीती घालवली. त्याच्या हातात एक नोट सरकवली. पुन्हा त्याला ट्रान्समिटरजवळ नेलं. प्रयोग यशस्वी झाला. टेन्टन हा टेलिव्हिजनवर दिसलेला पहिला मानव ठरला.

हे प्रयोग करताना पडद्यावर येणारी प्रतिमा फार लहान होती. क्रुसाची प्रतिमा आली होती एक चौरस इंच क्षेत्रफळाच्या आकाराची. नंतर त्या प्रतिमांचा आकार मोठा झाला. सिगारेटच्या पाकिटाच्या आकारानंतर तो पोस्टकार्डाएवढा मोठा झाला. आता अर्थातच आपल्याला हव्या तशा वेगवेगळ्या आकाराच्या पडद्यांचे टेलिव्हिजन मिळतात.

उदघाटन

टेलिव्हिजनचे उदघाटन करताना इंग्लंडच्या पोस्ट मास्टर जनरलला इतकं रंगावं लागलं की वैतागून त्यानं म्हटलं, की उदघाटनाचं भाषण करण्यासाठी तोंड रंगवून घेणारा उदघाटक मीच पहिला असेन. या रंगरंगोटीशिवाय प्रेक्षकांना दिसणारी व्यक्ती नीट दिसत नसे. त्यामुळे स्टुडिओतल्या लोकांचा या बाबतीत नाइलाज होता. या रंगसंगतीवर इतकं लक्ष ठेवावं लागे कारण काही विशिष्ट रंगाचे कपडे घालून टेलिव्हिजनच्या कॅमेऱ्यासमोर लोक गेले तर ते कपडे प्रेक्षकांना दिसत नसत. त्यामुळे तिथल्या निवेदिकेला चेहरा पिवळा व भुवया निळ्या रंगवाव्या लागत.

बेअर्ड कंपनी

बेअर्ड कंपनीच्या पाचव्या वार्षिक सभेच्या वेळी अध्यक्ष हॅरी ग्रिअरनं काही मैलांवर असलेल्या क्रिस्टल पॅलेसमधून भागधारकांसाठी भाषण केलं.. आणि शेवटी ते म्हणाले "एक वेगवान गाडी दाराशी उभी आहे. भाषण संपताच मी निघतो आणि प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी तुमच्यासमोर हजर होतो. आतापर्यंत मी आपल्या समोर भाषण करीत असल्याप्रमाणे मला आपण टेलिव्हिजनच्या पडद्यावर पाहिले आहेच."

१९२७ साली रंगीत टेलिव्हिजनचं प्रात्यक्षिक करून दाखवण्यात आलं. ३० सप्टेंबर १९२९ मध्ये बी.बी.सी. च्या टेलिव्हिजनचा पहिला कार्यक्रम झाला.

मजेशीर प्रसंग

लंडनच्या प्राणिसंग्रहालयातून टेलिव्हिजनवर दाखवण्यासाठी प्राणी आणत. एकदा एकानं नवीन आणलेला सील मासा स्टुडिओत आणण्याचा बूट काढला. टॅक्सी ड्रायव्हरनं सीलचं गिऱ्हाइक आपल्या गाडीतून न्यायला नकार दिला. अखेर स्टुडिओतल्या इंजिनिअरने आपली गाडी काढली. प्राणी संग्रहालयापाशी उभ्या असणाऱ्या गाडीकडे त्या सीलनं पाहिलं. पण तीत शिरण्याचं त्याच्या मनात नव्हतं. तो चक्क परत फिरला. मग त्या सीलच्या शिक्षकानं त्याला चुचकारलं. शिक्षक गाडीत येऊन बसला तसा सील पाठोपाठ आत शिरला. ड्रायव्हरच्या मागेच सीलचं धूड बसलं होतं. ड्रायव्हरनं नंतर म्हटलं की सील ठीक आहे ना हे पाहाण्यासाठी मला मागे पाहण्याची जरूरी नव्हती. सीलच्या लांब लांब मिशा त्याच्या मानेवर मधूनमधून त्याला जाणवत होत्या. टेलिव्हिजनच्या कार्यक्रमाइतकाच लोकांना या प्रकारात रस वाटला.

आणखी सुधारणा

फेब्रुवारी १९२८ मध्ये केंटमधल्या बेअर्डच्या स्टेशननं दिलेला सिग्नल न्यूयॉर्कला उचलला गेला. बेअर्डचीच टेलिव्हिजनची पद्धत इंग्लंडच्या बी.बी.सी.नं आणि जर्मनीच्या पोस्ट ऑफिसनं उचलली. जॉन बेअर्डचे प्रयोग चालूच होते. १९२६ मध्ये इन्फ्रारेड रेंजच्या साहाय्याने धुक्यामधे स्पष्ट दिसण्याचं यंत्र (नॉक्टोव्हायजर) त्यानं शोधून काढलं. नंतर नैसर्गिक रंगामधल्या टेलिव्हिजनचा प्रयोग त्यानं यशस्वी केला. १९३९ मधे कॅथोड रे ट्यूबचा उपयोग करून रंगीत टेलिव्हिजनचं प्रात्यक्षिक त्यानं दाखवलं.

१९३७ मधे जॉन बेअर्डची यांत्रिक पद्धत (mechanical system) सोडून इलेक्ट्रॉनिक पद्धत इंग्लंडमधे उचलली गेली. पण त्यानंतरही १४ जून १९४६ ला मृत्यू येई पर्यंत "केबल अँड वायरलेस लिमिटेड" या कंपनीचा तो तांत्रिक सल्लागार होता.

सृष्टिज्ञान मासिक, मे १९७४


मुख्यपान Homepage

संपर्क

आमच्याशी संपर्क साधाः
Contact us here:
myemail

लेखकः मानसी मोकाशी