" हे..आता आपली पाळी ! शेजारच्या रॉकेटचं काल उड्डाण झालं. किती हजार किलोमिटर गेलं असेल यात्रिक १ कोण जाणे !" यात्रिक २ रॉकेटानं विचार केला. " पुढच्या आठवड्यात आपणही लांबलांब आकाशात असू. काल जमलेले लोक विचार करत होते यात्रिक २ च्या उड्डाणाच्या वेळी काय काय तयारी करायची त्याचा. शीः ! कंटाळा येईल नाही आकाशात ? आपलं सारखं एका दिशेनं उडत जायचं ! एखाद्या ग्रहावर जाऊन उतरायचं. पण तिथे तरी कुणी भेटेल गप्पा मारायला म्हणता ? छेः ! तिथे आणखी कोणी रॉकेट नाही, आणि मनुष्यही नाही. मग तिथलं शास्त्रज्ञांचं थोडं हिंडणं झालं, संशोधनासाठी फोटो काढणं झालं, की परत निघायचं !"
यात्रिक २ रॉकेटला त्याच्या मित्र रॉकेटनं - राजस १ नं सांगितलेला प्रवास आठवला आणि त्याचवेळी राजस २ तयार करणारे शास्त्रज्ञ डॉ. सहस्रबुद्धे काय म्हणाले, ते आठवलं. डॉ. सहस्रबुद्धे त्या उभ्या रॉकेटाकडे पाहून अभिमानानं म्हणाले होते, " ही अशी रॉकेटं आपण तयार करू असं कधी स्वप्नात तरी वाटलं होतं का आपल्याला लहानपणी ? आमचा चिंटू मात्र रॉकेट खेळतो आहे खेळायला. " यात्रिक २ च्या मनात विचार येत होते, " या चिंटू कडेच आपण गेलो तर..."
आणि यात्रिक २ चा आपल्यावरच विश्वास बसत नव्हता. एवढ्या मोठ्या इमारती आल्या कुठून ? ही दारं या खिडक्या, ही झाडं नेहमी एवढीशी दिसतात ! आज बघावं तर आपल्या कितीतरी पट दिसताहेत ती ! या इमारती, ही झाडं मोठी झाली, का आपण लहान झालो ?
" अरे ही झाडं, घरं मोठी नाही झाली, यात्रिक २, तू लहान झालायस्. तुला माझ्या बाबांनी घरी आणलंय. माझ्यासाठी. मला किनई, एकट्याला शाळेत जायचा कंटाळा येतो. आमच्या वर्गातला छब्या आहे, त्याच्या वडिलांचा आहे टांगा. तो टांग्यात बसून शाळेत येतो. मिनीच्या वडिलांची आहे गाडी म्हणून ती गाडीतून येते. मग मीच एकट्यानं पायी किंवा बसनं का जायचं ? "
" म्हणून मी म्हटलं, आमचे बाबा रॉकेट तयार करतात, म्हणून मला शाळेत जायला रॉकेट पाहिजे." चिंटूनं सांगितलं.
आपल्याला हवं तसं रॉकेट मिळालं, याचा चिंटूला आनंद झाला होता. तीन चार दिवसांच्या सुट्टीनंतर खरं तर शाळेत जायचं कोण जिवावर येतं ! चार घास पोटात ढकलायचे, आणि शाळेचा रस्ता धरायचा ! पण आज तसं नव्हतं. आज चपला पायात अडकवायच्या दप्तर रॉकेटमधे ठेवायचं, आणि सूं ss. रॉकेटनं शाळेत जायचं.
अकरा वाजताची शाळा होती. रोज तो साडेदहालाच निघायचा. आज पावणे अकराला निघालं, तरी चालण्यासारखं होतं. आईकडून दुपारचा खाण्याचा डबा चिंटूनं घेतला. वडिलांनी सांगितलेल्या सूचना आठवल्या. या रॉकेटमधली यंत्रणा त्यांनी चिंटूकरता सोपी केली होती. आपल्याला कुठे जायचं ते लिहून त्याची चिठ्ठी आतल्या नियंत्रकात टाकल्यावर त्याच्या मनात उभ्या राहणाऱ्या रस्त्याचं चित्र नियंत्रकाच्या पडद्यावर उमटणार होतं. तिथे यात्रिक दोन त्याला घेऊन जाणार होतं.
चिंटूनं टुणकन् उडी मारली. यात्रिक दोन मधल्या सीटवर पोटाभोवती पट्टा आवळला. पृथ्वीच्याच वातावरणात राहायचं असल्यानं वेगळ्या पोषाखाची किंवा वेगळ्या प्राणवायूची जरुरी नव्हती. नुसतं एअरकंडिशनिंग पुरेसं होतं.
समोर नियंत्रकात शाळेचं नाव लिहून त्यानं चिठ्ठी टाकायची होती. पण असं केलं तर ? हे असं छान रॉकेट आपल्याला मिळालय्, मधे नितीनच्या घरी जाऊन त्याला बरोबर घेऊन शाळेत गेलो तर ? तसंच करावं, चिंटूनं विचार केला. चिंटूनं नितीनच्या घराचं चित्र काढलं. म्हणजे दोन आडव्या रेघा आणि वर उभी रेघ. वर छपरासाठी दोन तिरक्या रेघा. चित्रकलेच्या तासाला पहिली दुसरीतली मुलं काढतात तसलं चित्र. त्या घरात त्यानं लिहिलं- " नितीनचं घर ". कारण नितीनच्या घराचं नाव त्याला कुठे आठवत होतं ?
बाजूचं स्विच दाबल्यावर त्याला कोणीतरी ढकलावं तसा दणका बसला. काचेतून धुळीचे कण उडताना दिसले, आणि त्याच्या रॉकेटनं जमीन सोडली.
यात्रिक दोन चिंटूच्या घरून निघून क्षण दोन क्षण झाले असतील नसतील, तोच पुन्हा एक दणका बसला. आपण पोचलो की काय ? रॉकेटच ते ! चिंटूनं हळूच दार उघडलं. त्याच्या नाका-तोंडात धुळीचा खकाणा उडाला. फटकन दार लावून घेऊन चिंटूनं नाक, डोळे पुसले आणि दार किलकिलं करून पाहिलं. कसला आवाज झाला ते पाहायला नितीनच्या घरातले लोक वाहेर आले होते.
चिंटूला खूप बरं वाटलं. आपल्या जवळचं रॉकेट सगळ्यांनी पाहिलं याचा त्याला आनंद झाला होता. नितीनच्या भावाच्या डोळ्यातलं आश्चर्य, त्याच्या आईनं चकित होऊन तोंडावर ठेवलेला हात बघून तो सुखावला.
" नितीनच्या आई, मी नितीनला शाळेत बोलवायला आलोय. हे रॉकेट ना, मला माझ्या बाबांनी बक्षिस दिलंय." चिंटूनं भडाभडा सांगून टाकलं.
" अरे पण नितीन नेहमी प्रमाणे संजूकडे गेला आहे. ते दोघं रोज बरोबर शाळेत जातात ना ? तो संजू आहे पतंगवेडा. दोघं गच्चीत बसले असतील पतंग उडवत. तिथेच दोघं भेटतील तुला. " नितीनच्या आईनं सांगितलं.
चिंटूची यात्रा सुरू झाली, रॉकेटमधून संजूच्या गच्चीकडे. " सरळ तिथेच जाऊन टपकावं, तशी मोठी आहे संजूची गच्ची. आपल्याला असं रॉकेटमधून येताना बघून काय चमत्कार वाटेल नितीन आणि संजूला ! " चिंटूनं विचार केला.
चिंटूनं मजेत डोळे मिटले, " लगेच पोचू सुद्धा तिथे " असं त्यानं म्हटलं. " नाहीतरी रॉकेटमधून पोचण्यात मजा आहे. इतर वेळेला असं उन्हातून चकवा मारायला आपल्याला कंटाळा आला असता. पण आज काही तंगडतोड करायची नव्हती. "
मघासारखा दणका पुन्हा बसला. तेव्हा चिंटूला कळलं, संजूची गच्ची आली. या वेळेला तो त्या दणक्याला सरावला होता. ती पोचल्याच खूण होती.
त्यानं दहा आकडे मोजून दार उघडलं. पण असं करायची काय जरूर होती ? बाहेर माती थोडीच होती ? तो तर सिमेंट कॉक्रीटच्या गच्चीवर उतरला होता.
चिंटूनं इकडे तिकडे पाहिलं. संजू आणि नितीनला हाका मारल्या पण ओ नाही. मग त्यानं गच्चीजवळच्या खोलीचं दार वाजवलं, वर लक्ष जातं तो काय ! खोलीचं दार बंद होतं. जाळीच्या दाराला आतून कुलूप होतं. भलं मोठं कुलूप. हा काय प्रकार ? खालीही कुलूप लावून सगळे जण बाहेर गेले होते की काय ? इथे येऊन संजूबरोबर नितीन पुढे शाळेत गेला की काय ? चिंटूला काही कळेना.
तेवढ्यात खालून गच्चीकडे पहात संजू आणि नितीन अंगणात उभे असलेले दिसले. चिंटूचं डोकं गच्चीवर पाहून ते आणखीच चक्रावले. हे काय ? आकाशातून जोरात काही तरी खाली येताना दिसलं, आणि ते काय आहे, ते बघायला यावं, तो हे रावसाहेब गच्चीवर दिसताहेत ! आहे तरी काय प्रकार ? आणि आजोबांनी तर गच्चीला कुलूप लावलंय कालच.
" अरे चिंट्या, तू वर कसा ? " संजूनं डोळ्याला चष्मा लावत तो गच्चीवर दिसणारा आकार म्हणजे चिंटूच आहे, याची खात्री करून घेत म्हटलं. " संजा, लेका दार उघडून वर ये ! मी काय आणलंय ते बघ तरी ! " चिंटूनं ओरडून सांगतलं.
चिंटूनं काय आणलंय्, आणि तो अलगत गच्चीवर कसा आला, ही प्रश्नचिन्हं डोक्यात घोळवत संजू आणि नितीन गच्चीजवळच्या खोलीच्या गजाच्या दाराशी आले. दाराला कुलूप होतं. त्यामुळे गच्चीवर जाता येत नव्हतं. पण गजामधल्या फटींना डोळे लावून त्यांनी पाहिलं.
रॉकेटवर हात ठेवून चिंटू शेजारी ऐटीत उभा राहिला. " तुम्हाला दोघांना शाळेत घेऊन जाण्यासाठी आलोय रॉकेटमधून. " चिंटूनं सुरुवात केली. चिंटूकडून रॉकेटची हकीकत ऐकून संजू-नितीनला त्यात कधी बसतो असं झालं होतं. पण मधे कुलूप लावलेलं दार होतं. नातवंडांनी साराव वेळ पतंग उडवण्यात घालवू नये म्हणून आजोबा गच्चीच्या दाराला कुलूप लावून किल्ली स्वतःच्या खिशात ठेवून बाहेर गेले होते.
शेवटी, चिंटूनं रॉकेट घेऊन खाली उतरायचं, आणि मग तिघांनी शाळेत जायचं असं ठरलं. पण आता पर्यंत चिंटूनं रॉकेट फक्त वरून खाली उतरवलं नव्हतं. बाबांनी दिलेला सूचनांचा कागद त्यानं काढून पाहिला. रॉकेट एकदा उडल्यावर कमीतकमी अर्धा किलो मीटर तरी न्यायला हवं असं त्यात लिहिलं होतं.
आला वांधा ! एवढा खटाटोप वाया ! शाळेची वेळही होत आली होती. हिरमुसला होऊन चिंटू रॉकेटमधून एकटा आणि संजू-नितीन बसनं असे शाळेत पोचले.
अकराची शाळा. तसा दहा मिनिटं उशीरच झाला होता. सर रागावतील म्हणून दबक्या पावलानं तिघं आत पोचले.
" क्रिकेटच्या मॅचमधे जिल्हा सामन्यात आपल्या शाळेचा विजय झाल्यामुळे आज शाळा बंद राहील. " फळ्यावर मोठ्या अक्षरात सूचना लिहिली होती.
" बरं झालं, आता तिघंजणं परत जाऊ शकू आपण रॉकेटमधून. हवं तिथे, हवं तितकं हिंडू शकू. " चिंटू विचार करीत होता.