दुसऱ्या महायुद्धात आपल्या नेतृत्वाने इंग्लंडला विजय मिळवून देणाऱ्या विन्स्टन चर्चिल यांची आज जन्मशताब्दी. राजकीय नेते म्हणून त्यांचे कर्तृत्व सुपरिचित आहे. पण त्यांच्या बहुरंगी आगळ्या व्यकिमत्वाचे दर्शन घडवणारे हे काही प्रसंग...
"मला द्याव्या लागणाऱ्या परीक्षामधे मला उत्तरं देता येणार नाहीत, असे प्रश्न विचारले जायचे. त्यामुळे परीक्षकांना हवी ती उत्तरे मी देऊ शकलो नाही. मला माहीत नसलेल्या गोष्टीच ते कसे बरोब्बर विचारायचे कोण जाणे ! जिथे मी आनंदाने माझ्या ज्ञानाचं प्रदर्शन केलं असतं, तिथे परीक्षकांनी माझं अज्ञानच उघड करण्याचा प्रयत्न केला." हे कुणी वर्गात ढढ्ढोबा ठरलेल्या, परीक्षांच्या वाऱ्या करणाऱ्या वुद्दू विद्यार्थ्याचे बोल नव्हेत. पहिल्या महायुद्धात लढणाऱ्या आणि दुसऱ्या महायुद्धात इंग्लंडला विजय मिळवून देणाऱ्या पंतप्रधानांचे आपल्या लहानपणच्या शालेय जीवनाबद्दलचे - परीक्षांबद्दलचे हे उद्गार आहेत.
लहानपणी, या मुलाचं कसं होणार, असा प्रश्न सर्वांपुढे उभा करणारा हा मुलगा पुढे एवढा चमकला की जगाचे डोळे दिपले. पण हा एवढा एकच विरोधाभास चर्चिलच्या आयुष्यात होता असं मात्र नाही. जगतो का मरतो अशा अवस्थेत लहानपणी दोनदा आई-वडिलांना काळजी करायला लावणारा हा माणूस, ९१ वर्षे जगला. गणितात बेरीज वजाबाकीच्या पुढे फारशी प्रगती न करणारा हा मुलगा इंग्लंडचा अर्थमंत्री झाला. ग्रीक, लॅटिन भाषा न समजणारा हा पंडित इंग्लिश भाषेत लेखनावर सर्वात जास्त पैसे मिळवणारा लेखक झाला. त्याच्या कामसूपणाने, कष्टाळू वृत्तीने तो जितका लोकप्रिय झाला, तितकाच त्याच्या आक्रमक वृत्तीने तो त्याच्या काही सहकाऱ्यात नावडता झाला. पंतप्रधान चेंबरलेनच्या मंत्रिमंडळात काम करण्याची त्यानं तयारी दर्शवली, तेव्हा ती सूचना चेंबरलेननं स्वीकारली नव्हती. "त्याला मंत्रिमंडळात ठेवलं तर तोच सर्वांवर हुकुमत गाजवेल, आणि इतरांना बोलायचीही संधी देणार नाही " असं कारण त्यानं दिलं होतं.
विन्स्टनची मुलगी "सारा" नटी होती. वडील पंतप्रधान आणि मुलगी नटी ! लोकांच्या डोळ्यावर येऊ नये म्हणून तिनं म्हटलं होतं " मी जर माझं नाव बदललं तर तुम्हाला काय वाटेल ? " तेव्हा विन्सटननं म्हटलं होतं, "माझ्या राजकीय जीवनासाठी जर तू हे करणार असशील तर नाव बदलण्याचं कारण नाही. तू तुझी कला तुला हवी तशी वाढव." एवढंच नाही तर लोकांनी तिची कला बघून कौतुक करावं, पंतप्रधानाची मुलगी म्हणून नव्हे, असा त्याचा आग्रह असे.
त्याच्या मुलांनी त्याला एक सोन्याचं पेन एका वाढदिवसाला भेट म्हणून दिलं होतं. इतर कामांना तो बॉलपेन वापरी. पण काही विशेष कागदांवर सह्या करायच्या असतील तेव्हा मुद्दाम मागवून त्या सोन्याच्या पेनानं तो सही करीत असे.
लहानपणी वर्गात नेहमी शेवटच्या नंबरावर असणारा विन्स्टन कसाबसा सँडर्स्ट या सैनिकी विद्यालयात पोचला. त्याचं असं झालं... त्या वेळी शिकवल्या जाणाऱ्या विद्वज्जड अभ्यासाचा त्याला कंटाळा. तलावाकाठी असलेल्या कुणाला पाण्यात ढकल, कुठे दुसऱ्याकडून गणीत सोडवून घे आणि त्याला इंग्रजी निबंध लिहून दे. असा त्याचा स्वभाव. अशा या पोराला त्याच्या आई वडिलांनी खेळातले शिपाई आणून दिले होते. किती असतील ? एक नाही, दोन नाही, पंधराशे सैनिक त्यानं जमवले होते. सगळे ब्रिटिश सोजिरांच्या, पायदळ आणि घोडदळाच्या पोषाखातले होते. अठरा तोफा आणि काही किल्ल्यांचाही या लढाईच्या खेळात समावेश होता. विनीचा भाऊ जॅकही या खेळात भाग घेई. त्याच्या जवळ फक्त काळे शिपाई होते. दोघं भाऊ लढाई लढाई खेळायचे.
एकदा वडिलांनी त्या शिपायांचं इन्स्पेक्शन केलं. विन्सटन आपल्या शिपायांचं प्रदर्शन करण्यात दंग झाला होता. वीस एक मिनिटांनी त्यांनी विन्स्टनला विचारलं " तू सैन्यात जाशील का ?" आपल्या हुशारीनं वडिलांवर छाप पडून वडिलांना हे वाटलं असावं. पण पुढे त्याला कळलं की वकील व्हायची आपल्या मुलाची लायकी नाही असं वाटून त्यांनी सैनिकी जीवन विन्स्टनसाठी सुचवलं होतं. अर्थात यातूनच पुढे लढाईची वर्णनं करून लेखनाला त्यानं सुरुवात केली. जग पाहिलं ते वेगळं !
बाविसाव्या वर्षी चर्चिल ४ थ्या हुस्सार पलटणीबरोबर भारतात आला. सकाळी सहा वाजता उठून कवायत करायची. दीड दोन तासांनी नाश्त्याला परतायचं. घोड्यावरून हिंडून उन्हं वर आली की जेवायचं. दीड वाजल्या पासून पाच वाजे पर्यंत मोकळ्या वेळात झोपायचं, मग पोलो खेळायचा असा त्याचा दिनक्रम असे. दुपारच्या वेळी थोडावेळ झोप काढायची सवय चर्चिलला तेव्हापासून लागली. शिवाय त्यावेळी आपल्या बरोबरच्या विद्यापीठांमधून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांपेक्षा आपल्याला ज्ञान कमी मिळालेलं आहे याची जाणीव त्याला झाली. आईला पत्रांवर पत्रं पाठवून त्यानं इंग्लंडहून पुस्तकं मागवली. आधाशासारखी ती वाचून काढली. इतिहास, शास्त्र, युद्धशास्त्र, राज्यशास्त्र, वाङ्मय, सौंदर्यशास्त्र अशा विषयांवरची ती पुस्तकं होती.
कपडे हे माणसासाठी असतात. माणूस हा कपड्यांसाठी नसतो असं त्याचं म्हणणं होतं. पण त्यासाठी ३०-४० वर्षांच्या जुन्या हॅट्स घालणारा हा अवलिया दिवसातून तिनतिनदा कपडे बदली आणि अमेरिकन शर्ट्स आणी.
मोठेपणा आणि लोकप्रियता माणसाला हट्टी बनवते, तसंच विन्स्टन चर्चिलच्या बाबतीतही झालं होतं. फ्रान्समधे नान्सी गावी (महायुद्धानंतर) एका कवायतीला पाहुणा म्हणून फ्रेंच सरकारनं त्याला बोलावलं होतं. सलामी घेताना घालायच्या पोशाखावर छातीवर डावीकडे एक पदक लावायचं होतं. पण पंतप्रधान चर्चिल यांची अशी समजूत होती की हे पदक छातीवर उजवीकडे लावायचं असतं. सर्वांनी सांगून पाहिलं, पण छे ! पंतप्रधान साहेब पदक उजवीकडे लावून गेले. परत आल्यावर त्यांनी आपल्याला उलट सल्ला देणाऱ्यांना डोळे मिचकावून सांगितलं "मी कवायत बघायला गेलो. तेव्हा सर्वांनी आपल्या छातीवर पदकं डावीकडे लावली होती. पण माझ्या छातीवर उजवीकडे पदक लावलेलं पाहून सर्वांनी ती उजवीकडे लावली." आहे की नाही ! लोक तरी काय करतात बिचारे ! इंग्लंडच्या पंतप्रधानाची लहर लागली ना !
असा हा माणूस ! मी पाहिलेला नाही. पाहण्याची शक्यताही नाही. पण तरीही तो मला विलक्षण मोहिनी घालतो. पन्नास- सत्तर वर्षांपूर्वी लिहिलेल्या शब्दांची जादू साता समुद्रापलीकडे राहणाऱ्या मला घालतो. वाटतं, अशी माणसं असतात म्हणून जगाला किंमत आहे. ती अशी आयुष्यं जगतात म्हणून आयुष्याला वैभव आहे.
सकाळ, शनिवार ता. ३०, नोव्हेंबर १९७४.
"तुमचा हा नातू अगदी तुमच्या सारखा दिसतो बरं का !" विन्स्टन चर्चिलना त्यांच्या नातवाबरोबर पाहून एकाने म्हटले होते. उंच असून शरीराला रुंदी असल्यामुळे फार उंच न वाटणारा, गोल गोबऱ्या चेहऱ्याचा चर्चिल हे ऐकत होता. आपले बारीकसेच डोळे मिचकावत त्याने म्हटले, हाच काय पण सगळीच मुलं माझ्यासारखी दिसतात. विन्स्टन चर्चिल हा दुसऱ्या महायुद्धाच्या काळात आपल्या कर्तृत्वाने चमकलेला इंग्लंडचा पंतप्रधान. पहिल्या महायुद्धात युद्ध क्षेत्रात वावरला. तेथील ताजी बातमीपत्रे वृत्तपत्रांना पुरवली. बंदिवान झाला. तेथून सुटला. लष्करी शिक्षण घेतलेल्या या तरुणाने पहिल्या महायुद्धाचा भीषणपणा अनुभवला आणि दुसऱ्या महायुद्धाला आवरण्याचे काम केले. " विन्स्टन चर्चिल जर नसता, त्याने जर आपले कर्तृत्व पणाला लावले नसते, तर दुसरे महायुद्ध कधी संपले असते, आणि किती हानी झाली असती कोण जाणे ! " असे जाणते लोक म्हणतात.
मोठेपणी अधिकाराच्या शिखरावर पोचलेला विन्स्टन लहानपणी सगळ्यांपुढचे प्रश्नचिन्हच होता. मात्र "या मुलाला कसे वळणावर आणावे " याची काळजी घरच्यांना होती. गणित, भूगोल आणि लॅटिनच्या त्याच्या (अ)ज्ञानाने शिक्षक हतबुद्ध झाले होते. सँडर्स्ट या लष्करी महाविद्यालयाच्या प्रवेश परीक्षेच्या वेळी आठच दिवसांपूर्वी (व त्याला आलेले) गणित परीक्षेत आल्याने तो पास होऊ शकला. परीक्षेत भूगोलाच्या पेपरात नकाशे काढावे लागत. त्या नकाशा काढण्यात कुठल्या देशाचा नंबर लागेल त्याचा नेम नसे. विनीने परीक्षेच्या आधी हतबुद्ध होऊन भूगोलाचे पुस्तक उघडले, जो नकाशा प्रथम दिसेल तो बघायचा असे ठरवले. न्यूझीलंडचा नकाशा निघाला. तो त्याने गिरवला आणि इथेही नशिबाने जोर दिला ! न्यूझीलंडचाच नकाशा परीक्षेत विचारलेला होता... आणि तो परीक्षा पास झाला.
परंतु विन्स्टनला नशिबाने हात दिला म्हणून तो मोठा झाला असेे मात्र नाही. त्याला वाङ्मयाची आवड होती. लष्करी डावपेचांची चांगली माहिती होती. तलवारीच्या द्वंद्वयुद्धात तो पटाइत होता. घोड्यावरून खेळण्याच्या पोलो नावाच्या खेळात तो तरबेज होता. तो पट्टीचा वक्ता होता. लोकप्रिय होता. चांगल्या पैकी चित्रकार होता आणि विशेष म्हणजे अत्यंत कष्टाळू होता. दिवसाचे अठरा अठरा तास तो काम करीत असे.
सकाळी आठ-नऊ वाजता त्याला उजाडत असे. अंथरुणातच न्याहारी घ्यायची, वर्तमानपत्रे चाळायची, लोकांना भेटायचे, जगाच्या राजकारणाचा विचार करायचा, सेक्रेटरीला मजकूर लिहायला सांगायचा, आपल्या पुस्तकांची मुद्रिते तपासायची, भाषणांची टाचणे करायची. त्यानंतर स्नानगृहाकडे स्वारीचा मोर्चा वळायचा. हाउस ऑफ कॉमन्समधे करायची भाषणे तयार करण्याची हीच जागा. नवीनच लागलेल्या नोकराने आपल्या मालकाचे बोलणे ऐकून ते आपल्यालाच काही तरी सांगत असावेत असा समज करून घेतला नि विचारले होते " साहेब काय पाहिजे ?" "काही नाही मला माझे भाषण तयार करू दे ." त्याला उत्तर मिळाले होते. त्याच्या परिणामकारक बोलण्याने सभागृह चकित आणि मंत्रमुग्ध होेते. असे उद्गार त्यावेळचे पंतप्रधान डिजरायली यांनी विन्स्टनच्या वडिलांबद्दल काढले होते. त्यांचाच मुलगा होता विन्स्टन ! हाउस ऑफ कॉमन्समधे - इंग्लंडच्या लोकसभेमधे पहिल्याच दिवशी विन्स्टन पित्याच्या जागेवर जाऊन बसला, आणि सभागृहात येऊन आपल्याला तीन दिवस होतात न होतात तोच, पंतप्रधान लॉइड जॉर्ज यांच्या पाठोपाठ आपले पहिले भाषण ठोकून श्रोत्यांना जिंकले. पाठोपाठ दोन भाषणे केली. पण तोंडाला येईल तसे बोलण्याची त्याची तयारी नव्हती. तिसऱ्या भाषणाची तयारी तो सहा आठवडे करत होता !
पंतप्रधान झाल्यावर त्याच्या मोटारीवर झेंडा असे. तो झेंडा पाहून लोकांना ती गाडी कुणा राजघराण्यातल्या माणसाची असावी असे वाटे व ते कुतुहलाने थांबत पण आत डोकावून विन्स्टन चर्चिल आत आहे हे पाहिल्यावर त्यांची भीती पार दूर पळे. लोक गाडीभोवती घोळका करून म्हणत, "काय विनी, कसं काय ? " "हॅलो विन्स्टन !" आणि त्याची व्ही फॉर व्हिक्टरी ही घोषणा देत. विन्स्टन, लोकांचा विनी, दिलखुलास हसून त्यांना उत्तर देत असे. त्याला लोकांबद्दलच प्रेम होते असे नाही. तर प्राणी म्हणजे त्याला जीव की प्राण वाटत. त्याचा रुफस नावाचा कुत्रा होता. त्याला त्याच्या जेवणाच्या टेबलाजवळ बसायला जागा असे. कितीही मोठे पाहुणे जेवायला आलेले असोत त्यांना रफस साठी थांबावे लागे. जवळ बसलेल्या कुत्तोबांना पहिला घास स्वतःच्या हाताने भरवून मग चर्चिल पाहुण्यांकडे वळे. रुफसचे जेवण झाल्याखेरीज कुणाला जेवायला सुरुवात करता येत नसे.
राजकीय दृष्टीकोनातून तो साम्राज्यवादी होता. भारताला स्वातंत्र्य देण्याला त्याचा कडाडून विरोध होता. पण लोकशाहीवर आणि व्यक्तिस्वातंत्र्यावर त्याचा विश्वास होता. दुसऱ्या महायुद्धाच्या छायेत भारतातील बऱ्याच पुढाऱ्यांना कैदेत टाकले होते. पण त्यावेळी नेहरूंना त्रास होऊ नये म्हणून त्याने "नेहरूंना त्रास होणार नाही " याची काळजी घ्यायला सांगितले होते.
लेखक आणि इतिहासकार म्हणून चर्चिलला जगात मान आहे. पहिल्या महायुद्धात नाना युक्त्या-प्रयुक्त्या करून आपली सुट्टी सुद्धा रद्द करून जगात जिथे लढाई असेल तिथे जाई. वर्तमानपत्रांना ऑंखो देखा हाल आपला जीव धोक्यात टाकून पाठवे. या बरोबरच त्याने लिहिलेला " दुसऱ्या महायुद्धाचा इतिहास " या ग्रंथाचे भाग आणि काही कादंबऱ्यां एवढे लेखन आपल्या भरगच्च कार्यक्रमांना भरलेल्या आयुष्यात केले. त्यावर त्याला लाखो पौंड मिळकत झाली. जगात एका लेखकाने लेखनाच्या बळावर एवढी प्रचंड मिळकत क्वचितच केली असेल, असे म्हणतात.
हजरजबाबीपण हा फार महत्वाचा गुण त्याच्या अंगी होता. दुसऱ्या महायुद्धातील जयानंतर सेनानी मॉंटगोमेरी आणि विन्स्टन चर्चिल एकदा पत्रकारांशी बोलत होते. " तुमच्या दीर्घायुष्याचे आणि उत्तम प्रकृतीचे रहस्य काय ?" त्या दोघांना प्रश्न विचारण्यात आला. " मी अतिशय नियमित आहे, मला व्यसने नाहीत, मी विश्रांतीही योग्य आणि वेळच्या वेळी घेतो." मॉंटगोमेरींनी सांगितले. पत्रकार विन्स्टनकडे वळले. " मी अगदी अनियमित आहे. मी दारू पितो, सिगारेटी ओढतो. विश्रांतीही विशेष घेत नाही. म्हणून माझी तब्बेत दुप्पट चांगली आहे." त्याने मिस्किलपणे सांगितले.
आणखी एकदा त्याच्या वाढदिवशी एका तरूण फोटोग्राफरने त्याचा फोटो काढला आणि म्हटले " साहेब, आपला फोटो शंभराव्या वाढदिवसाला काढता यावा अशी माझी इच्छा आहे." म्हणजे विन्स्टन शतायु व्हावा असे त्याला सुचवायचे होते. पण विन्स्टन कसला वस्ताद. त्याने गंभीरपणाचा आव आणून म्हटले, " काय झालं तसंही न व्हायला ? बरी दिसते की तुझी प्रकृती !"
सगळ्या जगाला तोंड द्यायला टिंबाएवढ्या दिसणाऱ्या ब्रिटनला तयार करताना त्याने आवेशाने म्हटले होते. "आम्ही जमिनीवर लढू, समुद्रात लढू, आकाशात लढू ! रस्त्यावर, गल्लीबोळात, शेतात आणि वाळवंटात लढू, पण हार जाणार नाही. व्ही फॉर व्हिक्टरी !"
असामान्य मनःसामर्थ्याने देशाला तारणाऱ्या विन्स्टनच्या यशाचे रहस्यही "माघार न घेणे " हेच असावे.
विशाल सह्याद्री , नोव्हेंबर १९७४