लुटुपुटीच्या किल्ल्याची आठवण करून देणारी तात्पुरती पत्र्याची तटबंदी. चहूबाजूला आकर्षक झेंडे. बँडने आणि जनावरांच्या आवाजाने दुमदुमणारा परिसर, अशी सर्कस त्या गावाच्या आयुष्यात चैतन्य निर्माण करते. "बाबा, सर्कसला जाऊ या !" किंवा "आई, नेनं ग सर्कसला." अशा बाबालोकांच्या मागण्या सुरू होतात. मग चला तर.
खुर्चीत बसून सर्कस तुम्ही अनेकवार पाहिली आहे. आता त्याचा कंटाळा आलाय् म्हणता नं ? आता आपण खेळ सुरू असतानाच्या सर्कसचा पसारा बघू या.
पुण्याच्या पेशवे पार्कसमोरील सर्कसचा तंबू दिसायला लागल्यावर आजूबाजूचे रस्ते पाहा. तंबूच्याच दिशेनं लोक जाताहेत असं नाही वाटत ? आपण चाललो आहोत म्हणून इतरही तिकडेच चालले आहेत असंही वाटत असेल कदाचित. पण आता सर्कसच्या तंबूच्या बाहेरपर्यंत येऊन उभं राहिल्यावर....
इथल्या माणसांचं मात्र, मग तो लहान असू दे किंवा मोठा असू दे, तंबूकडे खात्रीनं लक्ष जातंच. औत्सुक्यानं सर्कसच्या बाजूला पाय वळतातच. ते जरा उत्साही लोक पहा. फटीतून डोकावून कोणाचं "दर्शन" होतं का ते पहाताहेत.
आता असे आत या. मधला रस्ता सरळ रिंगणाकडे जातो. डावी उजवीकडे हत्ती, घोडे, उंट बांधून ठेवले आहेत. हत्तीचं झुलणं सुरू आहे. घोडे खिंकाळताहेत आणि उंट माना वाकड्या करत पाय दुमडून कवडीसारखा आकार करून बसले आहेत. आणखी आत चला. दोन्ही बाजूंना छोटे छोटे तंबू राहुट्या आहेत. लोक हिंडताहेत. एक छोटंसं खेडंच आहे म्हणाना हे ! वेगळ्या जगातलं.
आपल्या जगाचा दिवस होऊ दे लवकर सुरू. पण "या" जगातला दिवस आठापासून नऊपर्यंत ज्याच्या त्याच्या मर्जीप्रमाणे सुरू होतो. नाश्ता घेऊन तालमीला जायचं असतं. दूध, अंडी बाजूच्या तंबूतल्या स्वयंपाकघरात मिळतात. हाच तो तंबू. छोटासा. एका बाजूला अन्न शिजवायची जागा आहे. मधेच हे टेबल आणि दहा बारा खुर्च्या. आपल्याकडे मराठी सर्कस म्हणजे तासगावची हे जसं ठरलेलं, तसंच दक्षिणी लोकांची सर्कस म्हणजे टॉलिचेरीची हे ही ठरलेलंच. मल्याळी लोकांचा भरणा अधिक. त्यामुळे ज्यांना डोसा वगैरे न्याहारीला हवा असेल, त्यांच्या साठी ती ही सोय आहे. जेवणात मांस, मटण, भात असतो. जेवणं दुपारी बाराला आणि रात्रीही बारालाच. ती हसतमुख मल्याळी "बुढी" हे सगळं बघते. इथंच रेंगाळून फार पाणी सुटू देऊ नका तोंडाला. अजून सफरीला तर सुरुवात आहे.
आता असे रिंगणाच्या बाजूला या. मागच्या प्रवेशद्वारासी ही तालीम सुरू आहे तंग विजारी आणि शर्ट घातलेल्या या मुली शरीरं ताणून मोकळी करताहेत. पाच-सात वर्षांच्या मुलापासून सगळे मेहनत करताहेत. ती पाहा पाच-सहा वर्षांची मुलगी पुढे वाकून दोन पायांमधून डोकं मागे करते आहे. आणि हे काय ? मागे वाकूनही तीच कसरत चालू आहे. या सर्कशीतले पुष्कळसे लोक लहानपणीच येथे दाखल होतात. त्यामुळे कसरत करायला शरीरं तयार होतात.
त्या दोन मुली, पाच सहा चेंडू एकाच वेळी एकमेकींकडे फेकायची तयारी करताहेत. त्यातली डावीकडची उंच, हसतमुख मुलगी - रमणी. नवव्या वर्षीच सर्कशीत दाखल झाली. नवीन असताना कोलांट्या मारायच्या, उलटं चालायचं ही कामं तिनं केली. आता ती जीपमधून, उंचावरून उडी मारण्याचं काम करते. तिची बहीणही इथंच आहे. घरापासून गरिबीनं दूर राहावं लागलं. पण मधून मधून घरी जाऊन ती सर्वांना भेटून येते. वाचनाची आवड आहे. गुलशन नंदांचं हिंदी पुस्तक वाचण्यासाठी ती हिंदी शिकली. पगाराचा निम्मा भाग ती आईला पाठवते, निम्मा बँकेत ठेवते. (इथला सगळा खर्च सर्कसच करते.) घरी गेल्यावर आई तिच्या लग्नाचं बघेल. तिला सर्कशीतला नवरा नको आहे. तिची स्वयंपाकाची आवड ती इथ्ल्या स्वयंपाकघराला हात लावून ती भागवते.
पलीकडे उभी असलेली ती नेपाळी राणादेवी. तिनं अंगापिंडानं मजबूत असायलाच हवं कारण ती आपल्या अंगावर हत्तीचं वजन तोलते. "तुला भीती नाही वाटली ?" मी विचारलं. "वाटली तर..पहिल्यांदा हत्ती जवळ आला की जीव गोळा व्हायचा." ती म्हणाली. पहिल्यांदा काही किलोचं, मग माणसाचं असं करत तिनं तोलायचं वजन वाढवलं. लग्न सर्कशीतल्या माणसाशी करायला आवडेल का बाहेरच्या यावर तिचं उत्तर होतं, अजून तसा विचारच केला नाही. पण तिला पसंत आहेत "फिल्म स्टार्स". त्यातही शशीकपूर शूटिंगला आलेला असताना तिनं आपला त्याच्याबरोबर फोटो काढला आहे. फ्रेम करून ठेवला आहे.
विदूषक म्हणजे सर्कशीतला उपनायकच म्हणा ना ! हा वेलायदन गाजलेला जोकर आहे. "मेरा नाम जोकर पाहिला का ?" मी. "पाहिला म्हणजे काय, त्यात कामच केलंय्." त्याचं उत्तर
विदूषक कोणालाही होता येतं असं नाही. अंगचीच ही कला असावी लागते. लोकांना हसवून आपल्याकडे कमीपणा घ्यायची तयारी असावी लागते असं याचं म्हणणं. हा पाच इयत्ता शिकला आहे. पण मुलांनी शिकावं असं त्याला वाटतं. म्हणून मुलांना घेऊन बायको "गावाला" राहाते. लहानपणापासून तो या जगात आहे. त्याची बायको त्याला इथेच भेटली, नि कलकत्त्याच्या मुक्कामात त्यांनी लग्न केलं. लग्नानंतर बायकोनं काम करणं सोडलं. त्याची मुलगीही इथेच काम करते. "सर्कशीत काम करून तिच्या लग्नाला अडचण नाही येणार ?" माझा प्रश्न.
"छे ! सर्कस ही फॅक्टरी आहे. इथल्या कितीतरी मुलींची लग्न होऊन त्या संसार करतात. मुलींना किती बंदोबस्तात ठेवतात हे पाहिलं नाहीत का ?" त्यानं म्हटलं.
खरंच इथल्या मुलींची व्यवस्था वेगळी ठेवली जाते. त्यांना कुणी भेटायला आलं तर मॅनेजरच्या तंबूत - त्याच्या बायकोसमोर त्या व्यक्तीला भेटवलं जातं. ती मुलगी म्हणाली "या माणसाला मी ओळखत नाही." तर तिला तिच्या तंबूत परत पाठवलं जातं.
आता "काओ बिंग शन" या चिनी जादूगाराला भेटू या. हा पस्तीस वर्षांपूर्वी भारतात आला. बायको इथंच काम करते. चपळपणानं एक चाकाच्या सायकलीनं बास्केटबॉल खेळणारी ही बाई, बारा आणि चौदा वर्षांच्या मुलांची आई आहे हे खरं वाटत नाही. यांचंही लग्न सर्कशीतलंच. मुलांना त्यांनी लखनौच्या शाळेत शिकायला ठेवलंय. "चीन मधे का नाही मुलांना पाठवलं ?" असा मला पडलेला प्रश्न. पण तिथे कुणी नातेवाईक आहेत की नाही हेच त्याला माहीत नाही. आठ दहा वर्षांपूर्वी आईला पत्र लिहिलं त्याचं उत्तर नाही. इंग्रजी आणि जवळ जवळ सगळ्या भारतीय भाषा बोलतो.
हा अवाढव्य कारखाना बाळगणं काही सोपं काम नाही. दीडशे कलाकार आणि जवळजवळ तेवढेच प्राणी. यांचं लटांबर. एवढ्या सगळ्यांचा रोजचा खर्च चौदा हजारापर्यंत येतो. मोठ्या शहरात सहासात हजारांचं दर खेळाचं उत्पन्न येतं. पण फायद्याचं प्रमाण बारा महिने आणि सर्व ठिकाणी सारखं नसतं. हा फायदा दुसऱ्या कमी उत्पन्नांच्या ठिकाणी खर्चावा लागतो. मात्र पुण्याच्या पेशवे पार्क समोरच्या मैदानाचं भाडं भरावं लागतं पाचशे रुपये रोज ! दुसऱ्या गावाला जाताना एका तुकडीला पंधरा वीस दिवस आधी मुक्कामाला पाठवतात. ते जाहिरात करतात. पुढच्या सामानाची, मांस, रेशन वगैरेंची जमवाजमव करतात.
इथल्या माणसांशी काही वर्षांसाठी करार केला जातो. लहान मुलांच्या बाबतीत त्यांच्या आई-वडिलांशी. जनावरं दुसऱ्या सर्कसमधून आणतात किंवा प्राणिसंग्रहालयांतून. क्रूर प्राण्यांना दोरीनं बांधून समोर मांस दाखवून त्याची आशा लावून मनासारखं काम करून घेतात. "हत्ती हा सगळ्यात समजूतदार प्राणी आहे. आणि वाघ सिंह हाताळायला सर्वात जास्त अवघड. एकदा एक सिंह पळून लांब एका झोपडीत शिरला. नशीबानं आत माणसं नव्हती. आम्ही बऱ्याच माणसांनी घेर धरून मी आत जाऊन दोरीनं बांधून आणला."
इथे जनावरांना दिवसा तालीम देतात. त्यामुळे रात्री रिंगणातल्या मोठ्या दिव्यांची सवय नसते. म्हणून रात्री सर्कशीचे खेळ संपल्यावर दिव्यांची सवय करतात. नाही तर हे प्राणी बँडला बुजले नाहीत तरी दिव्यांना बुजतात. सगळ्या प्राण्यांना नावं असतात. हत्तीचं नाव आहे "कुमारी". "या पाणघोड्याचं नाव आहे गणेश." उस्ताद म्हणाले. "त्याला कळतं का हे नाव ?" मी विचारलं. "हो ! गणेश, म्हणून हाक मारली की तो पाण्याच्या ट्रक मधून खाली उतरतो." "तुम्ही हाक मारल्यावर तो ओळखेल का इतर कोणी हाक मारल्यावरही ?" मी प्रश्न केला. "होय. तुम्ही हाक मारल्यावरही उतरले. पाहायची आहे हाक मारून ?" त्यांनी म्हटलं. कल्पनेनंच अंगावर काटा आला.
इथल्या ओरांग ओटांग माकडाचं नाव आहे अय्यर. त्याच्या पिंजऱ्यापुढे उभे राहून उस्तादनं शेकहँड करायला हात पुढे केल्यावर त्यानंही हात पुढे करून शेकहँड केला नि काय ! हात माझ्यापुढे करून माझ्याशीही शेकहँड करायला स्वारी तयार. माझी मात्र हिम्मत नाही झाली ते वेगळं. मुन्नी नावाची चिंपांझी माकडी सायकल तीन चार महिन्यात शिकली. हे पाहत असतानाच शेजारून काय गेलं हे पाहाते तो काय ? एका सिंहीणीला दोरीला बांधून कुत्रं न्याव तसं इतक्या सहजपणानं दोघं जण नेत होते आणि तिसरा तिच्या पाठीवर बसला होता. हे इतक्या साधेपणानं झालं की कुत्रं मांजर शेजारून जाण्याची आपण जितकी दखल घेतो तितकीच मीही घेतली. त्या वातावरणाचा परिणाम असावा बहुतेक.