देवघेव

गेल्या थंडीतली गोष्ट. "ढॅण्ट ढँण् ! " मंजिरीनं आनंदानं उडी मारली. तसं तिला आजोळी जायला आवडायचंच. त्यात या वेळेला तिला तिच्याबरोबर गम्माडी गम्मत न्यायची होती ! तिनं आपल्या शबनव बॅगेत भराभर कपडे भरायला सुरुवात केली.

गमाडी गम्मत कुठली म्हणता ? परवाच तिच्या काकानं तिला तिच्या वाढदिवसाची भेट दिली होती - दुर्बीण.

ती दुर्बीण बघून दादानं डोळे मिचकावून म्हटलं होतं, " यात लांबची वस्तू जवळ दिसण्याऐवजी जवळचीच वस्तू लांब दिसते. " हे ऐकून त्याची शहानिशा करण्यासाठी शाळेच्या पटांगणात धाव घेतली होती. एका झाडावरचं घरटं आणि त्यातून डोकावणारी पिलं स्पष्टपणे दुर्बिणीतून बघून सुटकेचा निःश्वास सोडला होता.

आजोळी आल्या आल्या मंजिरीनं आजोबांना सांगून टाकलं "सकाळी उठून मी पक्षी निरीक्षणासाठी पलीकडच्या माळाशेजारच्या बागेत आणि टेकडीवर जाणार आहे. "

"काय बाई हल्लीची पोरं ! आमची मुलं नव्हती कधी सकाळी उठून पक्षी-बिक्षी बघायला जात ! " आजीनं म्हटलं, तरी थोडं कौतुक त्या मागे होतंच.

मंजिरी सकाळी उठली, भराभर अंघोळ करून थोडंसं खाऊन खिशात वही आणि बॉलपेन, तर खांद्याला दुर्बीण अडकवून निघाली.

पक्ष्यांचं निरीक्षण करायला स्वतंत्रपणे जाण्याचा तिचा पहिलाच दिवस होता.

तासभर मंजिरी हिंडत होती. एखादा सुंदर पक्षी दिसे, दुर्बीण डोळ्याला लावेपर्यंत उडूनही जाई. कधी तिच्या पायांच्या आवाजानं, नाहीतर झाडांच्या सळसळीनं घाबरून पक्षी भुर्रकन उडूनही जात.

तिच्या मित्रमैत्रिणींनी सहलीला गेल्यावर दोन दिवस पक्षी पहाण्याचा कार्यक्रम केला होता. पण बरोबर सर होते. त्यांच्या हातातल्या पुस्तकातला त्या पक्ष्याचा फोटो ते दाखवायचे. मग मुलं दुर्बिणीतून पहायची. त्या मुळे पक्षी शोधणं किंवा ओळखणं तितकंसं अवघड वाटलं नव्हतं. पण आता मंजिरीला जाणवत होतं, दाट झाडीत, पानांत पक्षी शोधणं आणि ते ओळखणं तितकंसं सोपं नव्हतं.

"अरेच्या ! कुठे आलो आपण ! " मंजिरी भानावर आली. आजीच्या घरामागचा डोंगर आणि विशेष म्हणजे पायथ्यापाशी करवंदीची जाळी तिच्या चांगलीच माहितीची होती. पण आता पायवाट कुठं सुरु झाली आणि कुठे संपत्ये हेच तिला कळत नव्हतं. "गावात चुकलं तर रस्त्यांना नावं असतात, माणसांना विचारता येतं. इथे कुणाला विचारणार ? आजी काळजी करील, उशीर झाला तर. म्हणालीच होती निघताना.. छांदिष्टपणानं हिंडत कुठे भरकटू नकोस हो मंजू !" मंजिरीला आठवत होतं.

"हम्मा .. " आवाजानं ती दचकली. काही अंतरावर गुरं चरत होती. त्यांच्या मागून एक मुलगा, मुलगी हिंडत होती. ते बघून मंजिरीचा जीव भांड्यात पडला.

सध्या गावकरी फिरकत नाहीत अशा ठिकाणी ही शहरी मुलगी पाहून ती गुराखी मुलंही मंजिरीकडे विस्फारून पहात होती. तिची पँट, तिच्या हातातली वही, पेन आणि मुख्य म्हणजे दुर्बीण यांनी त्यांचं लक्ष चांगलंच वेधलं होतं. "अरे मी पक्षी बघायला आले आणि रस्ता चुकले, परत गावाकडे कसं जायचं ? फुटक्या विहिरी समोर माझी आजी राहते." मंजिरीनं एका दमात सगळं सांगून टाकलं.

पक्षी बघायला असं वेगळं हिंडायला कशाला हवं ते त्या गुराखी भावंडांना काही समजलं नाही. पण त्यांनी डोलवायची म्हणून मान डोलावली.

" चला मी दावतो रस्ता" असं म्हणून त्या गुराखी पोरानं चालायला सुरुवात केली. "ए सारजे, तू बी चल." म्हणून बहिणीला हाक मारली.

तिघं निघाली. रघूनं - त्या गुराखी पोरानं थोडी ओळख झाल्यावर दुर्बिणीकडे बोट दाखवून विचारलं, " ते काय हाय ? " सारजाही दुर्बिणीवर मगाचपासून नजर ठेवून होतीच. मंजिरीनं त्यांना दुर्बिणीतून कसं पाहायचं ते सांगितलं. "उद्या पक्ष्यांचं पुस्तक आणून त्यातल्या फोटोंवरून आपण पक्षी ओळखू." असा खुलासाही केला. एवढ्या वेळात सारजा व रघूनं दोन-तीनदा दुर्बिणीतून बघूनही घेतलं होतं.

गावाच्या वेशीजवळ मंजिरीला सोडे पर्यंत सारजेचा बुजरेपणा गेला होता. " उद्या बी येताल तुम्ही पक्षी पगाया ? " तिनं विचारलं. " मंग तुम्हाला मोठे पान्यातले पक्षी पघायचे नाहीत ? " " पाण्यातले पक्षी ? आणि ते कुठे आहेत ? " मंजिरीनं विचारलं.

" या टेकडी पल्याड योक तळं हाय. या दिसात तिथं मोप पक्षी येतात. " रघूनं माहिती दिली. त्या तळ्यातले पक्षी बघायला न्यायचं रघू व सारजानं कबूल केलं.

दुसऱ्या दिवशी त्याच वेळी रघू व सारजा मंजिरीची वाट पहात उभी होती.

" श् श् ताई आवाज करू नका, इथं ऱ्हातीया एक घुबडाची जोडी." जवळच्या एका झाडाकडं बोट दाखवून रघूनं सांगितलं. मंजिरीनं हळूच दुर्बीण रोखली. तिला दिसायच्या आत रघूनं पानांच्या गर्दीत लपलेलं घुबड मंजिरीला दाखवलं. डोक्याच्या मधोमध नाक आणि गॉगल लावावेत असे डोळे.

मग त्या दुकली बरोबर शिंपिणीचं, सुतार पक्ष्याचं घरटं, झाडाला चिकटून लोंबकळत किड्या अळ्या शोधताना आवाज करीत राहणारा सुतार पक्षी, हिरवे गार, थव्यानं हिंडणारे पोपट असं भांडारच मंजिरीपुढे खुलं झालं.

" परत्येक थंडीला पक्षी इथं येतात. मंग इतर दिसात कुठं जात असत्याल ते ? " या सारजेच्या प्रश्नावर काही पक्षी उंच हिमालय सुद्धा पार करून जातात हे मंजिरीचं उत्तर ऐकून रघू वा सारजा चकीत झाली. मंजिरीनं दाखवलं, " हे बघ, या पुस्तकातच लिहिलं आहे हे. वाच."

" पन आमाला वाचाया कुठं येतंय ? " रघूनं निराशेनं विचारलं.

त्या दिवशी संध्याकाळी मंजिरी आजोबांकडे इकडच्या तिकडच्या गोष्टी करत बराच वेळ बसली तेव्हा " आज लाडीगोडी लावून काहीतरी उकळायचा बेत दिसतोय्." आजोबा हसत हसत म्हणाले.

" आजोबा, आज अशी मज्जा आली ! --" रघू आणि सारजा भेटल्यापासूनचं सगळं तिनं आजोबांना सांगितलं आणि म्हटलं, " आजोबा, दुपारी तुम्हाला मोकळा वेळ असतो, तेव्हा त्या दोघांना लिहाय वाचायला शिकवा ना ! "

आणि आता गेल्या नाताळच्या सुट्टीच्या तोंडावर तिला एक वेड्या वाकड्या अक्षरातलं पत्र आलं होतं. " मनजिरी ताई आम्ही तुमची वाट पघत आहोता या वरशी बरेच पक्शी आले आहे. -- तुमची रघू सारजा".


मुख्यपान Homepage

संपर्क

आमच्याशी संपर्क साधाः
Contact us here:
myemail

लेखकः मानसी मोकाशी