"सध्याचं शिक्षण निरुपयोगी आहे. या नवीन अभ्यासक्रमाप्रमाणे विद्यार्थी फार तर बहुश्रुत होईल, आपल्याशी वाद घालू शकेल, त्याची व्रेड्थ वाढेल पण डेफ्थ वाढणार नाही, आणि आयुष्यात त्याचा उपयोग नाही." अण्णासाहेब सहस्रबुद्धे म्हणाले. कोकणचे गांधी अप्पासाहेब पटवर्धनांच्या मागे त्यांनी अप्पासाहेबांचे कार्य चालू ठेवले आहे.
अप्पासाहेब पटवर्धन मुळचे रत्नागिरीचे. त्यांनी स्वातंत्र्य चळवळीत उडी घेतलीच पम स्वातंत्र्य मिळाल्यावर आपल्या जन्मभूमीकडे ते वळले. कोकण म्हणजे अठरा विश्वे दारिद्र्य. जो उठतो तो नोकरीसाठी मुंबईकडे धाव घेतो. कारखान्यात काम मिळवतो, नाही तर लोकांच्या कडे भांडी घासतो. कोकणातल्या खेड्यांत वर्षभरातले काही महिने सोडून (जेव्हा मुंबईहून लोक घरी परत येतात तेव्हा) म्हातार कोतार, बायका आणि मुलंच राहतात. त्यामुळे तिथल्या शेतीकडे दुर्लक्ष झालं आहे. हा मुंबईकडे जाणारा प्रवाह थांबावा, या कल्पनेनं अप्पासाहेब पटवर्धनांनी शेतीचं शिक्षण देऊन स्वावलंबी करणारा "गोपुरी आश्रम" १९४८ साली कणकवली तालुक्याच्या "वाघदे" गावी स्थापन केला.
मे च्या पाच व सहा तारखांना या गोपुरी आश्रमाला पंचवीस वर्षं होतात. त्या निमित्त आणि अप्पासाहेबांच्या स्मृतीला खरी आदरांजली वाहण्यासाठी गोपुरीची कृषि विद्यालयाची कल्पना पुढे आली आहे. अण्णासाहेब सहस्रबुद्धे कै. अप्पासाहेब स्मारक निधीचे अध्यक्ष म्हणून या योजना अंमलात आणीत आहेत.
"सध्या आश्रमात चोवीस लोक आहेत. त्यांनी पूर्वीच्या स्मशानाच्या उंचसखल जागेचं रुपांतर शेतजमिनीत केलं आहे. त्या चोवीस जणांपैकी तीन चार जण विवाहित आहेत. या शिवाय एक स्त्री देखील इथे आहे. बाकी जवळजवळ पंधरा तरूण सोळा ते बावीस या वयोगटातले आहेत." अण्णासाहेब सांगत होते. "तिघंजण जुने म्हणजे १९४८, १९५४ आणि १९५६ सालापासून आहेत. शिक्षण सातवी असेल पण शेती क्षेत्रात कृषी पदवीधरालाही मागे टाकतील."
या सध्याच्या गोपुरी आश्रमाचाच विस्तार होणार आहे. कणकवली ही तालुक्याची जागा, तिथून आश्रम दोन मैलांवर आहे. आश्रमाच्या तिन्ही बाजूंना नदी वाहते. म्हणजे पाणी भरपूर आहे. सध्या सतरा एकर जागेत सर्व प्रकारची पिके निघतात. गहू, भात, ऊस, भाज्या व मसाल्याचे पदार्थ. आणखी सतरा एकर जमीन खरेदी केली आहे.
"शाळा एक जून पासून सुरु होणार म्हणता तर मुलं कोणत्या प्रकारची घेणार शाळेत ?" मी विचारलं. "गुरुकुलात प्रथम कणकवली तालुक्यातली आणि त्यानंतर रत्नागिरी जिल्ह्यातली मुलं घेणार. त्यांच्या घरची शेती असावी. मेहनत करण्याची तयारी असावी. येणाऱ्यांत निरक्षरांपासून ते एस्.एस्.सी. पास झालेल्यांपर्यंत सर्व तऱ्हेचे लोक असणार. सध्या आम्ही आणखी चोवीस लोक घेणार. प्रत्येकाचा वर्ग वेगळा असणार. तो आपल्या कुवतीप्रमाणे शिडीच्या वरच्या पायरीवर चढून जाईल."
श्री. कोल्हटकर, हरिश्चंद्र पाटील, जयंत पाटील, लिमये, बांदेकर आणि स्वतः अण्णासाहेब सहस्रबुद्धे यांनी गुरुकुलासाठी शिक्षणक्रम आखला आहे. विद्यार्थ्यांना चार ते सहा तास शेतात काम करावे लागेल. इतर वेळेला शिक्षण (शेतीला उपयोगी पडेल असे) देण्यात येईल. प्राणीशास्त्र, वनस्पतीशास्त्र, रसायनशास्त्र इत्यादि विषय शिकवण्यात येतील.
"इतर शाळांप्रमाणे भाषा शिकवणार का ?" माझा प्रश्न होता.
"भाषा शिकवणार नाही. अभ्यासक्रमात इंग्रजी असणार नाही. त्यावाचून अडत नाही. लागणारी सर्व पुस्तके मराठीत उपलब्ध आहेत. भाषेऐवजी वर्तमानपत्र वाचण्याचा एक वर्ग आम्ही ठेवणार." अण्णासाहेबांनी उत्तर दिले.
विद्यार्थ्यांना इथेच रहावं लागेल. पहिल्या तीन महिन्यात विद्यार्थांनी पुढे रहावं की नाही याचा दोन्ही पक्षांकडून विचार होईल. शिक्षणाला फी अशी द्यावी लागणार नाही. केलेल्या कामाच्या मजुरीतून "गोपुरी" प्रत्येक विद्यार्थ्यांमागे साठ रुपये खर्च करेल. अभ्यासक्रम कमीतकमी दोन वर्षांचा तरी असेल. यात विद्यार्थ्याला घरी जाता येणार नाही. पालकांना मुलाला भेटायला वर्षातून आठदहा दिवस इथे राहता येईल. यावेळी पालकांनाही शेतात काम करावं लागेल.
"विद्यार्थ्यांना नवीन शेतकी शास्त्राची आम्ही ओळख करून देऊ. यांत्रिक नांगर (तेरा अश्वशक्तीचा ट्रॅक्टर) वापरू. पाण्यासाठी पंप. या यंत्रांच्या दुरुस्तीसाठी यंत्रशाळा चालू करू. दापोलीच्या कृषी विद्यापीठाच्या मदतीनं आम्ही चालवतो. आमच्यातले अनुभवी लोक सध्या शिकवतील. त्यांना आम्ही ट्रेनिंगसाठी दापोलीला पाठवू. "शिक्षकाच्या आवश्यक पदवीची आम्हाला जरुरी नाही." अण्णासाहेबांनी सांगितले.
सध्याची चौतीस एकरांची जागा अधिक वाढवली जाईल. गवताची शेती ताज्या सकस चाऱ्यासाठी केली जाईल. गोशाळा, तेल बनवणे, कोकम, आंबे, फणस टिकवणे साबण उद्योग यांचेही शिक्षण येथे मिळेल. स्त्री पालिका मिळाली तर मुलींनाही प्रवेश देता येईल. गोपुरीला दरवर्षी मे महिन्यात गावकरी एकत्र जमतात. त्यावेळी सध्याच्या कार्यकर्त्यांचा विचार विनिमय होतो.
आश्रमाजवळच एक निसर्गोपचार केंद्र होणार आहे. स्वातंत्रसैनिकांना पेन्शन देऊन पण उतारवयात राजकारणात न पडता समाजाच्या उपयोगी पडण्याची संधी देणारे हे माहेरघर असेल.
सरकारी मदतीशिवाय अप्पासाहेब पटवर्धन स्मारकाच्या निधीतून अप्पासाहेबांच्या कल्पनांना मूर्त स्वरूप देणं हेच त्यांच्या कार्याचं खरं स्मारक असेल, नाही का ?