संग्रहातून इतिहास जपणारे विठ्ठल कुमावत

दूरध्वनीची सुविधा दूरवर झाल्यावर पत्रलेखनाचा कंटाळा केला जातो हा आपला रोजचा अनुभव. त्यामुळे काही वर्षांपूर्वी पत्रलेखन व वाचनातून मिळणाऱ्या आनंदाला आपण पारखे होत आहोत असे नाही का ?

या विचाराला एक पत्रलेखक व पत्रसंग्राहकाला भेटल्यावर पुष्टीच मिळाली. सोलापुरातील विठ्ठल लालजी कुमावत यांनी विविध प्रकारच्या संग्रहांसाठी स्वतःला वाहूनच घेतले आहे म्हणाना ! यातील एक आहे पत्रसंग्रह. हा ही थोडा थोडका नाही. त्या संग्रहाने एक छोटे कपाटच व्यापले आहे. वयाच्या पंधराव्या वर्षी म्हणजे १९३८ साली त्यांनी या पत्रसंग्रहाला सुरुवात केली. १९९७ अखेरपर्यंत वर्षवार असे पत्रांचे गठ्ठे त्यांनी जपून ठेवले आहेत.

जुनी पत्रे चाळल्यावर त्या काळाचा पुनःप्रत्यय येतो आणि आनंद होतो. माझा मुलगा डॉक्टर आहे. तो सात आठ वर्षांचा असताना मी पत्नीला लिहिले होते, " प्रदीपला डॉक्टर करायचे आहे. तो डॉक्टर झाला तर आपल्यासारखे भाग्यवान आपणच." ते पत्र या संग्रहात आहे. कुमावत काकांनी आठवण सांगितली. त्यांनी त्यांच्या सासुरवाडीस लिहिलेली पत्रे तेथून आणली, काही घरातली पत्रे संग्रहात आणली. मित्र नातलगांकडून आणलेली पत्रेही संग्रहात आहेत. त्याच बरोबर त्यांनी इतरांना लिहिलेल्या महत्वाच्या पत्रांच्या स्थळप्रतीही त्यांनी ठेवल्या आहेत. अशा महत्वाच्या पत्रांचे संकलन, काहींचे पुनर्लेखन करून १०० पत्रांचा एक संग्रहच वेगळा ठेवला आहे.

श्री. कुमावत यांनी या संग्रहात त्यांच्या बहिणीच्या पतीला लिहिलेल्या पत्रांचा एक वेगळा संग्रह आहे. तो फारसा सुखद नसला, तरी त्यावेळच्या पत्नी वा सुनेकडे बघण्याचा समाजाच्या दृष्टिकोनाचा आरसा त्यात आहे. त्यामुळे सामाजिक दृष्ट्याही अशा पत्रांना महत्व आहे.

मी दैनंदिनीही लिहितो. त्या त्या वेळी महत्वाच्या नोंदी त्यात होतात. पण नंतर त्या चाळताना काही वेळा त्यातील माणसेही चटकन डोळ्यासमोर येत नाहीत. अशा वेळी मी त्या त्या वर्षांची पत्रे बघतो. म्हणजे त्या माणसांचे संदर्भ बहुतेक वेळा त्यात मिळतात, असे श्री. कुमावत यांनी सांगतले.

१९३८ ते ४२-४३ या काळात कुमावत यांचा रा.स्व. संघाच्या कामात सहभाग होता. त्यावेळी पत्रे जपून ठेवावीत याची जाणीव प्रकर्षाने झाली. त्यामुळे सुरुवातीची काहीच पत्रे माझ्याजवळ असली तरी नंतरची सर्व पत्रे मी ठेवली आहेत असे त्यांनी सांगितले. त्यांच्या संग्रहात दरवर्षीची तारीखवार पत्रे आहेत ती त्यामुळेच !

फक्त पत्रलेखन व पत्रसंग्रह हा त्यांचा छंद नाही. त्यांचा चित्र व कात्रणसंग्रह सुद्धा फार मोठा आहे. तोही अतिशय पद्धतशीरपणे केलेला. सुरुवातीला अनुक्रमणिका त्यानंतर कात्रणे, अनुक्रमणिकेत विषयवार पानावर नोंद व या कात्रणसंग्रहाची वेगळी अनुक्रमणिका, महाअनुक्रमणिकाच म्हणाना !

या कात्रण संग्रहातील एक संग्रह आहे आचार्य अत्र्यांसंबंधी विविध ठिकाणी आलेल्या लेखांचा. शिवाय प.पू. गुरुजींना श्रद्धांजली, म्हाळगी यांना श्रद्धांजली, तळजाई शिबिर दर्शन, हॅलेच्या धूमकेतूसंबंधी, श्री. कुमावत यांनी माहिती दिली. "मोठी माणसे" म्हणून विविध क्षेत्रातील १०० व्यक्तींविषयी, गुरुजी विचारदर्शन, योग जिज्ञासा, वृक्षवल्ली आम्हा, नॉस्ट्राडेमसच्या भविष्याबद्दल, गोवा मुक्तीसंग्राम, आजीबाईचा वटवा अशा विविध विषयांवरील कात्रणे त्यांचा कडे आहेत.

पुस्तकांचाही त्यांचा मोठा संग्रह आहे. एक हजाराहून अधिक पुस्तके त्यांनी संग्रहित केली आहेत. त्यांची विषयवार सूचीही आहे. ते स्वतः उत्तम बाइंडिंग करतात. १९५० सालचा कल्याण मासिकाचा हिंदू संस्कृतीबद्दलचा अंक मला मिळाला. अंक ९०० पानांचा, त्याचे तीन भाग करून त्याचे बाइंडिंग केले, असे त्यांनी सांगितले.

१९७९ ते १९८६ या काळात त्यांनी विश्व हिंदू परिषदेचे शहर अध्यक्ष म्हणून काम केले होते. पण आता प्रकृती साथ देत नाही. त्यामुळे शक्य होईल तेवढेच रा.स्व. संघाच्या कार्यक्रमांना ते उपस्थित राहतात. कौटुंबिक व काही प्रमाणात सामाजिक इतिहासाचे संकलन त्यांनी केले आहे. " पाडव्यादिवशी, आद्य सरसंघचालक डॉ. हेडगेवार यांच्या जन्मदिवशी अटलजींवरील विश्वासमत प्रस्ताव पारित झाला ही गोष्ट आशादायक आहे" असे मत त्यांनी व्यक्त केले.

कुमावत यांनी लग्नपत्रिकांचाही संग्रह केला होता. आताही त्यांच्या कुटुंबियांच्या लग्नपत्रिका व जन्मकुंडल्या त्यांच्या संग्रहात आहेत. पण मित्र व नातेवाईकांच्या अनेक लग्नपत्रिका त्यांनी स्वखर्चाने त्यांना पाठवल्या. त्यावर "ही पत्रिका तर आमच्याकडेच नव्हती. तुमच्यामुळे ती मिळाली." अशी कृतज्ञतेची पत्रे त्यांनी कुमावत यांना लिहिली. मुला-नातवंडांत रमलेल्या अनेकांना आपल्या लग्नपत्रिका अनेक वर्षांनी अशा मिळाल्या !


मुख्यपान Homepage

संपर्क

आमच्याशी संपर्क साधाः
Contact us here:
myemail

लेखकः मानसी मोकाशी