"यंदा उन्हाळा जरा जास्तच आहे नाही ?"
"हो नं ! असं पूर्वी उकडत नसे बुवा !" हा घराघरातला संवाद.
हा उकाडा कमी करण्याकरता माणूस स्वयंपाकघरातल्या थंडगार पाण्याच्या माठाकडे वळतो. आणि म्हणूनच उन्हाळ्याच्या सुरुवातीला घरातला माठ उन्हात तापवणे, फुटला असेल, जुना झाला असेल, तर नवा आणणे हे कामच होतं.
माठ म्हणजे मातीची भांडी. चाकाचा शोध लागला आणि त्या चाकाच्या गतीचा उपयोग करून मातीला आकार देण्याची कला माणसानं अवगत केली. तेव्हापासून तयार होत असलेली ही वस्तू. आता फ्रीजमुळे माठांचा वापर कमी होतो आहे हे खरं, पण सर्वसामान्य माणसाच्या आवाक्यातला माठच.
थोड्या वेळापूर्वी नुसता जिथे मातीचा गोळा असतो, तिथे कुंभार आपले हात आणि चाक याच्या साह्याने मातीचे मडके बनवतो. पण त्यांचे आकार तरी किती ! साधा माठ, गोल बुडाचा, चपटी बैठक असलेला, सुरई, तोटीची - बिनतोटीची, नक्षीचा नळ असलेला माठ, रांजण.
"खोजे, रांजण, लाल माठ, कुंड्या आम्ही करतो. धातूचे नळ असलेले डेरे मुंबईहून येतात." मंडईतल्या हसन सिद्दिकी कुंभाराने सांगितले. इतर पुष्कळशा कुंभारांप्रमाणे याचे आजोबा चाळीस पन्नास वर्षांपूर्वी कच्छमधून आले आणि त्यांनी कुंभाराच्या धंद्याला सुरुवात केली. आता त्याचे वडील, भाऊ आणि तो या धंद्यातच आहेत.
"आम्ही संगमवाडीहून माती आणतो. माती तीन प्रकारची असते. चिकट, भसर आणि गाळ." दगडोबा वाघोलीकर सांगत होते. त्यांच्या वाडवडिलांनी हा धंदा केव्हा सुरू केला हे सांगता येणार नाही इतका जुना आहे.
"मग माती चाळायची, पाणी घालून तो चिखल चाळणीनं चाळायचा, त्यात भट्टीची राख आणि घोड्याची लीद मिसळयाची. तो चिखल पायानं तुडवायचा, आणि मग तो चिखलाचा मऊ गोळा सिमेंटच्या चाकावर चढवायचा."
आकार द्यावयाची सिमेंटची चाकंही हे लोक स्वतः तयार करतात.
तयार झालेले कच्चे मडके लाकडी चोपणीने घट्ट करून आकार देतात. त्याला रंग देतात. मग आठवडाभर सावलीत वाळवतात आणि मग भट्टीत घालतात.
भट्टी म्हणजे दोन अडीच फूट उंच, मधे लहान भोक असलेली जागा, त्यात गवत घालून मडकी घालून वर राख घालून ती झाकतात आणि लाकडाने आंच देतात. मातीच्या गोळ्यापासून भट्टीतून बाहेर पडेपर्यंत जवळ जवळ आठ दिवस लागतात. काळ्या माठाला काळं पॉलिश लागतं. लाल माठाला गेरू घालतात.
" या मडक्यावरची नक्षी कशी काढता तुम्ही ? " मी विचारलं.
"शाडूची, प्लास्टिकची फुलं आम्ही बाजारातून आणतो. ती मातीवर ठसवून कुंडीसारखा भाजून साचा तयार करतो, आणि मग ती नक्षी काढायला वापरतो. " हसनने सांगितले.
मुंबईहून येणारा माल मध्ये फुटला तर नुकसान होते. एखादीच चीर असेल तर ती सिमेंटने बुजवतात. "सिमेंटने पाणी कमी गार होत नाही का ?" "नाही, सगळ्याच माठाला सिमेंट लावलं तर गार होत नाही. एखाद्या ठिकाणी लावून काही तोटा होत नाही." हे माझ्या प्रश्नाचं उत्तर.
तसं तर काय खूप पॉलिश करून चकचकीत केलेल्या माठातही पाणी चांगलं गार होत नाही. कारण पॉलिशनं माठाची छिद्रं बुजतात. बिन पॉलिशचा माठ सर्वात चांगला. या वर त्या लोकांचं म्हणणं असं की विनपॉलिशचा माठ गिऱ्हाइक घेणार नाही. चांगला माठ असला तर तो काळा असो वा लाल त्यात पाणी गार होतंच असाही त्यांनी निर्वाळा दिला.
अशी ही पूर्वीच्या बारा बलुतेदारांपैकी एक कुंभाराची जात. पूर्वजांचा धंदा ते आजतागायत चालवतात. नारायण शिंदेंसारखी काही माणसं स्वतः मडकी तयार करीत नाहीत, पण लोकांच्या कडून विकत घेऊन पुन्हा विकतात. या सर्वांचा धंदा उन्हाळ्याचे जेमतेम चार महिने चालतो. कुटुंबही त्यातच असते. चांगला कारागीर दिवसाला वीस पंचवीस मडकी बनवतो. पण याता पैसा नाही. दीड दोनशे रुपये नवरा बायकोत मिळून त्यांना मिळतात.
इतर वेळेला कुंड्या, बैल पोळ्याला बैल, गणपतीच्या दिवसात गणपती, संक्रांतीच्या, लग्नाच्या दिवसात सुगड करून ते कसेबसे भागवतात. सीझनला आठ दिवसांनी भट्टी लागते तर इतर दिवसात पंधरवडा महिन्याने.
"सात रुपये गाडीभर मातीला पडतात. ती किती दिवस पुरणार हो ? ट्रकभर घेतली तर स्वस्त पडती. पर एवढा पैसा कुठून आणायचा ?" अशी त्यांची तक्रार आहे.
घड्यांमधे काही सुधारणा करायची, त्यांचा दर्जा वाढवायचा तर बाजार मिळेल, पण त्याला चांगली माती पाहिजे.
"बेळगावकडे संशोधन केलेली माती मिळते, तर इतक्या लांबून आणून परवडत नाही. आम्हाला सरकारनं पाठिंबा द्यायला पाहिजे." अशी त्यांची मागणी आहे.
पुण्याबाहेरची बाजारपेठ नाही. उलट इथंच नगरपासूनचे माठ येतात. करणाऱ्यांना विक्री येत नाही, आणि विकणाऱ्यांना करता येत नाही. म्हणून व्यापाऱ्यांना ठोक विकावं लागतं. पन्नास साठापासून शंभर सव्वाशे रुपये शेकडा पर्यंतच विक्रीचा भाव येतो. मग काय करणार ? ब्रह्मदेवाशी आपण कुंभाराची तुलना करतो. त्या कुंभाराची परिस्थिती अशी आहे !
सकाळ, सोमवार ता. १६ एप्रिल १९७३