जगाच्या रंगभूमीवर पात्रं म्हणून माणसंच वावरतात असं नाही, तर जनावरंही नाना चेष्टितं करत असतात. आपल्या रानाच्या राज्यात हवं तसं वागण्याचं स्वातंत्र्य त्यांना असतंच. पण माणसांच्या राज्यातही इंग्लंडात जॉर्ज मॉटरशेड्स सारख्या माणसानं त्यांना स्वातंत्र्य द्यायचं ठरवलं, आणि पिंजऱ्यांच्या, साखळ्यांच्या बंधनातून मुक्त असलेला "चेस्टर झू" तयार केला.
पण ही जनावरं तरी सरळ थोडीच वागताहेत ! त्यांनीही मॉटरशेड्स महशयांची परीक्षाच घेतली. स्वातंत्र्य देऊन संभाळू पहाणारे मॉट्स साहेब जिंकतात, का नाना क्लृप्त्या काढून भंडावून, सतावून आम्ही जिंकतो ! मॉट्नं होमो सेपियनचा मेंदू असलेल्या माणसाच्या कर्तृत्वाचा इंगा दाखवला ते अलाहिदा. अर्थात नशिबानेही हात दिला.
आता हेच पहा ना ! "प्राण्यांना खायला घालायला मनाई आहे." अशी पाटी त्यानं आपल्या प्राणी संग्रहालयात लावली. कारण नको असलेल्या वस्तू हे प्राणी खातात आणि मग आजारी पडतात. एका बाईसाहेबांनी बादलीभर तांबट फळे एका धृव प्रदेशातल्या अस्वलाला खायला दिली होती. अस्वल दोन दिवस चांगलंच आजारी झालं. एक पक्षी तर बिचारा खोकल्यावरचं औषध खाऊन मेला !
पण यावरच नको ते पदार्थ खाण्याचं या प्राण्यांनी सोडलं नाही. ऑझी नावाच्या शहामृगानं कमालच केली. जे हाती येईल ते खायची त्याला सवय होती. एका लष्करी अधिकाऱ्याला संग्रहालयात फिरताना मॉटनं म्हटलं " या ऑझीला दोन तीन दिवस बरं नाहीये. त्याच्या दाराचं कुलूप नाहिसं झालंय, खाल्लन कि काय बेट्यानं कोण जाणे !"
"मग त्याची माइन डिटेक्टरनं (खनिज शोधण्याचं यंत्र) तपासणी का नाही करत ?" त्या अधिकाऱ्यानं म्हटलं.
सैनिकांच्या तुकडीसकट माइन डिटेक्टर आणला गेला. त्या शहामृगाला बांधून त्याची तपासणी झाली. त्याच्या पोटात काहीतरी धातूची वस्तू असल्याचं ठरलं. डॉक्टरनं त्याचं ऑपरेशन केलं, आणि नाहीसं झालेलं कुलूप पोटातून काढलं.
दोन दिवस ऑझी बरा होता. पण काय झालं कोण जाणे, एकाएकी आजारी पडून तो गेला. पोस्ट मॉर्टेम मधे असं दिसलं की आणखीन एक कुलूप त्याच्या पोटात राहिलं होतं. यानंतर शहामृगांना खाता येणार नाहीत आणि काढता येणार नाहीत अशी कुलुपं बसवण्यात आली. ऑझी गेला पण इतर बचावले !
संग्रहालयातल्या टेलिफोनवर चांगलीच आपत्ती ओढवली होती ! बोलता बोलता काही तरी बिघाड एकदम व्हायचा आणि बोलणं मध्येच थांबायचं. टेलिफोन ऑफिसमधे तक्रार केली त्यावर सगळ्या तारांची, स्विचबोर्डची तपासणी झाली पण छे ! येरे माझ्या मागल्या ! एकदा असंच झालं. फोन बंद झाला. तक्रार करायला कुणाला बाहेर तरी पाठवावं म्हणून मॉटरशेड्स निघाले. सवयीनं त्यांनी प्राण्यांकडे नजर टाकली. त्यांच्या लक्षात आलं, जॉर्ज जिराफ कसल्यातरी कामात गुंतला होता. सर्वसाधारण पणे जॉर्ज स्वागताला नेहमी हजर असायचा. पण आज लक्षण काही वेगळंच होतं ! मॉटरशेड्स बघायला गेले तो काय, जॉर्ज आपली उणीपुरी अठरा फूट उंची वापरून, भरीत भर मान लांबवून जवळून जाणारी टेलिफोन वायर चाटत होता. त्यामुळेच मॉटरशेड्सचं संभाषण थांबलं होतं.
टेलिफोन कंपनीनं आपले इंजिनिअर्स पाठवले आणि त्यांनी सांगितले " या वायर्स उंच करायला हव्यात". काम सुरू झालं. जिराफ मन लावून हा प्रकार बघत होता. वायरची उंची वाढवून झाली. लोकांनी काम संपवलं आणि जॉर्ज कामाला लागला. मान लांबवून आणि आपली अठरा इंची निळी जीभ वायरभोवती गुंडाळून त्यानं ती ओढून घेतली. सगळ्या दिवसाचे श्रम वाया गेले ! त्यावरही उंच खांबावर वायर बसवावी लागली.
जॉर्जच्या उपद्व्यापांना वृत्तपत्रात प्रसिद्धी मिळाली. लोक बघायला आले. त्यालाही समजलं आपलं कौतुक होतंय. हे कौतुक त्याला आवडायला लागलं. इतकं की लोक परत जायला वळले की रागानं त्यांच्या डोक्यावरच्या हॅट्स तो काढून घ्यायचा त्यामुळे लोकांना मागे उभे राहण्याची सूचना केली गेली. एक माणूस लक्ष ठेवायला बसवला, आणि बाजूचं कंपाउंडही उंच केलं. टोप्या आणि हॅट्स काढून घेताना तो लोकांना इजा करायचा नाही, पण आतलं अस्तर खाण्याची भीती होती. जॉर्जच्या स्वैराचाराला पायबंद बसला, पण तो मात्र बिथरला. जिराफाला ओरडता येत नाही असं म्हणतात पण तो मात्र रागावून चक्क ओरडला.
जिमो नावाचा ओरांग उटांग चांगलाच बनेल निघाला. चार वर्षांचा असताना तो चेस्टरला आला. नवीन असताना ओरांग उटांग माकडासाठी असलेल्या बेटावर त्यानं वेळ घालवला. इतर सवंगड्यांमधे रस घेतला. नंतर मात्र एकदा मधला खंदक पार करून प्रेक्षकांमधे घुसला. रखवालदारांनी लक्ष ठेवायचं तरी किती ? मॉटरशेडनं कमी व्होल्टेजची विजेची वायर बेटाच्या बाजूनं लावली. जिमीनं त्याच्यावरून टांग टाकून पूर्वीच्याच मार्गानं येणंजाणं चालू ठेवलं. म्हणून दुसरी एक वायर वरती लावली तेव्हा वायर लावलेले लाकडी खांबच जिमीनं उपटून काढले ! म्हणून भक्कम आधारावर असलेलं पार करायला अवघड असं वायरचं जाळं बसवलं. पण महाराजा जिमी माणसाच्या पूर्वजांचा मेंदू जवळ बाळगून होता. नाना प्रयोग करून त्यानं शॉर्ट सर्किट करायची आपली पद्धत बसवली. कशी ? त्या वायरवरून बाजूच्या पाण्यात गवत सोडून.
नंतर मात्र जिमीलाच शॉर्ट सर्किट करा, खंदक ओलांडा याचा कंटाळा आला आणि त्यानं आपल्या सवंगड्यांमधे पुन्हा लक्ष घालायला सुरुवात केली. पण उपद्व्यापीपणा मात्र सोडला नव्हता. कुणीतरी एकदा फेकलेली प्लॅस्टिकची पिशवी पाण्यातून बाहेर काढून स्वारीनं खाल्ली आणि अगदी मरता मरता वाचला नशिबानं.
मॉली नावाच्या हत्तिणीची अशीच एक कथा. "के" या तिच्या माहुतानं सिलोनमधे ती अगदी लहान असतानापासून तिची देखभाल केली होती. तो अर्थातच तिचा लाडका होता. तिच्या पाठीवर बसून मुलं एकदा अशीच हिंडत असताना एक दारुड्या तिच्या पुढं आला आणि बोट दाखवून तिची थट्टा केली. बाईसाहेबांना राग आला, आणि तिनं त्याला सोंडेनं बाजूला ढकललं. तरी तो दारुड्या ऐकेना तेव्हा त्याच्या पँटची मागची बाजू सोंडेनं पकडून त्याला जमिनीपासून एक फूट अधांतरी उचललं. आता त्याला खाली टाकून मॉली पायाखाली चिरडणार काय ? तिनं त्या दारुड्याला काही वेळ तसंच अधांतरी ठेवलं आणि नंतर जवळच्या हिरवळीवर त्याला हळूच सोडून दिलं आणि ती निघून गेली. तोपर्यंत दारुड्याचे डोळे चांगलेच उघडले होते.
मॉलीनं दुसऱ्यावेळी मात्र पाठीवरच्या मुलांची अगदी परवड केली होती. का ? तर तिच्या माहुताच्या, "के" च्या, मुलीसाठी. त्याचं असं झालं, एकदा "के" तिला घेऊन हिंडवत होता. पाठीवर मुलं होती. कुठून कोण जाणे, तिनं "के"च्या मुलीचं रडणं ऐकलं. तिला वाटलं हे रडणं साधं नाही- मुलगी संकटात आहे. मॉली निघाली. मधे झाडं झुडुपं आली तरी तमा न करता ती निघाली. पाठीवरची ती पोरं बिचारी किंचाळत ओरडत जखमी होत होती.
मॉली अखेर "के"च्या मुलीपाशी पोचली. मुलगी तीनचाकी सायकलवरून हिंडताना एक चाक चिखलात अडकल्यानं रडत होती. मॉलीनं मुलीला उचललं. सोंडेनं कुरवाळलं. "के" तोपर्यंत येऊन पोचला होता. त्यानं सायकल काढली आणि मॉलीच्या पाठीवरच्या मुलांना शांत केलं.
या प्रकारापासून मॉटरशेड्सनं ठरवलं की प्राण्यांना कुणा एका माणसावर अवलंबून ठेवायचं नाही. शक्यतो स्वतंत्र आयुष्य कंठू द्यायचं. ते सगळ्यांच्याच हिताचं होतं. या अनुभवातूनच "चेस्टर झू" तयार झाला, आणि या तत्वावर इतरही झू तयार झाले - जगभर !
("झू विदाउट बार्स" या जून जोन्स यांच्या पुस्तकाचा आधार ) सकाळ तारीख २० मे १९७३