पुण्यामधील फुलांचा व्यवसाय

निसर्ग आणि मानव यांच्यात स्पर्धा लागलेली असते. कधी निसर्ग पुढे जातो तर कधी मानव निसर्गाला मागे टाकतो. त्याच वेळी या दोन्हींच्या मदतीने नवीन गोष्टी निर्माण होतात. जुन्या गोष्टी सुधारतात. आता हेच पहा ना ! फुले हे निसर्गाचे देणे. शहरे बनवली माणसांनी. पण फुले माणसांना हवीशी वाटली आणि रानात कुणाच्या दृष्टीस न पडता सुकून जायच्या ऐवजी वेगवेगळ्या प्रसंगी शहरी डामडौल ती मिरवायलाही लागली.

पुण्यातला फुलांचा व्यापार तसा जुना आहे. पाषाणकर, गायकवाडा, मोहिते यांच्यासारखे व्यापारी हा धंदा पिढिजात असल्याचे सांगतात. "जवळजवळ ऐंशी वर्षांपूर्वी आमच्या आजोबांनी या व्यवसायाला सुरुवात केली. माझअया वडिलांनंतर मी आणि माझा पदवीधर भाऊ आम्ही नोकरीपेक्षा स्वतंत्र व्यवसाय चांगला हे पटून तो पुढे चालू ठेवला आहे."

फुले कोल्ड स्टोरेज मधे

लोणी काळभोर, चऱ्होली, मुंढवा, हडपसर, कोथरूड, केडगाव या पंचवीस तीस मैलांच्या परिसरातून पुण्यात फुले येतात. मुंबईच्या वसई विरार भागातून आणि वर्षांच्या काही महिन्यात बंगलोर कडून काही फुले आणवितात. बंगलोरकडे फुलांचा मोसम लवकर सुरू होतो. आणि आपल्याकडे फुले मिळायच्या आधी दीड महिना तिकडची फुले मिळू शकतात. लोकांनाही सीझनच्या आधी ती फुले मिळविल्याचे समाधान होते.

अर्थात ही फुले कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवूनही ताज्या फुलासारखी बाहेरचा वारा लागला की चार तासात खराब होतात. तरीसुद्धा कळ्या तोडून पाठवल्याने टिकण्याची जरा तरी आशा असते. असे व्यापाऱ्यांचे म्हणणे.

रोजचे रोज अनेक वेळा लिलाव

बागायतदार आपल्या बागांमधून फुलांची तोड करून एस्.टी.ने पाठवितात. तेथून पुढे सायकलवरून दलालांकडे माल येतो. पुण्यात एकूण आठ नऊ दलाल आहेत. इथे फुलांचे लिलाव होतात. मंडईजवळ होणाऱ्या व्यवहारात मंडईच्या लिलावाहून जरा वेगळे भाव ठरतात. मंडईत लिलावाच्या वेळी उपस्थित लोकांच्या नजरेआड असा भाव ठरतो तसे इथे नसते. इथे लोक उघड उघड लिलाव बोलतात आणि घेतात. पण या भावाचे वैशिष्ट्य म्हणजे वेगवेगळ्या भागातून फुले वेगवेगळ्या वेळी येतात. आणि त्यामुळे तासातासाने वेगळा भाव येतो.

"कधी सकाळी जास्त फुले आली तर भाव कमी, कधी दुपारी अपेक्षेपेक्षा कमी आवक झाली तर भाव जास्त असा चढ उतार होतो. दलालांनी सांगितले. बागायतदारांना चार पैसे मिळवून द्यावेत असा आमचा प्रयत्न असतो. विक्री होत नसेल तर चार पैसे कमी करून का होईना माल विकला जावा अशी इच्छा असते कारण विक्री नाही झाली तर फुलांचा कचरा होतो." दलालांना दर रुपयामागे दोन आणे कमिशन पडते.

वेळ नसला तरी देवभक्तीत वाढ

दुकान सकाळी सहाला जी उघडतात ती रात्री नवाला बंद होतात. सकाळी पुजेला फुले, संध्याकाळी देवांना हार, सभांमधे हार, गुच्छ हे बाराही महिन्यांचे काम. शिवाय सणावारांना आणि लग्नाचे मोसमात फुलांना बरेच महत्व येते. दुकानदारांच्या मते हारांची सर्वात जास्त विक्री होते. "वेण्या आणि गजरेही खपतात. पण हल्ली गुलाबांच्या सुट्या फुलांना चांगली मागणी आली आहे. गाड्या सजवणे, मिरवणुकी फार कमी झाले आहे. " पाषाणकर पूर्वी फुलांचे पुडे पूजेकरता घरोघर टाकण्याची व्यवस्था करीत. पण हल्ली ते बंद बंद करून दुकानात पुडे विक्रीला ठेवतात. उलट मोहिते, गायकवाड यांनी ही पद्धत चालू ठेवली आहे. "देवाला फुले वहायची पद्धत कमी होत आहे. कारण लोकांना वेळ नाही. जीवनाला गति आहे." असे पाषाणकर म्हणतात. तर "या दुष्काळामुळे देवावर अवलंबून राहायची, आपल्या असहाय्यपणाची जाणीव होऊन देवधर्म वाढला आहे. फुलं देवाला जास्त प्रमाणात वाहिली जातात." असे मोहित्यांचे म्हणणे आहे.

फुलांचे २१ दिवसांत तीन बहर

झाडाला २१ दिवस बहर असतो. सात दिवस वाढतो, सात दिवस टिकतो, सात दिवस कमी होतो. असे तीन बहर येतात. उन्हाळ्यात मोगरा, जाई ही वासाची फुले येतात. पावसाळ्यात जुई, चमेली गुलछडी ही फुले येतात. गुलाब बारा महिने येतो. विशेष मागणी असेल तर मुंबईहून कलमी गुलाब मागवले जातात. चाफा बागेतून मिळत नाही. बंगल्यांमधून झाड कॉंट्रॅक्टवर घेऊन ही फुले मिळवतात. मोसमाप्रमाणे काम कमी जास्त असतं. त्यामुळे नोकरांना रोजावर पगार मिळतो. आठवड्यातून आळीपाळीने अशी एक दिवस सुटी दिली जाते. पण सबंध दुकान बंद असत नाही.

मंत्र्यांना इतके हार का घालता ?

दुकानातले नोकर फारसे शिकलेले नाहीत हे खरे, पण मोठ्या दुकानदारांत शिकण्याची प्रवृत्ती वाढते आहे. "ठोक व्यापार सुरु करण्याआधी माझं सात इयत्ता शिक्षण झालं होतं. पण त्रेपन्न साली दलाली सुरू केल्यावर इंग्रजी वाचून अडू लागलं. बंगलोरहून माल मागवायचा म्हणजे इंग्रजी पत्रव्यवहार लागे, म्हणून मी मॅट्रिक झालो." मोहिते म्हणाले.

सगळ्या पुण्यात मिळून दिवसाला पंचवीस हजारांपर्यंत (ठोक व किरकोळ मिळून) फुलांचा व्यापार चालतो असा अंदाज आहे. फुले जितकी नाजूक, सुंदर तितकीच अल्पायुषी, त्यामुळे धोका फार. तरी व्यवहारी व्यापारी अनुभवाने आणि अंदाजाने विक्री करतो. पण नाही विकली गेली फुलं तर ती नदीची धन ठरतात, नाहीतर कचऱ्याच्या पेटीची तरी.

"मंडईजवळ शेंदूर फासलेला म्हसोबा वा अशा वाया जाऊ घातलेल्या फुलांनी इतका भरून जाई की त्या म्हसोबाचंच दर्शन होत नसे." एकानं सांगितलं. "लोक म्हणत, तुम्ही मंत्र्यांना इतके हार घालता का ?"

"फुलं वाया जायची ती त्यांच्या गळ्यात पडूद्यात असा विचार करून !"


मुख्यपान Homepage

संपर्क

आमच्याशी संपर्क साधाः
Contact us here:
myemail

लेखकः मानसी मोकाशी