मुंबईची मावशी परत निघाली. तिनं मिनी, चिंटूला जवळ घेतलं. मिनी आणि चिंटूनं नमस्कार केला. मावशीनं त्यांच्या हातात खाऊसाठी पैसे ठेवले. चिंटू, मिनीनं "नको नको" म्हटलं तरी मावशीच्या आग्रहामुळे त्यांना ते घ्यावे लागले.
मावशीनं बाहेर पडायला पाऊल उचललं आणि दचकून उभी राहिली. चिंटू, मिनीपाठोपाठ राजूनं आपलं सोंड पुढे केली होती.
" अगं ताई, राजूला नकोत का खाऊला पैसै ? "
" राजू ! " चिंटू आवाज चढवून म्हणाला " असे पैसे मागतात का ? "
पण हे बघून मावशीलाही हसू फुटलं होतं. तिनं पर्समधून रुपयाचं नाणं काढलं. राजूच्या सोंडेत ठेवलं. राजूचे डोळे आनंदानं लकाकले.
या प्रसंगाचं रसभरित वर्णन मावशीनं सर्वांना ऐकवलं. ते ऐकून सगळे हसले. पण त्यानंतर आलेल्या प्रत्येक पाहुण्यानं मुलांबरोबर राजूच्या सोंडेतही एखादा रुपया ठेवायचा ही प्रथाच पडून गेली.
" हा राजू त्याला मिळालेल्या पैशाचं काय करतो रे ? " मिनीनं म्हटलं. मिनी, चिंटू प्रकाश राजूच्या मार्गावर निघाले.
चिंटूच्या बाबूकाकांनी चार दिवस राहून परत जाताना राजूच्या हातात दिलेल्या रुपयाचं राजू काय करतो याचा छडा लावायचा त्यांनी ठरवलं.
घरातली सगळी मंडळी बाबूकाकांना पोचवायला एस्. टी. स्टँडवर गेली. राजू लगबगीनं त्याच्या घरी परतला.
वाढदिवसाला चिंटू आणि कंपनीनं दिलेल्या भेटीचं --घराचं, राजूला फार कौतुक वाटे. त्यामुळे तो घाईनं घरी परतल्याचं तसं आश्चर्य नव्हतं. पण त्याच्या सोंडेत रुपया होता.
चिंटू राजूच्या पाठोपाठ राजूच्या घरात शिरला. दारामागे लपून पाहात होता.
राजू हत्ती घराच्या कोपऱ्यात गेला होता. कोपऱ्यातले रोठ त्यानं बाजूला केले. सोंडेनं आणि पायानं जमीन हळूच उकरली. त्यात सोंडेतला रुपया ठेवला. वर माती सारली.
मग राजू त्याच्या घराच्या दुसऱ्या कोपऱ्यात गेला. त्यानं लसुनघासाचा एक भारा बाजूला केला. खालची माती उकरून बाजूला केली. सोंडेनं काहीतरी बाहेर काढलं. पुन्हा आत ठेवलं. वर माती सारली आणि तिथेच बसला. कपाळाला सोंड लावून.
चिंटू बघत होता.
चिंटूला कळेना. राजूनं कपाळाला हात..नाही सोंड..का लावली ते !
चिंटू आत गेला. राजू हत्तीच्या पाठीवर थाप मारून चिंटूनं विचारलं, " राजू, काय झालं रे निराश व्हायला ? आणि या लसुनघासाखालच्या खड्ड्यात तू ठेवलयस तरी काय पुरुन ? "
राजूच्या डोळ्यात पाणी आलं.
" काय रे काय झालं ? " चिंटूनं राजूच्या पाठीवरून हात फिरवला.
" मी त्या कोपऱ्यात मावशीनं दिलेला रुपया पुरला होता. त्याला पाणी घातलं होतं. पण त्याला पैशाचं झाडच आलं नाही. " राजूला पुन्हा हुंदका आला.
चिंटूला राजूच्या दुःखाचं कारण कळलं. तो रुपयाचं काय करतो हे कोडंही सुटलं.
" म्हणजे राजू, आता बाबूकाकांनी दिलेली रुपयाची नोटही तू पुरून ठेवलीस ? " चिंटूनं डोळे विस्फारून विचारलं. राजूनं मान हलवली.
रोठांच्या ढिगाकडे चिंटू गेला, ते स्वतःशी पुटपुटतच. आतापर्यंत सर्वांनी रुपयाची नाणी राजूला दिली होती हे नशीब. रोठ बाजूला सारून चिंटूनं नोट बाहेर काढली. ती दुमडली होती. मळली होती. लसुनघास बाजूला करून राजूनं खड्ड्यात पुरलेली रुपयाची नाणी बाहेर काढली. नऊ नाणी होती. त्यातली दोन काळी झाली होती.
चिंटूनं ती ताब्यात घेतली. स्वच्छ केली. बाबांनी त्या नाण्यांच्या बदल्यात दिलेलं दहा रुपयांचं नाणं चिंटूनं राजू हत्तीपुढं ठेवलं नि सांगितलं " वेड्या, असं पैशांचं झाड येत नसतं. नि झाडाला आंबे लागावेत तसे पैसेपण येत नसतात. "
" मग तू पैशाचं झाल लावलयस् ते ? " चिंटूनं लावलेल्या मनिप्लँटच्या वेलाकडे सोंड नेऊन राजूनं विचारलं.
" वेडा रे वेडा ! " चिंटूला हसू आलं. त्या झाडाला मनीप्लँट म्हणजे पैशांचं झाड म्हणतात. पण वेड्या ते काही खरं पैशाचं झाड नाही. हे घे तुझे दहा रुपये. ते पुरून ठेवू नको. दाह रुपयांचं नाणं सोंडेत घेताना राजू हत्ती आणखीच गोंधळला. दहा नाण्यांऐवजी एकच नाणं ? मग चिंटूनं त्याला समजावून सांगितलं. पूर्वीच्या दहा नाण्यांएवढीच या एका नाण्याची किंमत होती. हे एकच नाणं सोंडेत धरणं सोपं होतं.
" हे पैसे तुला वाढायला हवेत ना झाडासारखे ? मग आपण असं करू या. तुझं बँकेत खातं उघडू या. "
राजूच्या नावाचं मग बँकेत खातं उघडलं होतं.
चिंटूच्या बाबांनी दर महिन्याला एक रूपया राजूला द्यायला सुरुवात केली. पाहुणेही पैसे द्यायचे. आता राजू पैसे घरात पुरून ठेवत नसे. तो बँकेत जाई आणि पैसे बँकेत भरे.
चिंटूच्या सरांनीही त्याच्या शाळेत छोटी बँक सुरू केली होती. प्लॅस्टिकचे छोटे हत्ती त्यांच्या पोटाला खाच पाडून मुलांना पैसे साठवायला दिले होते. बँकेचं नाव होतं राजू बँक, आणि अध्यक्ष होता आपला राजू हत्ती !
केसरी रविवार दिनांक ७ जुलै १९८५.