नोबेल विजेते रामन

cvraman

ब्रह्मदेवानं ही सृष्टी निर्माण केली असं म्हणतात. डोंगर, दऱ्या, मासे, समुद्र किती गोष्टी ! किती तऱ्हा ! पण बोलून चालून देवच तो ! अनंत आकाशापासून अथांग समुद्रापर्यंत निसर्गातली वेगवेगळी कोडी माणसाला घालण्यात त्याला काय मजा वाटते कोण जाणे. पण माणसानं ती कोडी सोडवण्याचं आव्हान स्वीकारलं. यात भारताच्या वतीनं कामाचा वाटा उचलणाऱ्यात चंद्रशेखर वेंकटरमण हे मोठेच शास्त्रज्ञ होते.

बाराव्या वर्षी मॅट्रिक होऊन आपल्या विक्रमी आयुष्याला सुरुवात करणारे रामन् वयाच्या व्याऐंशीव्या वर्षांपर्यंत प्रयोगशाळेत संशोधन करत होते. त्यांच्या साठ वर्षांच्या वाढदिवशी त्यांनी म्हटलं होतं " आता तर मी माझ्या वैज्ञानिक जीवनाला आरंभ करतो आहे. "

साठाव्या वर्षीही असा उत्साह आणि आशा ठेवणाऱ्या आणि जिद्दीनं काम करणाऱ्या या माणसानं शास्त्रीय जगाच्या इतिहासात आपलं नाव ध्रुवाप्रमाणे अढळ केलं. १९३० साली शास्त्रीय विषयाचं विश्वविख्यात नोबेल पारितोषिक मिळवून भारताचा सन्मान केलाच. आणि आशिया खंडाचीही मान उंच केली. कारण विसाव्या शतकाच्या सुरुवातीलाच म्हणजे १९०१ सालापासून दिलं जाणारं हे बक्षिस मिळवणारे रामन् हे आशियातले पहिले शास्त्रज्ञ होते.

कित्येक बक्षिसे

त्यांना नोबेल पारितोषिकाबरोबरच कित्येक बक्षिसं मिळाली होती. भारतातला भारतरत्न किताब, रॉयल सोसायटीचं हायगेझ पदक, रोममधलं एक पदक, फिलाडेल्फिया इन्स्टिट्यूटचं फ्रँकलिन पदक, आंतरराष्ट्रीय लेनिन पदक अशी काही नावं उदाहरणादाखल देता येतील. सोन्याची, चांदीची आणि ब्रॉंझची पंचवीसच्या वर पदकं आणि त्यांना ठिकठिकाणच्या मोठ्यामोठ्या संस्थानी दिलेल्या मानपत्रांच्या डझनभर फायली त्यांच्या जवळ होत्या.

अर्थात हे काही त्यांना सहजासहजी मिळालेलं नव्हतं. हे नोबेल पारितोषिक ज्या रामन परिणामाबद्दल (रामन इफेक्ट) मिळालं त्याच्या संशोधनासाठी सतत सात वर्षे ते झगडले. एखादा तास अभ्यास केला की आपल्याला वाटतं की आपण किती तरी अभ्यास केला, नाही का ? मग सात वर्षं गुणिले वर्षांचे तीनशे पासष्ट दिवस, गुणिले दिवसाचे कित्येक तास, त्यांनी त्यासाठी खर्च केले. आता कळलं किती चिकाटी असली पाहिजे त्यांच्या अंगात ? चार दोन तासांत जर ते कंटाळले असते, तर काय झालं असतं बरं ? काsही नाही. अर्थात कष्टाळू आणि महत्वाकांक्षी अशा आजोबांचेच वंशज होते ते. त्यांचे आजोबा-आईचे वडील न्यायशास्त्राचे शिक्षण घेण्याकरता त्रिचनापल्लीहून बंगालपर्यंत चालत गेले होते.

त्यांचे वडील चंद्रशेखर अय्यर हे वीणावादनात अगदी वाकबगार समजले जात. हा ही गुण चंद्रशेखर रामन यांनी उचलला. त्यांना वाद्य वाजवण्याची आवड होती. याच्याच जोडीला पदार्थ-विज्ञानाची आवड असल्यानं त्यांनी या वाद्यांचा अभ्यास केला. ध्वनिशास्त्राचे नियम, सतार, मृदंग, तंबोरा या वाद्यांना कसे नीट लागू पडतात ते दाखवून दिलं. मृदंग या वाद्याची कातडी ताणून त्याच्या वर पिठाचे थर देऊन वेगवेगळ्या सप्तकांतले सूर कसे निघतात, ते दाखवलं. याची प्रात्यक्षिकं त्यांनी जगभर केली. पाश्चात्य संगीतप्रेमी लोकांनीही त्यांची भाषणं ऐकून, त्यांची त्यावेळची प्रात्यक्षिकं पाहून माना डोलावल्या. भारतीय वाद्य ही प्रमाणबद्ध आहेत, शास्त्रावर आधारलेली आहेत हे मानलं.

रामन परिणाम

" ध्वनि " प्रमाणे " प्रकाशा "च्या क्षेत्रातही त्यांनी संशोधन केलं होतं. रामन् परिणाम या "प्रकाशाच्या विकीरणा"च्या शोधावरच अवलंबून आहे. त्रिकोणी लोलकांतून प्रकाशकिरण अपवर्तित होऊन इंद्रधनुष्याप्रमाणे सात रंग पडद्यावर पाडण्याचा प्रयोग तुम्ही पाहिला असेल. त्याच प्रमाणे पाणी, बर्फ, काच वगैरे विविध पदार्थांतून प्रकाशकिरण पाठवून त्यांचा रामननी अभ्यास केला. तेव्हा त्यांना असं आढळलं, की, पदार्थाच्या आत शिरणाऱ्या किरणांत नसलेले रंग त्या पदार्थातून बाहेर पडलेल्या, वेगवेगळ्या दिशांना जाणाऱ्या प्रकाशकिरणात दिसतात. यालाच विकीरण म्हणतात. या रंगाच्या नवीन किरणाला " रामन किरण " म्हणतात. याचा उपयोग पदार्थाची रचना समजायला होतो.

याच विषयावर या संशोधनाचा उपयोग करून जगांत अनेक लोकांनी आणखीही संशोधन केलं आणि याचा परिणाम काय माहिती आहे ? दहा वर्षांत या " रामन् परिणामावर " आधारित असे १७०० संशोधनपर निबंध इतर शास्त्रज्ञांनी लिहिले आहेत.

पुण्याजवळ वीरघाटात माश्याच्या आकाराचे हिरे सापडतात. हे हिरे मद्रासच्या प्रेसिडेन्सी कॉलेज मधले श्री. मधुस्वामी मद्रासला घेऊन गेले होते. या हिऱ्यांवर रामन यांनी संशोधन केलं. त्या खड्यांच्या गुणधर्मांचा सखोल अभ्यास केला. या अभ्यासामुळेच आज "नकली हिरे" बाजारात येऊ शकले. फुलांच्या आणि समुद्राच्या रंगावर, पदार्थाच्या चुंबकीय गुणधर्मावरही त्यांनी संशोधन केलं.

पण याचा अर्थ रामन फक्त प्रयोगशाळेतच अडकून राहिले होते असा नाही. त्यांना स्टीव्हनसन आणि हार्डी हे इंग्रजी लेखक आवडत. त्यांची पुस्तकं आवडल्यावर पुन्हा पुन्हा वाचायचा छंद त्यांना होता. ते नागपूरला असताना प्लेगची साथ आली होती. तेव्हा स्वतःच्या बंगल्याच्या आवारात रोग्यांची सोय करून त्यांच्या औषधासाठी त्यांनी पैसा खर्य केला होता. विज्ञान परिषदेचे काम करताना संशोधनासाठी पैसा मिळावा म्हणून त्यांनी लोकांकडून दीड लाख रुपये जमवले होते. त्यांना अनेक भाषा येत होत्या.

शास्त्राच्या वेडापायी त्यांना काही वेळा स्वतःची शुद्ध नसे. एकदा नवीन आलेली शास्त्रीय उपकरणं पहाण्यासाठी बऱ्याच अंतरावर असणाऱ्या स्टेशनवर रात्री जाऊन तिथून इनसीन हायस्कूल नावाच्या शाळेत जाऊन उपकरणे बघून ते पहाटे परत आले होते.

खरं तर संशोधनाची अवघड वाट चालायला असेच लोक लागतात. आणि म्हणूनच रामननी आपल्या हुशारीनं अनेक संस्थांत काम केलं. भारतीय विज्ञान परिषदेसारख्या संस्थांना जागतिक महत्व मिळवून दिलं. रामन संशोधन भवनासारख्या संस्थांची स्थापना केली. हिशेब खात्यासारख्या ठिकाणी नोकरी चालू ठेवूनही अभ्यास चालूच ठेवला, आणि वेळ आली तेव्हा अभ्यासासाठी मोठी नोकरी देखील सोडून दिली.

आणि म्हणूनच, या माणसाचा जन्म सात नोव्हेंबर १८८८ रोजी झाला आणि मृत्यू २१ नोव्हेंबर १९७० रोजी झाला हेच फक्त सांगण्यापेक्षा या मधल्या काळात त्यानं जे संशोधन केलं ते आठवलं, त्याचा अभ्यास केला आणि तो आदर्श ठेवला तरच तो त्यांचा खरा सन्मान होईल !

केसरी, रविवार १९ नोव्हेंबर १९७२


मुख्यपान Homepage

संपर्क

आमच्याशी संपर्क साधाः
Contact us here:
myemail

लेखकः मानसी मोकाशी