हे आहेत उसाचे रसाचे दिवस

नेमेचि येतो असा हा उन्हाळा. आंब्याचे मोहोर फुलवत, फणसाचे गरे पिकवत आणि उसाच्या गार रसाचे पेले भरत. तसा उन्हाळा फारसा कुणाला आवडत नाही. पण तो जी मेजवानी सुट्यांच्या दिवसात आणतो, त्याची मात्र प्रत्येक जण वाट पहातो.

आंबे फणस यायला वेळ असला तरी उसाची महिरप लावून गुऱ्हाळे केव्हाच सजतात. रस पिणे आणि पाजणे हे आपले कामच आहे, असे जणु प्रत्येकाला वाटते. " यंदा जरी भाव वाढवला असला, तरी गिऱ्हाइके कमी झाली नाहीत. थिएटर समोर असल्यानं सिनेमाला येणारी तेवढीच नवी गिऱ्हाइकं, बाकी आपली जुनी कायम आहेत. " विजय थिएटरसमोरच्या माणिकराव निगड्यांनी सांगितले. बाकी रसपान हा पुणेकरांचा खास षौक ! इतकी गुऱ्हाळे आणि इतके रस पिणारे इतर गावी दिसणे कठीणच.

रसाच्या गुऱ्हाळाचा हा धंदा साधारणतः चार महिन्यांचा. उन्हाने लाही झाली की लोक गुऱ्हाळाकडे वळतात. पण पावसाच्या चार सरी आल्या की लोकांची गुऱ्हाळातली संख्या रोडावते. शिवाय पुष्कळशी गुऱ्हाळं तात्पुरत्या आडोशानं उभी असतात. त्यांना पावसाला तोंड द्यायला जमत नाही.

" पाऊस आला की कॉर्पोरेशनचे लोक येऊन ही गुऱ्हाळं बंदच करतात." वरच्या कापडी छताकडे बोट दाखवत एकाने सांगितले. आता निगड्यांसारखे काही लोक दहा महिनेही गुऱ्हाळे चालू ठेवतात. त्यांचा हाच एक धंदा आहे. आई-वडिलांचा पन्नास वर्षांपासूनचा.

पुण्याच्या गुऱ्हाळातला ऊस मंडईत दलालांकडून घेतला जातो आणि हातगाड्यांवरून गुऱ्हाळात येतो. इथल्या गुऱ्हाळात पुण्याच्या जवळपासच्या विठ्ठलवाडी, नांदेड, मांजरी या भागातून ऊस आणतात. त्यांना वाहतूक खर्च कमी पडतो. जगन्नाथ कृष्णाजी पिंगळ्यांसारखे काही लोक स्वतःच्या शेतातूनही लागणारा ऊस आणतात. "ऊस घरचा असल्याने बाजारी उसापेक्षा माझ्या गुऱ्हाळात येणारा ऊस जास्त चांगला आहे." असा दावा ते करतात.

दहा बारा उसांची एक पेंडी असते. दर आठ-दहा दिवसांनी ही खरेदी होते. आलेला ऊस साधारण पंधरा दिवस टिकतो. " ४९ नंबरचा मऊ ऊस आम्ही वापरतो." पिंगळे म्हणाले. "यंदा साखरेला भाव असल्याने साखर कारखान्याकडे धाव घेण्याची शेतकऱ्यांची प्रवृत्ती आहे. म्हणून बाहेरच्या व्यापाराला ऊस कमी आहे."

सर्वसाधारणतः घरचे लोकच हा धंदा संभाळतात. नोकर ठेवून परवडत नाही. असे त्यांचे म्हणणे. कारण नोकर ठेवला तर सीझन संपल्यावर त्याचे काय करायचे. अर्थात स्वतःची शेती असलेले काही लोक सीझनपुरते शहरात येतात. नाहीतर मालकाचं शेत असलं तर तिथे काम करतात. असे मालक आणि नोकरही या धंद्यात आहेत.

हल्लीचे गुऱ्हाळ म्हणजे यंत्रावर काढलेल्या रसाचे. तसे हाताने यंत्र चालवणारे लोकही आहेत, पण थोडे. बैलाच्या चरकावर रस काढणारी गुऱ्हाळे जवळजवळ नामशेषच झाली आहेत.

"लाकडी चरकांवरचा रस लालसर येतो. लोखंडी चरकावरचा पांढरा शुभ्र येतो. गिऱ्हाइकाला पांढराच चांगला वाटतो. जुनी गिऱ्हाइके विचारतात बैलाचा चरक का बंद केला, पण असे थोडे. " एकाचं म्हणणं असं की बैलाच्या चरकानं जागा अडतेच, शिवाय बैलाला खायला घालायला रोज दहा-दहा रुपये खर्च येतो. तर यंत्र दोन तीन रुपयांत काम करते. शिवाय स्वच्छ.

महाराष्ट्रात बराच ऊस पिकतो. दक्षिण आशिया उसाचे माहेरघरच समजले जाते. पण हा ऊस मूळ न्यू गिनीतून इकडे आला. इतिहासपूर्व काळात ही घटना घडली. आता तो येथलाच झाला आहे. ख्रिस्त पूर्व चौथ्या शतकात उसाबद्दल पहिला उल्लेख आढळतो आणि तो देखील भारतातच.

लेव्ह्युलोज, डेक्सट्रोज यात शर्करा ८ ते १६ टक्के या प्रमाणात सापडतात. पोटॅश हे खनिज, नैट्रोजनची संयुगे, चरबी हे पदार्थ उसात सापडतात. त्यामुळे आहारदृष्ट्या रसाला चांगले महत्व आहे. वैद्यांच्या मते, उस चावून खाल्लेला जास्त चांगला. त्याखालोखाल लाकडी चरकातला चांगला. लोखंडी यंत्रातून काढलेल्या रसाचा शेवटचा नंबर. तो लौकर आंबण्याची तसेच उष्ण पडण्याची शक्यता असते. रसामुळे लघवी जास्त होते. त्यामुळे काविळीत देतात. बर्फ आपल्याला जिभेला चांगला वाटत असला तरी आरोग्यदृष्ट्या चांगला नाही. कारण बर्फामधे सुप्तावस्थेत असलेले जंतु, बर्फ वितळल्यावर रोगप्रसाराला मोकळे होतात.

"चहा पेक्षा रस बरा." अशा पाट्या हल्ली कमी दिसतात. रसाचे महत्व लोकांना पटले असावे म्हणूनही असेल. कोकाकोला कंपनीनं आमरसाचे पेय केले तसे जर आपल्या कारखानदारांनी रसाचे महत्व विचारात घेतले तर त्याला जागतिक बाजारपेठ मिळू शकेल.


मुख्यपान Homepage

संपर्क

आमच्याशी संपर्क साधाः
Contact us here:
myemail

लेखकः मानसी मोकाशी