साहस

अवीनं पुस्तक खाली ठेवलं. नजर आभाळात लावली. मोठ्ठा आळस दिला. मंजूनं भुवया उंच केल्या. " आज कुठल्या पुस्तकावर संक्रांत ? "

अवीचं लक्ष होतं कुठे ? " स्वराज्य...स्वराज्य.. ढिशॉं .. ढिशॉं " तो पुटपुटत होता.

" स्वराज्य स्वराज्य म्हणे ! " अवीच्या तोंडापुढे हात ओवाळत मंजू म्हणाली, " रावसाहेब, आपण स्वराज्यातच आहात. शिवाजी महाराजांच्या काळात नाही. नाहीतर ही काठी खुपसाल आमच्या पोटात वाघनखं म्हणून ! "

" तुम्ही काहीही म्हणा ताईसाहेब, या ऐतिहासिक कादंबऱ्या म्हणजे...व्वा ! " अवीनं मिटकी मारली. " इतक्या मस्त आहेत, की पोट भरतं त्यांनी ? हो नं ? " आईनं आत येत म्हटलं, " का आहे भूक बटाटेवड्यांची ? "

बटाटेवडे म्हटल्यावर अवीनं टुणकन् उडी मारली. एकेक बटाटेवडा पोटात जात होता. पण डोक्यात शब्द होते " आलमपन्हा, महाराज, दगा दगा, बुरूज, अंधारी रात्र, किल्ल्याचा चोर दरवाजा. "

म्हणूनच बुलंदगडावर जायचं म्हटल्यावर अवीनं मारलेली उडी खूपच मोठी होती. बटाटेवडे खायचे म्हटल्यावर तो मारायचा त्याहूनही मोठी.

वाटेत भेंड्या खेळत, कोडी घालत, थट्टा मस्करी करत मंडळी बुलंदगडावर पोहोचली. वर जायला शक्ती होती कोणात ? गडावर स्वारी करण्यापूर्वी आधी पोटपूजा करायला हवी होती. सगळेजण कोंडाळं करून बसल्यावर गप्पांना ऊत आला. हा हा म्हणता डवे रिकामे झाले.

" अरे, या गडावर चोरवाट, चोर दरवाजा असेल का रे ? " अवीनं उत्सुकतेनं गडावरून नजर फिरवली. अवीनं परवाच वाचलेल्या कथेचा नायक रात्री बाराचे ठोके पडले की चोर वाटेनं शत्रूच्या किल्ल्यात प्रवेश करायचा नाही का ? "

" ए हे रे ! चोर दरवाजा काय असा एका नजरेत दिसतो का ? " प्रकाशनं टोमणा मारला. " पन्हाळ्याला विहिरीतून चोरवाट जाते माहिती आहे ? "

" जशी काही तुझी नेहमीच या चोरवाटेनं ये जा असते. " प्रदीपनं मल्लीनाथी केली. सगळे हसले.

अवीच्या डोक्यात मात्र अनेक प्रश्न पिंगा घालत होते. " शिवाजी महाराज कधी या गडावर आले असतील का ? या गडाच्या किल्लेदारानं कुणाकुणाशी झुंज दिली असेल ? या चढावरून घोडा नेताना किती त्रास झाला असेल ! " एक ना दोन !

प्रकाश आणि त्याचा कंपू पुढे होता. बाजूच्या झुडूपाच्या फांद्यांची पानं ओरबाडून काढून त्यांनी आधारासाठी काठ्या बनवल्या होत्या. त्या जमिनीवरच्या मातीत रेघोट्या काढायला उपयोगी पडत होत्या, तशाच एकमेकांच्या मानेला गुदगुल्या करायलाही.

आता चढण मोठी होती. उजवीकडे एक रस्ता जात होता. दुसरा जात होता डावीकडे. सर भराभरा पुढे कधी गेले ते कुणालाच कळलं नव्हतं. त्या चढणीपलीकडून सरांची हाक ऐकू आली. " लवकर चला रे मुलांनो ! "

मुलांनी गिल्ला केला आणि एकमेकांना लवकर चालण्याबद्दल बजावत ती निघाली.

सगळे चढण उतरले. डोंगराच्या कडेकडेनं चढउताराकडे निघाले. प्रकाश एकदम ओरडला " हॉल्ट ! समोर बघा. "

समोर एक गुहा दिसत होती. पलीकडच्या कडा तुटलेला होता. वरून टाकलेला दगड सरळ रेषेत खाली दरीत गेला असता.

एक साथ पीछे मुड करून मंडळी परत फिरली. पुन्हा चढण चढून दुसरा रस्ता सर्वांना पकडावा लागला.

पण त्या गुहेत काय असेल ? एखादं जंगली जनावर, का एखादी चोरवाट ? कदाचित काहीच नसेल. नुसतीच कोळ्याची जाळी आणि वटवाघळंही असतील. अवीच्या डोक्यात विचारांचं मोहोळ उठलं होतं.

गडावर इकडे तिकडे फिरून जुने तट, बुरूज बघून झाले होते. शिवाशिवी, सूरपारंब्या खेळून झाल्या होत्या. रात्री जेवणाच्या वेळी अंगतपंगत झाली होती. एका भल्यामोठ्या वाड्याच्या परसात सर्वांनी पथाऱ्या पसरल्या होत्या. दमणूक खूप झाली होती. पण मित्र बरोबर असताना गप्पा मारायच्या सोडून झोपणार कोण ?

" काय अवी, सापडली का एखादी चोरवाट, चोरदरवाजा ? " मन्यानं विचारलं.

" ए मन्या, थट्टा सोड, पण एक सांग - आपण येताना एक गुहा पाहिली होती. - काय असेल रे त्या गुहेत ? " अवीनं म्हटलं. हातातल्या काठीनं त्यानं जमिनीवर एक डोंगर, एक गुहा काढली होती.

" अरे काय असणार दुसरं ? चोर दरवाजा - " त्या गुहेला एक भगदाड दाखवत, पुढे जाणारी वाट काठीनं काढत मन्यानं कुत्सितपणे म्हटलं " ही चोरवाट - खाली जाणारं भुयार. अरे तिथे काय असेल त्याची चर्चाच करा लेको तुम्ही ! आहे का हिम्मत तिथे जाऊन पाहायची ? भित्रट कुठले ! "

त्या वाक्यावर चिडून अवी-प्रकाशनं ठरवलं, त्या गुहेत काय आहे, ते प्रत्यक्ष जाऊन पहायचं. एक सर गप्पांत रंगले होते. दुसऱ्यांनी मुलांच्या एका कंपूबरोबर पत्त्यांचा डाव टाकला होता.

अवी आणि प्रकाश हळूच बाहेर पडले. प्रकाशनं खिशातून काढलेल्या टॉर्चच्या प्रकाशात त्यांना गुहेपर्यंतची वाट काढता आली. मधून मधून चांदणंही मदतीला येत होतं. अर्थात तरीही दोघे त्या अनोळख्या वाटेवर एकएकदा ठेचकाळलेच.

दिवसभर गप्पा संपत नव्हत्या. पण गुहेकडे जाताना त्यांच्या पावलांचाच काय तो आवाज येत होता. एकमेकांचे हात धरून बाजूच्या झुडुपांच्या पुढे आलेल्या फांद्यातून वाट काढत पाऊलवाटेवरून अवी आणि प्रकाश गुहेशी पोचले. रातकिड्यांची किरकिर आता चांगलीच जाणवत होती. न सांगता दोघेही थबकले.

" आत जायचं ? " " जायलाच हवं. आपण पैज मारून आलोय्. " " पण आत काय असेल ? " दोघानी एकमेकांचे हात दाबून धीर दिला. अवीनं टॉर्च गुहेकडे फिरवला. गुहेचं तोंड लहान होतं. इतकं की आत जायचं तर एकेकाला सरपटत आत जावं लागलं असतं. तोंडाशी असलेल्या भल्या मोठ्या शिळेवरून वाटत होतं, कदाचित पूर्वी गुहेचं तोंड मोठं असावं, पण ती शिळा तोंडाशी पडून ते लहान झालं असावं.

अवी पुढे सरकला. हातभर सरपटत आत जाऊन त्यानं पुन्हा टॉर्च फिरवला. त्याच्या हाताला, तोंडाला, कोळ्याचं जाळं चिकटलं. वैतागून त्यानं ते दुसऱ्या हातानं बाजूला केलं. पण कोळ्याचं जाळंच ते ! ते कुठलं निघायला ? त्याचा मऊ गोळा होऊन हाताला चिकटून राहिला. अवी वैतागला. चॅ ss करून त्यानं पुढे जायला सुरुवात केली. पाठोपाठ प्रकाशही निघाला.

काय झालं हे कळायच्या आत त्यांच्या पाठीला चिकटून काहीतरी फडफडत बाहेर गेलं. प्रकाशनं मागे वळून सांगितलं " वटवाघळं ? " दोघांनीही हुश्श केलं.

बोळकंडी संपत आल्याचं अवीच्या लक्षात आलं. समोरच्या आडव्या भिंतीमुळे पुढे काय असावं ते टॉर्चच्या प्रकाशातही कळत नव्हतं. अवीनं आत प्रवेश केला. कोंदटपणा जाणवत होता. पायाखाली खडबडीत जमीन होती. मधे अवीनं वाचलेल्या "वादळवारा" कादंबरीत नायक शूर सेनापती असाच भुयारातून जाताना छत कोसळून मातीच्या ढिगाऱ्याखाली सापडतो ते अवीला आठवत होतं. टॉर्च वर फिरवल्यावर ते छतही जागोजागी ढासळल्याचं जाणवत होतंच. शिवाय पाय मातीत भसाभस जात होते.

अवी उभा होता त्या खाली पोकळी होती का काय ? कारण त्याच्या पावलानिशी खालच्या बाजूनं माती पडल्याचा आवाज येत होता. आत येणाऱ्या प्रकाशला अवीनं थांबवलं. पण काय घडतंय हे कळायच्या आत वरून एक दगड खाली आला तो बरोबर हातातल्या बॅटरीवरच. बॅटरी पडली, फुटली. काचेचा खळ्कन् आवाज आला आणि उरला फक्त अंधार.

आपण एखादी चोरवाट शोधायची, आपल्या साहसावर कोणी कादंबरी लिहायचं... अवी असा कल्पनेच्या साम्राज्यात वावरत असतानाच तो पुढे गेला होता. वाऱ्याची झुळूक जाणवली होती. बॅटरी तर बंद होतीच. चांदण्याची तिरीपही बोळकांडीच्या टोकाला जाणवतेय असा भास झाला.

" काय झालं रे ! " " काही नाही विशेष, बॅटरी फुटली. " असं सांगताना अवीनं आवाज शांत ठेवायचा केलेला प्रयत्न तितकासा सफल झालाल नाही. " अवी ! बाहेर ये गेलास तसा. " प्रकाशनं ओरडून सांगितलं.

पण अनोळखी पडक्या जागेत आणि तेही अंधारात परत येणं सोपं नव्हतं. उजेडात तो एक दोन वळणं पार करून गेला होता. त्याला जाणवलेली चांदण्याची तिरीप वाट दाखवायला अजिबात पुरेशी नव्हती.

मागे चाचपडत तो मागे फिरला. त्याला जाणवलं, आपल्या पायाखालची जमीन खचत अाहे. अवीच्या तोंडून किंकाळी बाहेर पडली. " आई गं ss "

प्रकाशचा धीर सुटला. चांदण्याच्या उजेडात तो धावत सुटला. निम्म्या वाटेवर त्याला दोन-तीन प्रकाशझोत आणि माणसांचे आवाज जाणवले. धावत जाऊन त्यानं येणाऱ्या सरांना आणि मुलांना गाठलं.

" आपला अवी " प्रकाशला पुढे बोलवेना. पाटील सरांनी त्याला शांत केलं. अवी गुहेत कसा गेला इथपासून आत कसा अडकला इथपर्यंत समजावून घेतलं. दोन सर आणि दहावीतली दोन मुलं टॉर्च सरसावून, एकमेकांचे हात धरून आत शिरली. सरांनी गुहेबाहेरचा वेल कापून आपल्या कमरेला बांधून घेतला.

अवीच्या आवाजाच्या दिशेनं ते निघाले.

जमीन खचून खाली अर्धवट गाडल्या गेलेल्या अवीला सरांनी हाक मारल्यावर त्याला प्रथम वाटलं आपण स्वप्नातच आहोत. सगळ्यांनी त्याच्या आजूबाजूची माती, दगड बाजूला काढले आणि बाहेर ओढून काढलं. त्याचं अंग ठेचकाळलं होतं. गुडघे फुटले होते.

सरांनी कमरेला बांधलेल्या वेलीचं दुसरं टोक खाली सोडलं. ते धरून अवी तानाजीच्या घोरपडीच्या चिकाटीनं वर आला.

घरी आल्यावर त्यानं मंजूला आपल्या साहसाची कथा रंगवून सांगितली. फक्त गुहेत जायला भरीस घालणाऱ्या अवीची सरांनी खरडपट्टी कशी काढली आणि असं आंधळं साहस न करण्याचं सरांनी कान धरून कसं बजावलं, ते अर्थातच त्यानं सागितलं नाही. यापुढे फक्त डोळस साहस करायचं असंच त्यानं ठरवलं होतं ना !


मुख्यपान Homepage

संपर्क

आमच्याशी संपर्क साधाः
Contact us here:
myemail

लेखकः मानसी मोकाशी