भरपूर कामाइतकीच योग्य विश्रांती

"इच्छा असली तर मार्ग दिसतो." या म्हणीची सत्यता पटवायची असेल तर अडचणीतून मार्ग काढणाऱ्या डॉ. भाऊसाहेब सरदेसाईंसारख्या माणसाकडे बोट दाखवावं लागतं. तिथे ती म्हण साकारच झालेली दिसते.

आई कडून प्रेरणा

रत्नागिरी जिल्ह्यात ता १७ मार्च १८८३ ला गरिबीत आणि दहा बारा भावंडांच्या घरात जन्मलेला हा मुलगा. आज त्यांनी "तळेगाव जनरल हॉस्पिटल" उभारून मोठं केलं आहे. मुंबईला परळला त्यांनी सुरू केलेलं दोनच खोल्यांचं हॉस्पिटल मोठं होऊन त्यांची मुलगी आणि पुतण्या दोघं संभाळतात. शिवाय कच्छमधेही त्यांनी ग्रामीण भागात दवाखाना काढला आहे.

डॉक्टरांचे सर्वात मोठे भाऊ रियासतकार सरदेसाई बडोद्याच्या फत्तेसिंगराव गायकवाडांना शिकवत. या ओळखीतूनच भाऊसाहेब बडोद्याला फत्तेसिंगरावांचे मित्र (ज्याला कंपॅनियन म्हणतात तसे) म्हणून गेले. तिथे त्यांचं मॅट्रिकपर्यंतचं शिक्षण झालं. पुढे त्यांनी मुंबईच्या ग्रँट मेडिकल कॉलेजमधे डॉक्टरकीची (एल्.एम्. अँड एस्.) पदवी घेतली, आणि १९०८ साली ते इंग्लंडला गेले. त्याचा खर्चही बडोदेकरांनी केला. चांगला माणूस घडवायला असा कोणीतरी दाता देवासारखा उभा राहातो.

इंग्लंडमधे उल्वरहँप्टनला तीन वर्षं राहून एल्.आर्.सी.पी.एस्. (लायसेन्सिएट ऑफ रॉयल कॉलेज ऑफ फिजिशियन्स अँड सर्जन्स) ही नेत्रवैद्यकातली पदवी मिळवून ते परत आले. आल्यावर परळला त्यांनी मोफत नेत्र रुग्णालय काढलं.

एका श्रीमंत माणसाचं मोतिबिंदूचं ऑपरेशन त्यांनी केलं. त्याचे पन्नास-साठ रुपये त्यांनी मिळवले. त्या काळी ते जास्त वाटले. त्यांनी आईला हे सांगितल्यावर ती म्हणाली, "अरे बाबा तो माणूस श्रीमंत होता म्हणून ठीक. तो देऊ शकला इतके पैसे. गरिबानं काय करायचं ?" यातूनच भाऊसाहेबांनी प्रेरणा घेतली. खेड्यातल्या माणसालाही जाणं शक्य होईल आणि शहरातल्या माणसाला लांब पडणार नाही असं तळेगाव त्यांनी आपलं कार्यक्षेत्र म्हणून निवडलं.

स्टेशनजवळ पवारांच्या बंगल्यात हे रुग्णालय सुरू झालं. डोळ्यांच्या उपचारांवर इथे भर होता. त्यानंतर आज "जनरल हॉस्पिटलची " इमारत जिथे आहे तिथे ते आले. सत्तावीस एकरांची पडीक जमीन ९९ वर्षांच्या करारानं सरदार दाभाड्यांनी त्यांना दिली. भाडं होतं वर्षाचं अवघं तीनशे रुपये ! १९३३ साली सुरू झालेलं हे रुग्णालय म्हणजे तिथल्या जनतेला वरदहस्तच वाटला. त्यानंतर मॅटर्निटी हॉस्पिटल व क्षयरुग्णविभाग चालू झाला. क्षयरोगावरील उपचारांसाठीही ते प्रसिद्ध झालं. पण सामान्य माणसाच्या दृष्टीनं ते "डॉक्टर सरदेसायांचं" नाहीतर "डोळ्याचं हॉस्पिटलच राहिलं." गावोगावाहून त्या शेडमधे शेकडो माणसं रांगा लावून डॉक्टर कधी येतात त्याची वाट पहात. एकानं आठवण सांगितली.

परदेशात माणूस जाऊन आला की तो आपल्या देशाला आंचवतो, असा अनेकांच्या बाबतीत अनुभव येतो. भाऊसाहेब आपल्या लोकांना विसरले नाहीत. त्यात एवढा पसारा उभारायचा म्हणजे पैसा हवा. पण "काम करायला लागलं की पैसा मिळतो." हे त्यांचं ब्रीदवाक्य. अर्थात तसा पैसा त्यांना मिळत गेलाही. "मुंबईच्या एका शेटजीला त्यांनी दवाखाना दाखवला." शेटजी जायला निघाले तेव्हा डॉक्टर एवढंच म्हणाले "तुमच्या माहितीचे लोक पाठवा इकडे." "पण एवढे लोक ठेवणार कुठे ?" त्यानं प्रश्न केला. आणि पन्नास हजार रुपये पाठवून दिले. "मी जर पैसे मागितले असते तर त्यानं काहीच दिलं नसतं." असं डॉक्टर सांगत. त्यांच्या एका सहकाऱ्यानं आठवण सांगितली.

भाऊसाहेबांच्या पत्नी म्हणजे बाळासाहेब खेरांची चुलत बहीण. "त्यांनी मदत केली म्हणून भाऊसाहेबांच्या हातून एवढं झालं." त्यांचा मुलगा सांगत होता. त्या आता अंथरुणाला खिळून आहेत. "माझं गाडी घ्यायचं चाललं होतं तेव्हा सौ. सरदेसाईंनी चौकशी केली." मी गाडी घेतली असं सांगितल्यावर त्या म्हणाल्या "यांनी गाड्या घेतल्या त्या दवाखान्याला देणग्या जमवण्यासाठी. कधी मजेत हिंडलेत, पोराबाळांना हिंडवलय, असं नाही." भाऊसाहेबांचे सहकारी डॉ. साठे यांनी सांगितलं. एखाद्या गृहिणीला असं वाटलं नाही तरच नवल नाही का ?

शिस्तबद्ध जीवनक्रम

सरदेसाई कुटुंब तसं दीर्घायुषी. रियासतकार सरदेसाई ९४ वर्षं जगले. त्यांचे बिलिमोरियाचे आणि दुसरे भाऊही ८७-८८ वर्षं जगले. "दुसऱ्या करता जगणं हे पहिलं आणि शेवटचं कर्तव्य आहे. असा त्यांचा कायदा." त्यांच्या मुलानं सांगितलं. अखंड श्रम हे त्यांच्या जीवनाचं सार तर खरंच. पण त्याबरोबरच योग्य विश्रांती हवी हाही त्यांचा कटाक्ष. "त्यांना रात्री झोपायला रात्री साडेनऊचे दहा झालेले मला आठवत नाहीत. अजूनही कमी ऐकू येण्यापलीकडे काही तक्रार नसते. झोप व्यवस्थित असते. हिंडणं फिरणं कमी आहे. पण ते चालू आहे. कामशेतहून मधून मधून तळेगावला येऊन दवाखान्यात फेरफटका घेतात." त्यांचा मुलगा म्हणाला.

दोन वर्षांमागेपर्यंत ते सुपरिंटेंडंट म्हणून तळेगावचं काम पहात. वक्तशीरपणा रक्तात भिनलेला. सोलापूर, तळेगाव, घटप्रभा आणि परळचा दवाखाना संभाळावा लागे. स्वातंत्र्य जाऊ नये आणि चांगली सवय असावी म्हणून गार पाण्यानं अंघोळ करीत. तीनचार वर्षांपूर्वी जळगावला ते पडले. त्यामुळे तितकं काम करता येत नाही.

त्यांचे सुरुवातीचे सहकारी डॉ. जालनापूरकर यांचाही हॉस्पिटलच्या उभारणीत मोठा वाटा आहे. आज डॉ. जालनापूरकर हयात नाहीत. पण जालनापूरकरांच्या ६० व्या वाढदिवसाचा समारंभ झाला त्यावेळी डॉ. सरदेसाई मुद्दाम उपस्थित राहिले होते. सरदेसाईंना हार घालताना दोघांचे भारावलेले चेहरे यामुळे वातावरणही भारावून जात होतं.

आता भाऊसाहेब हॉस्पिटलचं काम पहात नाहीत. आपण केलेलं काम इतर माणसांनी चालू ठेवावं अशी त्यांची इच्छा आहे. चार खाटांनी सुरू झालेलं हॉस्पिटल तिनशेच्या वर रोग्यांवर उपचार करत आहे. दर आठवड्याला ऑनररी डॉक्टर येऊन बारा तास तिथे थांबतात. त्यांच्या मदतीला पावणेदोनशे माणसं खपत असतात. रोग्यांना दृष्टिदान करणं आणि क्षयरोगातून मुक्त करणं म्हणजे खरं जीवन देणं असं ते मानतात.

या ऋषितुल्य माणसाला या कार्याची वाढ झालेली पहायला मिळण्यासाठी आणखी खूप वर्षं आयुष्य लाभावं हीच इच्छा !

सकाळ, गुरुवार ता. ७ जून, सन १९७३.


मुख्यपान Homepage

संपर्क

आमच्याशी संपर्क साधाः
Contact us here:
myemail

लेखकः मानसी मोकाशी