शक्कल

"या आईबाबांची चांगलीच जिरवली पाहिजे." मंजू आणि विजय एकमेकांना कुजबुजून सांगत होते.

आईबाबा बाहेर गेले होते. त्या नंतर दोघांनी दारही घट्ट बंद करून घेतलं होतं. पण पलीकडच्या खोलीत आजी होती. तसं तिला कमी ऐकू यायचं, पण न जाणो... आजी तशी प्रेमळ होती. गावाहून येताना नातवंडांसाठी काही ना काही घेऊन यायची.

"पण आई किंवा बाबा रागवल्यावर इतरांच्या आज्यांसारखी ही आपली कड घेईल ? नाव नको !" त्यांच्या मनात विचार आला. " आणि ती ताई ! आपल्याला बोलणी बसली की हिला मजा वाटते. समजा आपण हिची स्कूटर चालवली, तर एवढं आभाळ कोसळतं का ? तो आपल्या वर्गातला आनंदा गेले सहा महिने त्याच्या भावाची स्कूटर चालवतोय्."

त्या आनंदाच्या दादाच्या मोपेडवरच खरं तर विजय ती चालवायला शिकला होता. "सायकल सारखं पेडल मारावं लागत नाही इतकंच ! बाकीचं सायकलसारखंच. " असं आनंदानं विजयला मोपेड चालवण्याचं तंत्र समजावून देताना सांगितलं होतं.

सुरुवातीला विजय आपटला होता. हातानं वेगावर नियंत्रण ठेवायचं तंत्र नवीन होतं. तो संध्याकाळी घरी परतला, ते एॅक्सिलेटर, क्लच, डीक्लच वगैरे शब्द तोंडात घोळवतच. पाठोपाठ मंजू-विजयच्या ताईसाठीही मोपेड घरात आली तेव्हा दोघांना आभाळ ठेंगणं झालं.

ताईनं बाहेर लावून ठेवलेली गाडी विजयनं सुरू केली आणि मंजूही टुणकन् पाठीमागे येऊन बसली. ताई बाहेर येऊन पाहाते तो बाहेर गाडी नाही.

विजय-मंजू परत येऊन आपल्या पराक्रमाचं वर्णन करणार तो बाबांनी आवाज चढवून सांगितलं, "तू अजून अठरा वर्षांचा व्हायला चार पाच वर्षं आहेत. तोपर्यंत गाडीला हात लावायचा नाही. आणि भरीला मंजूला कशाला डबलसीट घेतलंस ?"

"अपघात झाला असता म्हणजे ?" "पोलिसांनी पकडलं असतं म्हणजे ?" आईनं आणि ताईनं आपापल्या पुस्त्या जोडल्या.

नंतरच्या चार आठ दिवस या दुकलीनं मोपेडला हात लावला नाही, म्हणून सगळ्यांनी त्यांना शाबासकी दिली. घरचे सगळे ही घटना विसरून गेले. विजय आणि मंजूही हे सगळं विसरले असते. पण समोर हाताच्या अंतरावर डौलात उभी असलेली ताईची मोपेड दिसत होती. पण तिच्यावर मुक्तपणे स्वार होता येत नव्हतं !

शनिवारी सकाळची शाळा होती. विजय आणि मंजू नेहमीसारखे बरोबरच बाहेर पडले.

पण जेवायची वेळ टळून गेली, तरी दोघांचा घरी पत्ता नव्हता. तेव्हा सर्वांचा जीव उडाला.

शाळेत चौकशी केली तेव्हा कळलं, ती दोघं शाळेत गेलीच नव्हती.

विजय मंजूच्या वडिलांनी पोलिसांकडे खबर दिली. ती संध्याकाळ आई-बाबा आणि हो, ताईला सुद्धा जाता जात नव्हती.

विजय-मंजू शनिवारी निघाले ते तयारीनंच. नंदाकडे मुंबईला ते पोहोचले तेव्हा जेवायची वेळ झाली होती. "आई-बाबा चार दिवस गावाला गेले आहेत म्हणून आम्ही दोघं मुंबईला येत आहोत." असं पत्र त्यांनी आधीच पाठवल्यानं नंदाची आई दोघांची वाटच पहात होती.

विजय-मंजू-नंदा असं त्रिकूटच होतं. परवापर्यंत त्यांचं खेळणं आणि अभ्यासच काय जेवणंही बऱ्याचदा बरोबर असत. पण नंदाची बदली होऊन त्यांचं त्रिकूट फुटलं होतं. अनेक दिवसांनंतर ती भेटत होती. गप्पांना ऊत आला होता.

जेवण उरकल्यावर नंदाची आई महिला मंडळात गेली. मग विजयनं आपलं गुपीत सांगितलं.

नंदालाही या "थ्रिल" मधे सहभागी होता आलं म्हणून आनंद झाला. ती संध्याकाळ खेळण्यात आणि जेवणं, गप्पा यांच्या गडबडीत केव्हा गेली, ते कुणालाच कळलं नाही.

"ए विजय, आता बघ हं, आता तुझ्या वडिलांची वर्तमानपत्रात जाहिरात येणार - विजय व मंजिरी, आम्ही तुमच्यावर रागावणार नाही तुम्ही परत या. "

"नाही तर असंही असेल, जाहिरात असेल- तुमची आई सारखी रडत आहे, आम्हाला दोन दिवसांत जेवण गेले नाही. तरी ज्यांना ही दोन मुले सापडतील, त्यांनी आणून पोचवावीत." नंदा कल्पना लढवत होता.

"बापरे, मग आपलं गुपीत तुझ्या घरी कळलं तर ? " विजयला चिंता पडली.

"छे रे! जाहिरात पुण्याच्या वर्तमानपत्रात देणार तुझे बाबा. आमच्याकडे तर मुंबईचं वर्तमानपत्र येतं. " नंदानं विजयच्या शंकेचं निरसन केलं.

उत्सुकता होतीच. त्रिकूट वाचनालयात गेलं. तिथे त्यांनी पुण्याची वर्तमानपत्रं पालथी घातली. असं आणखी तीन दिवस चाललं. मग विजयला राहवेना. शिवाय नंदाकडे किती दिवस राहणार ?

त्यानं नंदाच्या नोकराकरवी एक जाहिरात दिली. "विजय व मंजू आमच्याकडे आहेत - जगूदादा. "

दुसऱ्या दिवशी त्याच जागी त्या त्रिकुटानं जे शब्द वाचले, ते बघून ते चमकले. "जगूदादा, आभार. कटकट मिटली. मुलांना परत पाठवू नको. " खाली सही कुणाचीच नव्हती.

आता मात्र पंचाईत झाली. नंदाच्या घरी जास्त राहिलं, तर त्याच्या घरच्यांना ते विचित्र वाटणार ! परत घरी जायची तर सोय नाही. !

"तुमच्या पत्राप्रमाणे चार दिवसांनंतर तुमचं परत जायचं रिझर्वेशन केलंय." नंदाच्या वडिलांनी आपलेपणानं काळजी घेतली होती. त्यांनी विजय-मंजूला स्टेशनवर पोचवलंही. गाडी पुण्याला पोहोचली. ती दोघं उतरली आणि प्लॅटफॉर्मवरच्या बाकावर विचार करत बसली.

अर्धा तास गेला नसेल, तोवर त्यांच्या खलबतात कुणीतरी समोर उभं राहिल्यानं व्यत्यय आला. अशोक काका समोर हसत उभा होता. त्यांचे विस्फारलेले डोळे आणि वासलेला आ यांच्याकडे दुर्लक्ष करून त्यानं प्रथम विजय-मंजूला रिक्षात घातलं.

घरी आजीनं त्यांना पोटाशी धरलं. "अरे वेड्यांनो, तुम्हला स्कूटर चालवायला बंदी केली ती तुमच्या भल्यासाठी. मी सगळं ऐकलं तुमचं बोलणं. आई-बाबा बाहेर गेल्यावर दार उघडायला मी आले आणि तुमचा सगळा बेत ऐकला. पुढे आठवडाभर तुम्ही शहाण्यासारखी वागलात, मी म्हटलं विसरली पोरं . मंजू विजय हरवलेत असं अशोककाका सांगत आला, तेव्हा मी तुमचं बोलणं त्याला सांगितलं."

"वर्तमानपत्रातली जगूदादाची जाहिरात अशोकनं वाचली आणि त्यानं उत्तर दिलं. त्याच्या अंदाजाप्रमाणे तुम्ही आलात परत पुण्याला. " आजी पुढे म्हणाली "अरे पण हा अशोक कुठे गेला ? "

बाहेर जाताना अशोककाकानं हसत मंजूला विचारलं "मी चाललोय उद्या मुंबईला काही निरोप द्यायचाय का जगूदादाला ? "

पाठोपाठ घरात आलेल्या विजय-मंजूला ताईनं म्हटलं "चला एकेकाला फिरवून आणते मी डबल सीट. पण स्वतंत्रपणे स्कूटर किंवा मोपेड चालवायला ..... "

"अठरा वर्षं पूर्ण व्हायला हवीत. " विजय आणि मंजूनं ताईचं वाक्य पुरं करत म्हटलं.


मुख्यपान Homepage

संपर्क

आमच्याशी संपर्क साधाः
Contact us here:
myemail

लेखकः मानसी मोकाशी