शिस्त

बागेत हिंडून झालं, शेजारच्या घराजवळ असलेल्या सायकलवर दगडही मारून झाले. कंटाळा आला होता. त्यानं बोटानं कराकरा डोकं खाजवलं. काय करावं असा हुप्प्यापुढे प्रश्न पडला होता. हुप्प्याला खरं म्हणजे मंजूबरोबर बाहेर जायचं होतं.

पण दुपारी खोलीत येऊन उचकाउचकी केली आणि टेबलावरचे कागद फाडले म्हणून मंजू हुप्प्यावर नाराज होती. सायकल घेऊन, तिला पर्स अडकवून, मंजूला जाताना पाहून हुप्प्याला वाईट वाटलं होतं.

हुप्प्याला सायकलवर बसायची फार हौस. मंजूचा दाद कधी कधी हुप्प्याला मागच्या कॅरियरवर बसवून न्यायचा. तेव्हा हुप्प्याला स्वर्ग दोन बोटं उरायचा.

मंजूचे बाबा आत काय करताहेत ते बघावं म्हणून हुप्प्या आता आला. तो दादांशी लाडीगोडी करायचा. मंजूच्या खोड्या काढण्यात त्याला मजा वाटायची, पण मंजू व दादाच्या बाबांची मात्र त्याला भीती वाटे.

हुप्प्यानं आपल्या शेपटीचं टोक हातात धरून हळूच डोकावून पाहिलं बाबा एका खुर्चीवर बसून समोर ठेवलेल्या पेटीवर बोटं आपटत होते. त्याबरोबर टप् असा आवाज येऊन अक्षर उमटत होतं आणि कागद पुढे सरकत होता.

हुप्प्याला मजा वाटली. बाजूला ठेवलेल्या स्टोव्हच्या पेटीवर त्यानं आपली बोटं आपटून पाहिली. पण छेः ! बाबांसारखं काही हे नव्हतं.

दादा बाहेरून आला. खिडकीशी बसून बाहेर डोळे लावून बसलेल्या हुप्प्याच्या त्यानं हळूच टपलात मारली. दादाला बघून हुप्प्याची स्वारी खूष झाली. दादाच्या खिशावर खरं तर त्याचा डोळा. बाहेरून त्यानं काही आणलं आहे का ? हुप्प्यानं कराकरा डोकं खाजवलं.

पण दादानं नंतर त्याच्याकडे लक्षच दिलं नाही. कपडे बदलून कपाटात ठेवले व तो अभ्यासाला बसला. हुप्प्याला वाईट वाटलं. तो खोलीत आला. दादाच्या अवतीभवती उड्या मारून त्यानं दादाचं लक्ष वेधायचा प्रयत्न केला. पण दादाची दुसऱ्या दिवशी परीक्षा होती. हुप्प्याच्या माकडचेष्टांकडे पाहायला त्याला वेळ नव्हता.

मग हुप्प्यानं ठरवलं, खाण्याचा आपणच शोध घ्यायचा. त्यानं कपाट उघडलं. दादाचा शर्ट ओढला आणि चाचपून पहायला सुरुवात केली. या ओढाओढीत घडी घालून ठेवलेले इतरही चार दोन कपडे पडले. शेजारच्या कंपास खाली पडला आणि दाणकन् आवाज झाला.

त्या आवाजानं दचकून दादानं पाहिलं. हुप्प्याचे हे उपद्व्याप चाललेत ! " हे फार झालं ! " तो रागानं उठला. शेजारची काठी उगारून त्यानं हुप्प्याला भीती दाखवली. तरी हुप्प्याला काही वाटलेलं दिसलं नाही, तेव्हा मात्र त्यानं हुप्प्याच्या हातावर रट्टा हाणला.

हुप्प्याला हे अपेक्षित नव्हतं.

त्यानंतर त्यानं मंजूच्या आईच्या कपाटाकडे मोर्चा वळवला. ते त्यानं उघडलं आणि हँगरला लावलेल्या साड्या बाहेर फेकायला सुरुवात केली. तेव्हाही त्याला दणका मिळाला. आणि मग घरातल्या कपाटांना कुलुपं लागली.

हुप्प्याला धडा मिळाला होता.

त्या दिवशी संध्याकाळी असं झालं, सगळ्यांनाच बाहेर जायचं होतं. दाराला कुलूप लावून सगळ्यांनी बाहेर जायचं म्हणजे हुप्प्याला एकाद्या खोलीत अडकवायला हवं होतं. ते तर त्याला आवडायचं नाही. पण दुसरा काही इलाज नव्हता. दादानं हुप्प्याला चुचकारून कोठीच्या खोलीत ठेवलं, त्याची आवडती खुर्ची त्याला बसायला दिली. भुईमुगाच्या शेंगा एका वाटीत ठेवल्या आणि हुप्प्या खाण्यात गुंतलेला बघून सगळे बाहेर गेले.

सगळे बाहेर गेले आहेत हे हुप्प्याच्या लक्षात आलं. त्यातही आपण आत अडकलो आहोत हे ही जाणवलं, हुप्प्याला फार वाईट वाटलं. मग त्या वाईट वाटण्याचं रागात रुपांतर झालं. खाऊन झालेल्या शेंगांची टरफलं त्यानं खोलीभर फेकून दिली. खुर्ची उलटी करून तो जवळच्या टेबलावर जाऊन बसला. जवळ शेल्फावर धान्याचे डबे होते. जुन्या वस्तू असलेली पेटी होती. पण सगळ्यांची झाकणं घट्ट लावलेली असल्यानं त्याची काही डाळ शिजली नाही.

पण हुप्प्याचा शोध वाया गेला नव्हता. मंजूची आई देवघरातली घंटा सकाळी घेऊन आली ती तिथेच विसरली होती. ती त्यानं उचलली. टण् टण् टण् आवाजानं त्याला मोठी मजा वाटली. त्या आनंदात त्यानं पुन्हा एकदा घंटा वाजवत खोलीभर चक्कर मारली.

कोठीच्या खोलीत उघडणारं दार लावायला मंजूची आली विसरली होती. दार नुसतं लोटलेलं होतं.

हुप्प्यानं दार किलकिलं करून पाहिलं. आपल्याला या खोलीत ठेवलेलं असताना आपण दुसरीकडे गेलो, तर दादा रागावेल हे त्याला जाणवलं. पण तरी उत्सुकता त्याला स्वस्थ बसू देत नव्हती. कोणी घरात नसताना चांगलं मोकळं रान मिळालंय् , त्याचा उपयोग करायचा नाही म्हणजे काय ? शिवाय एव्हाना खोलीत त्याच्या साठी खायला ठेवलेलं संपून पोटात कावळे कोकलायला लागले होते.

हुप्प्या आत पहातो तो काय ? मावळतीचा अंधार तर पडला होताच, पण त्या शिवाय खोलीत काहीतरी हालचाल चालली होती.

बाबू व बंड्या तुरुंगातून पळून गेले होते. पोलीस त्यांचा पाठलाग करत होते. कोपऱ्यावर पोलिसांची शिट्टी वाजली म्हणून घाबरून ते दिसेल त्या घरात शिरायचं म्हणून आत शिरले होते. घराच माणसांची चाहूल लागली नव्हती, त्यांनी जवळच्या किल्ल्या चालवून कुलूप उघडलं आणि आत शिरले.

आत दोन कपाटं होती. त्यांना मोठाली कुलुपं लावलेली. आत शिरलोच आहोत तर डल्ला का न मारावा ? बाबू आणि बंड्यानं आपली कलाकुसर त्या कुलुपांवर चालू केली. संध्याकाळच्या धूसर प्रकाशात त्यांचे हे उद्योग चालले होते.

हुप्प्यानं जेव्हा दार किलकिलं करून पाहिलं, तेव्हा बाबू आणि बंड्या कपाटीची कुलुपं उघडण्यात मश्गूल होते. त्यांच्या सराइत हातांपुढे कुलुपांचा काय पाडाव लागणार ? काही क्षणातच ती निघाली.

कपाटांची दारं त्यांनी उघडली.

उचकाउचकी केली, की पाठीत काठी बसते हे त्याला आठवत होतं. पण त्या दोघा चोरांना हुप्प्याच्या डोक्यातल्या विचारांची कल्पना काय असणार ? त्यांनी भराभर कपाटातल्या वस्तू खाली टाकून त्या एका गाठोड्यात बांधायचं ठरवलं.

हुप्प्याला राग आला.

आपल्याला कपाटाला हात लावण्याबद्दल शिक्षा होते, मग या लोकांना का नको ?

कोपऱ्यातली धुणं वाळत घालण्याची काठी त्यानं उचलली आणि बाबूच्या पाठीत रपाटा घातला. या अनपेक्षित हल्ल्यानं बाबू घाबरला ओरडायची तर सोय नव्हती. लोक गोळा झाले होते. तेवढ्यात काठीचा दुसरा सटका बसला बंड्याच्या डोक्यात आणि दचकून तो बाजूला सरकला, तो आणखी एक दणका खायला. कपाटाच्या उघड्या दारावर त्याचं डोकं आपटलं.

या खटपटीत हुप्प्यानं दुसऱ्या हातातली घंटा काही सोडलेली नव्हती. हुप्प्याच्या इकडून तिकडे जाण्याबरोबर आणि काठी मारण्यासाठी हात उगारल्याबरोबर ती हलत होती, वाजत होती .. घण् घण् घण् घण्.

बाबू आणि बंड्या चांगलेच घाबरले होते. बापरे ! हे काय ? भूत ? घंटा वाजवणारं भूत ? शेपटीवालं ? का माकड ? काही एक विचार न करता, बाबूनं बंड्याचा हात धरून त्याला ओढलं आणि ते बाहेर पसार झाले.

मंजू, दादा आणि त्यांचे आई-बाबा आल्यावर बघतात तो काय ? हातावर हनुवटी टेकून हुप्प्या दाराशी बसलेला. शेजारी घंटा आणि काठी.

हुप्प्या बाहेर कसा आला असा विचार करत सगळे आता शिरले आणि उचका उचकी झालेली पाहून प्रथम हुप्प्यावर चिडले. पण जवळची उघडी कुलुपं आणि हुप्प्याजवळची काठी पाहून त्यांना जाणवलं, कपाट उघडलं, की काठी पाठीत मिळते हे हुप्प्यानं उलटवलं होतं चोरांवर ! आणि नकळत घर वाचवलं होतं !


मुख्यपान Homepage

संपर्क

आमच्याशी संपर्क साधाः
Contact us here:
myemail

लेखकः मानसी मोकाशी