गिऱ्हाइकांनुसार भाव करणारी मिनीदुकाने

दुकानेच दुकाने

अहो, मागं पुण्याला आलो होतो त्यापेक्षा ते किती वाढलंय ! रस्ते गजबजले आहेत. इमारती उठल्या आहेत ! असं बऱ्याच वर्षांनी पुण्याला आलेला माणूस तोंडात बोट घालून म्हणतो. या वाढीबरोबरच पुण्याचे रूप दुसऱ्याही अर्थाने बदलले आहे. त्याचे औद्योगीकरम होते आहे. नाना उद्योगधंदे, उपधंदे निघताहेत. लाखांचा व्यवहार करणारी राजेशाही दुकाने येथे आहेत तशी रुपयाभर दिवसाला मिळवणारे गरीब लोकही पाठीवरची "दुकाने" येथे चालवताहेत.

इतर ठिकाणी अशी दुकाने दिसतात, पण त्यांचे आगर म्हणजे लक्ष्मीरोड. सोमवारसारख्या दिवशी तर इतर मोठाली दुकाने आपली दारे बंद करून गुडीगुप बसतात आणि त्याचा फायदा घेऊन मिनी-दुकानांचे मोहोळ उठते.

वस्तूही बऱ्याच प्रकारच्या असतात. पावसाळ्यात रेनकोट, टोप्या, हिवाळ्यात स्वेटर्स, वर्षभर तयार कपडे, चपला, रुमाल, गजरे, तसबिरी, फॅन्सी सामान आणि आणखीही कितीतरी. मोठी शोकेस नसते, नानाविध मॉडेल्स नसतात, पण तरीही या वस्तू खपतात. बाजारापेक्षा दोन-चार रुपयांनी त्या स्वस्त आहेत असा या दुकानदारांचा दावा आहे. कारण त्यांना नोकरांचे पगार द्यायचे नसतात, बडेजाव राखायचा नसतो. ज्यांच्या घरापुढे किंवा दुकानांपुढे हे लोक बसतात, त्यांना काही वेळेला भाडे द्यावे लागते आणि कॉर्पोरेशनलाही कर द्यावा लागतो (काहीजण देतात). पण किंमत कमी-जास्त करण्याच्या त्यांच्या धोरणाने गिऱ्हाइक मिळते. किंमत कमी करून घेतल्याचे, विजयाचे, समाधान गिऱ्हाइकाला मिळते हे ही त्यांच्या व्यापाराचे रहस्य असेल.

"पण मोठ्या दुकानांप्रमाणे बांधलेलं गिऱ्हाइक क्वचितच असतं. जाता येता खरेदी करणारं गिऱ्हाइकच जास्त." असं एकानं सांगितलं. किंमत आणि माल पटला तर घेणार नाहीतर पुढे ! गिऱ्हाइक कमी किमतीला माल मागणार हे आम्हाला माहीतच असतं त्यामुळे गिऱ्हाइक पाहून किंमत सांगतो हे खरं पण मग दोन पैशासाठी गिऱ्हाइक तोडत नाही. त्यापैकी पुष्कळसे लोक सिंधी आहेत. सिंधी म्हणजे गुजरात्यांपाठोपाठची व्यापारी जात. त्यांना आता येथल्या, रस्त्यावरच्या, व्यापाराची मक्तेदारीच वाटते. जास्त करून सिंध्यांचीच दुकाने आहेत येथे. पण आता पुण्याबाहेरचे मराठी लोकही शिरताहेत. एकाने तक्रार केली.

दुकानदार

हा लक्ष्मीरोडवरचाच एक सिंधी तरूण. पाच सहा वर्षांपासून तयार कपडे विकतो. हजारोंनी आलेल्या निर्वासितांची जी कहाणी तीच याचीही आहे. सिंधमधे त्याचा बंगला होता, जमीन होती, वडिलांचा धान्याचा व्यापार होता. ते सगळे सोडून यावे लागले. आता पाच माणसांचे कुटुंब या रस्त्यावरच्या व्यापारावर तो पोसतो. "या डॉक्टर साहेबांची कृपा आहे म्हणून इथे दुकान लावतो. " डॉक्टरांच्या पाटीकडे वळत हात जोडत त्याने सांगितले. " त्यांच्या मालकीची जागा आहे ही. फुटपाथवर बसलं तर कॉर्पोरेशनचा संबंध म्हणून या भिंतीवर दुकान लावतो. "

व्यापाराचा माल सर्वसाधारण मुंबई आणि तिच्या कल्याण, उल्हासनगर सारख्या उपनगरांतून आणला जातो. जाण्यायेण्याचा पंधरा वीस रुपये खर्च येतो खरा, पण इथे खरेदी करण्यापेक्षा हा खर्च परवडतो. तिकडून माल आला नाही तर इकडे बायकांकडून शिवून घेतो. पण उल्हासनगरसारख्या ठिकाणी कमी शिलाई पडते. तसं इथं होत नाही. नाइलाज असेल तरच इथे घ्यायचे. असं दुसऱ्याने सांगितले. याच्या घरात एकोणीस माणसे आहेत. रास्तापेठेत तीन खोल्यात त्याचे घर आहे. पण तेवीस रुपयेच भाडे आहे हे नशीब. नाहीतर या दिवसात कसला निभाव लागतो ! मागल्या इमारतीचे भाडे किती देतो हे सांगायला मात्र मालकाच्या बंधनाने हा तयार नव्हता.

माल घेताना बघून घेतला जातोच. पण नजरचुकीने खराब लागला तर शंभरातले एक गिऱ्हाइक तक्रार घेऊन परतही येते. "मग परत घ्यायचा माल ! काय करणार ?" एक म्हणतो, "मधे असं झालं, पॅकिंग करताना सगळ्या पीसेस् ना कडेला खिळे लागले. मग स्वस्तात विकले ते. काही वेळेला नुकसान सोसावं लागतं." एक म्हणाला. हा बारा वर्षांचा मुलगा आहे. शाळा संभाळून त्याचा हा उद्योग चालतो. "मी परवाना काढला आहे." असं म्हणून तो हसला. दोन अडीच वर्षांपूर्वी त्याने व्यापारी म्हणून आयुष्याला सुरुवात केली. अभ्यासात तो चांगला आहे असं त्याचा वर्गमित्र म्हणतो. बाराशे रुपये वडिलांकडून घेऊन त्याने सुरुवात केली. त्याने गिऱ्हाइके जोडली आहेत. जरूर पडेल तेव्हा तो ब्लाउज पीसेस, पॅंट पीसेस, शर्ट पीसेस वगैरे घेऊन गिऱ्हाइकाच्या घरी जातो. रोज दोन एक तास घालवून महिन्याला शंभर सव्वाशे रुपये मिळवतो. "बायकांचं गिऱ्हाइक जास्त असतं," असं त्याचं निरीक्षण आहे.

बाकीचे व्यापारी मात्र पुष्कळदा उधारीतच माल अाणतात. कुणाच्यातरी ओळखीने क्रेडिट मिळवून त्यांनी या धंद्याला सुरुवात केली आहे. आंध्रमधलाही एकजण यात भेटला. रोज पाच सहा तास तो विक्री करतो. त्याच्या गावाहून स्त्रियांनी विणलेले रुमाल, टी कव्हर्स वगैरे वस्तू स्वतः तिकडे जाऊन तो आणतो. " मी दर शंभरावर अडीच रुपये कर भरतो." असेही तो म्हणाला. रोज आठ रुपये मिळतात यावर तो खुष दिसला. ऑक्टोबर-नोव्हेंबर मधे हा गावी सुटीवर जातो. इतरही वेळा सकाळ संध्याकाळ काम करतो. मिळणाऱ्या पैशावर खुष असणारा हा एकमेव प्राणी.

हातभर कापडावर आकडे, पिना घेऊन बसलेला एक म्हातारा डोके हलवीत, पुटपुटत म्हणाला "रुपयाभर मिळतो दिवसाला. आठ दहा रुपये भांडवल घातलं होतं बघा." "भागतं का तुमचं यात ?" या माझ्या प्रश्नावर त्याचे डोळे स्थिर झाले, "कुठलं भागतय् ? पुतण्याकडे पडतो झालं, बायको मेली, मुलीचं लग्न झालं". मान हलवत त्यानं आकाशात नजर लावली. "कधी इथे बसतो, कधी तिथं, पावसाच्या वेळी निवाऱ्याला थांबतो."

जिथे दुकाने बंद असतील, तिथे दिवसासाठी मुक्काम करायचा अशी या दुकानदारांची रीत आहे. सोमवार सारख्या दिवशी कापडाच्या दुकानातले लोकही दुकान लावतात आणि शे-सव्वाशे कमावतात. पण पुष्कळांचे पोट फक्त या छोट्या दुकानदारीवरच अवलंबून आहे.

पूर्वप्रसिद्धी सकाळ १९७४


मुख्यपान Homepage

संपर्क

आमच्याशी संपर्क साधाः
Contact us here:
myemail

लेखकः मानसी मोकाशी