विवाह समस्येच्या क्षेत्रातील सुयोग साधना

"लोकांच्या अडचणी समजावून घ्याव्यात म्हणून आम्ही शुक्रवार पेठ मतदार संघ ही मर्यादा लक्षात घेऊन दहा हजार कुटुंबांची पहाणी केली. त्यात आम्हाला असं दिसलं की जवळजवळ सर्व घरांतून काहीतरी अडचणी जाणवतातच. त्यापैकी मुख्य म्हणजे विवाह, पंचाऐंशी ते नव्वद टक्के, मग ती मुलाची बाजू असो वा मुलीची. लोकांना विवाह ही समस्या वाटते. त्या खालोखाल नोकरीची अडचण आहे. अशाश्वतताही लोकांना मोठ्या प्रमाणावर वाटते. शिवाय तत्कालिक अडचणीही असतातच." सौ. सुशीला आठवले सांगत होत्या.

त्या पुण्यातल्या "सुयोग साधना" या संस्थेच्या स्थापनेच्या कारणाचं विवेचन करीत होत्या. खरोखरच काही समाजकार्य करावं अशा हेतूनं ह्या मंडळींना शास्त्रोक्त दृष्टिकोनातून काम करायचं होतं. या वर सांगितलेल्या पाहणीच्या निष्कर्षांवरून त्यांनी समस्येचे तीन भाग पाडले. एक उद्योग विनिमय केंद्र, दुसरा शुभविवाह मंडळ तिसरा संकट साहाय्य निधी.

परंतु त्या पैकी शुभविवाह मंडळ आज मोठ्या प्रमाणात चालू आहे. उद्योग विनिमय केंद्र हे सरकारी एम्प्लॉयमेंट एक्सचेंज आणि संकट साहाय्य निधी हा विम्याला समांतर राहिल्यामुळे त्यांना हरकत घेतली गेली. त्यामुळे लोकांचा बरा प्रतिसाद येऊनही संकट साहाय्य निधी बंद झाला, आणि उद्योग विनिमय केंद्र घरगुती नोकर पुरवण्याइतकंच मर्यादित राहिलं आहे.

पूर्वीची उद्योग विनिमय केंद्राची दहा रु. वर्गणी आता बंद केली आहे. कारण आता ज्या लोकांना येथे काम दिले जाते त्यांना पैसे देणे परवडत नाही. "रोज दोन तीन लोकांना स्वयंपाकाचे, घरी राहण्याचे, इतर वरकामाचे आम्ही काम देतो. स्थानिक लोकांपेक्षा नोकरीनिमित्त बाहेरून आलेल्या लोकांची नोकरांबद्दल जास्त मागणी असते." सुशीलाबाई म्हणाल्या.

"कशा तऱ्हेच्या कामाची लोकांची अपेक्षा असते ?" मी विचारलं.

"इथे स्त्रिया जास्त असतात. निराधार असतात. वय ३० ते ५०. त्यांना जर जागा असली तर चार घरी स्वयंपाक, काम करून घरी परततात. पण ज्यांना आसरा हवा आहे, त्यांना चिंचवड पर्यंतच्या परिसरात लोकांच्या घरी राहून काम मिळतं. पन्नास साठ मुलांनाही घरकामाला आम्ही लावून दिलं आहे. शाळा करून इतर वेळेत ती काम करतात. मुली मात्र लोक सहसा पत्करायला तयार नसतात. "

" प्रौढ स्त्रियांच्या बाबतीत एक मात्र जाणवलं की त्या घरी स्वयंपाक करायला जायला तयार नसतात. त्या ऐवजी दवाखान्यात दाई म्हणून काम करायची त्यांची तयारी असते. खरं म्हणजे स्वयंपाक करणं फायद्याचं असतं. माहितीचं काम असतं. आणि दोन वेळेला जेवून पन्नास रुपये मिळतात. तर दवाखान्यात ८-१० तास काम करून जेवणाशिवाय अठ्ठावीस ते चाळीस रुपये मिळतात. शिवाय कुठल्याही रोग्याचं पडेत ते काम करावं लागतं. पण ते त्यांना पटत नाही. आपण दवाखान्यात काम करतो हे सांगायला त्यांना बरं वाटतं." त्यांनी उत्तर दिलं. ह्या लोकांकडून संस्था काही घेत नसली, तरी पत्रव्यवहार करायची वेळ आली तर स्वतः खर्च करते.

संस्थेच्या दुसऱ्या अंगाचं स्वरूप जास्त व्यापक आहे. महाराष्ट्रात पंचवीस एक ठिकाणी संस्था विवाह मंडळाची केंद्रे चालवते. शिवाय महाराष्ट्रा बाहेर भिलाई, हुबळी, दिल्ली येथेही केंद्रे आहेत. पूर्वी लंडनला होतं. पण ते चालवणाऱ्या बाई इकडे परत आल्यामुळे आता बंद आहे.

"इतर वधुवर सूचक मंडळांपेक्षा आमची वेगळी पद्धत म्हणजे आम्ही आम्हाला अनुरूप वाटतील अशी स्थळे आपणहून सुचवतो. अर्थात पुण्यातील लोकांना आमचं सांगणं असतं की त्यांनी स्वतः इथे येऊन आमचं रजिस्टर पहावं कारण आमचं पहाणं आणि आपल्या मुलामुलींसाठी स्थळ पहाणाऱ्याचं पहाणं यात फरक पडतो."

"तुमचं इथलं विशेष निरीक्षण काय आहे ?" या माझ्या प्रश्नावर त्या म्हणाल्या "इथे नाव नोंदवणाऱ्या वधू आणि वरांची संख्या सारखीच असते. वधूच्या बाबतीत पालक पत्रव्यवहार करतात. माहिती देतात, पण वराच्या बाबतीत वर स्वतः किंवा पालक आमच्याकडे येतात."

"पूर्वी मुलगी शिकू दे, ग्रॅज्युएट होऊ दे असं मत असे, पण अलीकडे गेल्या तीनचार वर्षांत मुलीचे लग्न लौकर करण्याकडे कल दिसतो. मुलाला स्वतःच्या पायावर उभं राहायचं असल्यानं अठ्ठावीसच्या आत वय क्वचितच असतं. म्हणून पंचविशीचा मुलगा असेल तर मी सांगते ही फाईल बाजूला काढून ठेवा. लहान मुलीला हे स्थळ सुचवता येईल."

त्यांच्या कडे चार इयत्ता शिकलेल्या पासून एम्.एस्.सी., पी.एच्.डी. पर्यंत शिकलेली स्थळे असतात. महिनाभर इथे येऊन, लग्न करून परदेशी परत जाणाऱ्यांची लग्नेही त्यांनी जुळवली आहेत. "एवढ्या थोड्या वेळातही लग्न न करता मुलगा परत गेला असं झालेलं नाही." त्यांनी अभिमानानं सांगितलं.

"तुम्हाला अनुभव कसे आले ?" माझा प्रश्न होता.

"चांगले आणि वाईट, दोन्ही ही . एक गृहस्थ आमच्याकडे नेहमी खेटे घालायचे. वय त्रेसष्ट. लवकर कसं जमणार ? एकदा ते आले होते. तेव्हा एक बाई आधाराच्या दृष्टीने लग्न हवं म्हणून आल्या होत्या. त्यांना मी सांगितलं बघा, यांच्याशी बोला. "

"दुसरं सांगायचं, तर एक मुलगी होती. लग्न न झाल्यानं खूप चिडली होती. तिला मी एका आंधळ्याचं स्थळ सुचवलं. तो देखणा होता. बाकी सर्व चांगला होता. आमच्याकडेच पाहण्याचा कार्यक्रम झाला. पण तिच्या बोलण्या वागण्यावरून त्यानं नाकारलं. तिला खूप वाईट वाटलं. अांधळ्यांनीही नाकारावं अशी मी -कुरुप ? " असं म्हणाली. पण आपण काय करणार ?"

ह्या सगळ्यांवर उपाय म्हणजे त्यांचं म्हणणं, आई-वडिलांनी मुलीचं लग्न अठरा ते बावीसच्या दरम्यान करून टाकावं. ती नोकरी करील, स्वतःच्या लग्नासाठी पैसा जमा करील हे चूक आहे. पैशाबरोबर तिचं स्वतःचं आणि इतरांचं राहणीमान वाढतं. अपेक्षा वाढतात. मुख्य म्हणजे आई वडिलांना तिच लग्न न होता तिनं पैसे मिळवावे असं वाटतं.

" या मुळे मुली दुःखी होतात, घरात आपल्याला कुणी विचारत नाही, आपण कुणाला नको आहोत म्हणून घरही सोडायला निघतात. हे वाईट आहे. मुलीच्या जन्माच्या वेळीच तिच्या लग्नाची जबाबदारी पालकांनी ओळखायला हवी."

"यावर उपाय म्हणून आमची मदत लागते. निवडीला व्यापकता यावी म्हणून अखिल भारतीय वधु-वर याद्या सरकारने नाही तर सामाजिक संस्थांनी तरी कराव्यात."

संस्थांनी सुचवल्यामुळे संपूर्ण खात्री दिली जात नाही. पण दोन ओळखीच्या माणसांचे पत्ते मागून माहिती मिळवली जाते. अपेक्षा विचारल्या जातात. पैशाची कल्पना सांगितली जाते. फोटोवरूनही अनुरूप स्थळे सुचवली जातात.

व्यंगांची, बीजवर अशीही स्थळ नोंदणी इथे होते. परंतु अशी लग्ने जमवण्याचे प्रमाण कमी आहे.

"संस्था स्वतः स्थळ सुचवते. दरवेळी चार. म्हणजे चार स्थळांना आणि मूळ व्यक्तीला. आठ पत्रांचा एक रुपया खर्च करते. त्याबद्दल वीस पैसे पोस्टेज मागितलं जातं. पण लोकांना वाटतं पाच पैशाला एक स्थळ संस्था विकते !" ही पैशाची अडचण आहे. दर महिन्याला दोन हजारांचा तोटा येतो. सुसा मासिकाला मिळणाऱ्या जाहिराती, संस्थेच्या छापखान्याचा फायदा ही विवाह मंडळाच्या जमेची साधनं. तीन एक हजार खर्च- संस्थेच्या सेंटर चालवणाऱ्यांना पाठवलेल्या दर फॉर्ममागे कमिशन, कर्मचाऱ्यांचे पगार जे कमी दिले जातात. चिटणीस सौ. आठवले, अध्यक्ष सौ. वैद्य ही व इतर कार्यकारी मंडळाची माणसे तर विनामूल्यच काम करतात.

"या कामात लोकांसाठी काही करतो हेच समाधान आहे. " सुशीलाताई शेवटी म्हणाल्या.

रविवार सकाळ, ता. १० जून १९७३


मुख्यपान Homepage

संपर्क

आमच्याशी संपर्क साधाः
Contact us here:
myemail

लेखकः मानसी मोकाशी