टण् टण् टण् . टिंगटॉंगनं टोले दिले. तीन वाजले होते.
पिंटू एक वाजता झोपला तो तीन वाजता उठायचं ठरवून.
पण तीन वाजता पिंटूनं कुशी बदलली. हातपाय ताणले, पहिलं स्वप्न संपवून दुसरं स्वप्न बघायला सुरुवात केली.
पिंटू तसा हुशारच. मागच्या आठवड्यात त्यानं ठरवलं, या नवीन वर्षाच्या सुरुवातीपासून आपण व्यवस्थितपणे वागायला लागायचं. त्याप्रमाणे सकाळी सहा वाजता उठल्यापासून रात्री दहा वाजता झोपेपर्यंत त्यानं केलेलं वेळापत्रक मोठ्या अक्षरात लिहून ते अभ्यासाच्या टेबलाजवळच्या भिंतीवर अडकवलं. जोडीला एक घड्याळ टेबलाशेजारच्या कपाटावर आणून ठेवलं.
तेच ते टिंगटॉंग. टिंगटॉंग खरं तर पिंटूच्या आजोबांचं. आजोबा पहाटे पाचला उठायचे. स्वतः चहा करून घेऊन सहा वाजता बाहेर पडायचे, सात वाजता परतायचे. आठ वाजता बातम्यांसाठी रेडिओ लावायचे. अकरा वाजता जेवायचे. बारा वाजता-- असं त्यांचं आखीव वेळापत्रक असे. रोज सकाळी नऊ वाजता आजोबा टिंगटॉंगला किल्ली द्यायचे.
पिंटूचं "व्यवस्थितपणे" वागायचं ठरल्यावर आजोबांनी टिंगटॉंग पिंटूला दिलं होतं. टिंगटॉंगलाही पिंटूची काळजी घ्यायला बजावलं होतं.
टिंगटॉंगला पिंटूची हुशारी ऐकून माहिती होती. पण नेहमी आजोबांच्या खोलीत राहणाऱ्या टिंगटॉंगला पिंटूच्या स्वभाव कुठे माहीत होता ?
टिंगटॉंग पिंटूच्या खोलीत राहायला आल्यावर पिंटूनं वक्तशीरपणे वागायचं ठरवलं. सकाळी सहा वाजता उठून तासाभरात तो जो अभ्यासाला बसायचा, तो साडेदहाला आई जेवायला हाक मारे तेव्हाच उठायचा. मग शाळा. शाळेतून परत आल्यावर खाऊन पाऊण तास खेळायचं. मग जरा इकडचं तिकडचं वाचन करून जेवून आठ ते दहा पुन्हा अभ्यासाला बसायचा.
हे वेळापत्रक आठवडाभर चाललं. .. पण फक्त अाठवडाभरच.
शनिवारची गोष्ट. दादाचा वाढदिवस म्हणून आईनं पुरणाची पोळी केली होती. पिंटूनं तिच्यावर ताव मारला नाही. तरच नवल ! त्यात त्याची दादाशी पोळी खाण्यावरून पैज लागलेली ! एक, दोन, तीन, चार असं करता करता दादापुढे आपली हार मानून पिंटूनं पुरणपोळी खाणं थांबवलं. आपल्या खोलीत तो अभ्यासाला बसला. पण छे ! त्याला डुलक्यांवर डुलक्या येत होत्या.
काय झालं, हे कळायच्या आत पुरणपोळीनं आहारून पिंटू डाराडूर झोपी गेला.
पिंटूनं झोपायची वेळ तर वेळापत्रकात दहा लिहिली आहे! आता तर कुठे नऊ वाजताहेत. टिंगटॉंगनं नऊ ठोके दिले आणि पिंटूकडे आश्चर्यानं पाहिलं.
पण पिंटूला कुठे पत्ता होता ?
तो सकाळी उठला सहाला. ठरल्याप्रमाणे. वेळापत्रकाप्रमाणे संध्याकाळपर्यंत सर्व चाललं. पण खेळून परत येताना पिंटूबरोबर आलेल्या बंड्यानं त्यांच्या घरी आलेल्या चोराची हकीकत सांगायला सुरुवात केली मात्र, पिंटू, ताई, दादा, हे ही त्यात केव्हाच ओढले गेले. जेवायला उशीर झाला. मग अभ्यासाला बसायला उशीर होणारच.
" आठ तास झोप माणसाला पुरते असं शास्त्राच्या पुस्तकात लिहिलं आहे. पण आपल्याला नाही बुवा पुरत इतकी झोप. आपण अभ्यास करतो, खेळतो त्यानं दमत नाही का ? " पिंटूच्या मनात विचार येत होते. " आपण दहा ऐवजी नऊलाच झोपलं पाहिजे. "
पिंटूनं वेळापत्रकात झोपेची वेळ दहाऐवजी नऊ केली.
टिंगटॉंगनं डोळे फाडून पाहिलं. " उद्या आजोबांनी आपल्याला विचारलं तर आपण काय उत्तर द्यायचं " असा प्रश्न टिंगटॉंगला पडला होता.
दुपारी आजोबांनी पिंटूच्या खोलीत चक्कर मारली. " काल मी म्हटलं म्हणून पिंटोबांनी खोली आवरलेली दिसत्ये. ही स्वारी आहे आरंभशूर. आहे हुशार, पण आजचा निर्णय उद्यापर्यंत टिकत नाही. हे वेळापत्रक केलंय, पण किती दिवस त्याप्रमाणे वागणार आहे कोण जाणे ! " आजोबा म्हणाले.
ते ऐकून टिगंटॉंगनं ठरवलं, पिंटूला त्याची ही सवय घालवायला मदत करायची.
पण कशी ?... तर चतुराईनं.
पिंटूची संध्याकाळी शाळेतून घरी येण्याची वेळ झाली होती. पण त्या दिवशी पिंटोबांची स्वारी शाळेतून घरी आली, ती राजाला बरोबर घेऊनच.
राजा आणि पिंटू अभ्यासाला बसले. पण अभ्यासापेक्षा गप्पाच जास्त झाल्या. वर्गात एकमेकांच्या काढलेल्या खोड्या, सातवी अ विरुद्ध सातवी ब ची झालेली मॅच वगैरे विषय दोघांच्याही मनात ताजे होते. त्यात बीजगणिताची समीकरणं आणि प्रमेयं कंटाळवाणी वाटली नाहीत तरच नवल.
वेळ कसा गेला तेच कळलं नाही. टिंगटॉंगचे नऊ ठोके ऐकून राजा उठला.
चार घास पोटात ढकलून पिंटू अंथरुणावर पडला. सकाळी ठण् ठण् अशा सहा ठोक्यांनी जागा झाला. त्यानं बाहेर पाहिलं, तर अंधारच होता.
तोंड धुवून, दूध पिऊन तो अभ्यासाला बसला. " अरेच्या ! रोज साडेपाचला येणाऱ्या दुधाच्या गाडीचा आवाज आत्ता कसा येतोय् ! " पिंटूच्या मनात विचार आला. मग त्या दिवशी सुरू होणाऱ्या युनिट टेस्टच्या तयारीला लागला.
त्या दिवसा पासून हे रोजचंच झालं. सकाळी सहाला टिंगटॉंगच्या ठणठणाटानं तो उठे.
एकदा शनिवारी दुपारी अभ्यास करायचं ठरवून पिंटू आला आणि त्यानं आणलेलं गोष्टीचं पुस्तक वाचण्याचा त्याला साहजीकच मोह झाला. " वाचायचं, तर जशी शांतता हवी तशी आहे. बंडूला घेऊन आई मावशीकडे गेल्ये. म्हणजे त्याची गडबड नाही. गोष्टीचं पुस्तक वाचत वेळ घालवला हे आईच्याही डोळयावर यायचं नाही. " पिंटूनं विचार केला.
पिंटूनं वाचायला घेतलेल्या पुस्तकाची दोन पानं झाली असतील, नसतील. टिंगटॉंगनं ठोके द्यायला सुरुवात केली - आणि त्याचं ठोके देणं संपेचना !
पिंटूनं कपाळाला आठ्या घालून टिंगटॉंगचा लंबक धरून थांबवला. आवाज ऐकून आत आलेल्या आजोबांना पाहून पिंटूनं भूगोलाचं पुस्तक हातात घेतलं आणि अभ्यासाला सुरुवात केली.
परीक्षेचा आदला दिवस होता तो. उशीरापर्यंत अभ्यास करून पिंटूला झोप आवरत नव्हती. टिंगटॉंगनं पहाटे सहा ठोके दिले. नेहमीपेक्षा मोठ्यानं ठोके दिले. पण पिंटूचे डोळे उघडत नव्हते. आठ वाजता परीक्षा होती. पिंटूला उठवायलाच हवं होतं. टिंगटॉंगनं पुन्हा जोरजोरात ठोके दिले. पण पिंटू गाढ झोपलेला. मग त्यानं आपला मिनिटाचा आणि तासाचा हात लांब केला आणि पिंटूला गदगदा हलवलं.
पिंटूनं जागं होऊन परीक्षा गाठली. पण टिंगटॉंग बंद झालं होतं.
आजोबांनी घड्याळजींकडे टिंगटॉंगला नेलं. " आश्चर्य आहे बुवा ! या तुमच्या घड्याळात सहाचे ठोके मोठ्यांदा आणि अर्धा तास लौकर पडतात. नवाचे ठोके अर्धा तास उशीरा पडतात. कोण वापरत होतं हे घड्याळ ? " घड्याळजीनं विचारलं. पण या कामगिरी बद्दल आजोबांनी टिंगटॉंगला शाबासकी दिली.
त्या वर्षी पिंटूचा पहिला नंबर आला होता.